Frequent Urination At Night: रात्री वारंवार लघवी येणे याला वैद्यकीय भाषेत नॉक्चुरिया म्हणतात. ही एक सामान्य पण अनेकदा दुर्लक्षित केली जाणारी समस्या आहे. रात्री लघवी येणे हे कधीकधी सवयीनुसार होते असा समज असतो. मात्र, काही प्रकरणांमध्ये हे एका गंभीर आजाराचे लक्षण असू शकते.
कानपूरमधील स्वरूप नगर इथल्या गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलचे संचालक आणि वरिष्ठ गॅस्ट्रोएंटेरजिस्ट डॉ. व्ही. के. मिश्रा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगिते की, रात्री वारंवार लघवीला जाणे याला नॉक्चुरिया Nocturia म्हणतात. ही समस्या वृद्ध व्यक्तींमध्ये सर्वसामान्यपणे आढळते. नॉक्चुरिया ही अशी स्थिती आहे, यामध्ये व्यक्तीला लघवी करण्यासाठी रात्री वारंवार उठावे लागते. जर ही समस्या दिवसातून दोन किंवा अधिक वेळा उद्भवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. रात्री जास्त लघवीला जाण्याची नेमकी कारणे काय आणि ते कसे टाळता येईल याबाबत तज्ज्ञांकडून जाणून घेऊ…
रात्री लघवी होण्यामागची कारणे
- जीवनशैली आणि सवयी
- संध्याकाळनंतर जास्त पाणी किंवा लिक्विड पिणे
- संध्याकाळी कॅफीनयुक्त पदार्थांचे म्हणजेच कॉफी आणि चहाचे अतिसेवन
- अति प्रमाणात मद्यपान
- जास्त पाणी असलेली फळे किंवा सूप प्यायल्याने
वैद्यकीय कारणे
- पुरूषांमध्ये वाढलेल्या प्रोस्टेटमुळे रात्री लघवी होऊ शकते
- अतिसक्रिय मूत्राशयामुळे रात्रीच्या वेळी लघवीचे प्रमाण वाढते
- डायबिटीजमध्ये तुमचे शरीर वेगाने ग्लुकोज तयार करते, तुमच्या साखरेची पातळी वाढते आणि तुम्हाला वारंवार लघवी येते.
- यूरिन इंफेक्शन (यूटीआय)
- स्लीप अॅप्निया, घोरण्यामुळे वारंवार लघवी होऊ शकते
- हार्मोनल बदलांमुळे
- किडनी किंवा ह्रदयाशी संबंधित आजार असल्याने रात्री लघवी होऊ शकते.
रात्रीच्या वेळी जास्त लघवी होत असेल तर अशी काळजी घ्या
- झोपण्याच्या ३ ते ४ तास आधी द्रव पदार्थांचे सेवन कमी करा
- संध्याकाळनंतर कॅफिन आणि मद्यपान टाळा
- झोपण्यापूर्वी दोनदा लघवी करण्याची सवय लावा
- जर तुमचे पाय सुजले असतील, तर दिवसभरात पाय उंच करून ठेवा
- औषधांच्या दुष्परिणामांसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
तज्ज्ञांचा सल्ला कधी घ्यावा?
- जर तुम्हाला रात्री दोनपेक्षा जास्त वेळा लघवीला जावे लागत असेल आणि ही समस्या अचानक वाढली असेल, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- लघवी करताना जळजळ, वेदना किंवा रक्तस्त्राव होत असल्यास ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
रात्री वारंवार लघवी येणे ही केवळ एक सामान्य समस्या नाही, तर तो तुमच्या शरीराकडून मिळणारा एक संकेत असू शकतो. याचे कारण समजून घेणे आणि वेळेवर योग्य ते उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
