Fridge Cotton Trick Goes Viral: अनेक जण फ्रिज जुना झाला म्हणून असे होत असल्याची तक्रार करतात; तर काही जण यासाठी हवामानाला जबाबदार ठरवतात. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका भन्नाट किचन जुगाडानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे या उपायासाठी ना महागडं मशीन लागतं, ना तंत्रज्ञानाची मदत… फक्त लागतो थोडासा कापूस!
होय, ऐकायला विचित्र वाटेल; पण एका गृहिणीनं फ्रिजमध्ये कापसाचा वापर करून असा उपाय दाखवून दिला की, अनेकांनी तो पाहताच आश्चर्य व्यक्त केलं. “पहिल्याच महिन्यात वीज बिलात फरक दिसला,” असा दावा काही लोकांनी सोशल मीडियावर केला आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
फ्रिजमुळे वीज बिल खरंच वाढतं का?
घरातील इतर उपकरणांच्या तुलनेत फ्रिज सतत सुरू असतो. त्यामुळे त्याची कार्यक्षमता थोडी जरी कमी झाली तरी वीज वापर वाढू शकतो. विशेषतः फ्रिजच्या दाराला लावलेलं रबर अनेकदा दुर्लक्षित राहतं. हे रबर म्हणजेच ‘गॅस्केट’ थंड हवा बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेरील गरम हवा आत येण्यापासून रोखतं.
मात्र, कालांतरानं या रबरामध्ये धूळ, चिकटपणा, बुरशी आणि अन्नकण साचतात. त्यामुळे फ्रिजचं दार व्यवस्थित बंद होत नाही. अनेकांना ही गोष्ट लक्षातही येत नाही; पण याच छोट्याशा कारणामुळे फ्रिजच्या अंतर्गत यंत्रणेवर अधिक ताण येतो आणि विजेचा वापर वाढतो, असं तज्ज्ञ सांगतात.
याच समस्येवर एका गृहिणीनं भन्नाट उपाय शोधला आहे. विशेष म्हणजे हा उपाय इतका सोपा आहे की, तो पाहून अनेकांनी “हे आधी का सुचलं नाही?” अशी प्रतिक्रिया दिली.
नेमका कापसाचा जुगाड काय?
व्हायरल व्हिडीओनुसार सर्वप्रथम थोडासा कापूस घ्यायचा. तो डेटॉलमध्ये हलकासा भिजवायचा आणि एका बारीक काठीभोवती गुंडाळायचा. त्यानंतर फ्रिजच्या दाराच्या रबरामध्ये, विशेषतः आतल्या कोपऱ्यांमध्ये हा कापूस फिरवून स्वच्छता करायची.
फ्रिजच्या रबरात साचलेली घाण, चिकट थर व बुरशी यांमुळे तो रबर सैल होतो; पण कापसाच्या मदतीनं स्वच्छता केल्यावर रबर पुन्हा स्वच्छ आणि घट्ट राहण्यास मदत होते. परिणामी थंड हवा बाहेर जाणं कमी होतं आणि फ्रिजवरील अतिरिक्त ताणही घटतो.
या उपायामुळे फ्रिजमध्ये जास्त बर्फ साचत नाही, दुर्गंधी कमी होते आणि विजेचा वापरही कमी होऊ शकतो, असा दावा व्हिडीओमध्ये करण्यात आला आहे.
दुसरा घरगुती उपायही चर्चेत
काही गृहिणी व्हिनेगरचाही वापर करीत आहेत. पाण्यात थोडं व्हिनेगर मिसळून कापडाच्या मदतीनं फ्रिजचा रबर स्वच्छ केल्यास चिकटपणा आणि बुरशी सहज निघून जाते. हा उपायही सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
दरम्यान, ‘Puneri Tadka’ या यूट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा उपाय फायदेशीर असल्याचं म्हटलं; तर काहींनी तो करून पाहण्याचा सल्ला दिला आहे.
येथे पाहा व्हिडीओ
मात्र, हा व्हायरल दावा असून, प्रत्येक घरातील परिस्थितीनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात. तरीही फ्रिजची नियमित स्वच्छता आणि योग्य देखभाल केल्यास त्याची कार्यक्षमता टिकून राहण्यास मदत होते, हे मात्र नक्की.
(Disclaimer: या लेखात देण्यात आलेली माहिती सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या व्हिडीओवर आधारित आहे. लोकसत्ता याची पुष्टी करीत नाही.)
