Friendship day 2018 , फ्रेंडशिप डे आला की सगळेजण आपापल्या मित्र मैत्रींणीबाबत भरभरुन लिहितात. पण आपल्या आयुष्यातील पहिली मैत्रीण कोण असा प्रश्न जर कोणी विचारला तर काय उत्तर असेल….जिच्याकडे आपण आपलं मन मोकळं करतो, जिच्यासोबत काहीही शेअर करताना कसलीच भीती वाटत नाही अशा अनेक मैत्रिणी भेटल्या….म्हणजे सांगायचंच झालं तर कॉलेजमध्ये गेल्यावर कोणाला मैत्रीण म्हणतात म्हणजे तिची व्याख्या काय आहे हे कळलं…..आणि नंतर माझ्या लक्षात आलं माझी आजी हीच माझी पहिली मैत्रीण होती…अगदी जीवाभावाची. खरं तर मैत्रीत अपेक्षा ठेवायच्या नसतात…पण मी मात्र तिच्याकडून तिच्या पदरात मावणार नाहीत याहून जास्त अपेक्षा केल्या….आणि माझ्या या मैत्रिणीनेही तो पदर कधीच रिकामा होऊ दिला नाही. त्या पदरात आजही मला देण्यासारखं खूप काही असतं.

मला आठवतं लहानपणी मला काहीही हवं असलं तर आईच्याही आधी मी तिच्याकडे पळायचो. माझी जिजी…अगदी मला एखाद्या मित्राने चिडवलं तरी मी तिच्याकडेच जाऊन तक्रार करायचो. ती माझं सर्वस्व होती. आजी असली तरी आधी ती माझी मैत्रीण होती…फक्त माझी एकट्याची….तिच्यात आणि माझ्यात कोणीही नव्हतं…अगदी माझा भाऊ आणि बहिणही.

in Relationships Your self-esteem is in your hands
नातेसंबंध : आपला आत्मसन्मान आपल्या हाती!
narayan rane marathi news, deepak kesarkar marathi news
वैयक्तिक स्वार्थापोटी अपशकून करत असेल तर पर्वा करणार नाही, नारायण राणे यांचा मित्र पक्षाच्या नेत्यांना टोला
sharad pawar latest news
राजकारणात महिलांना पतीच्या तालावर नाचावं लागतं? प्रश्न विचारताच शरद पवार म्हणाले, “फक्त पुरुषांतच कर्तृत्व…!”
chaturang article dr sudhakar shelar s friendship memories and sensible female friend
माझी मैत्रीण : समंजस मैत्री

तिचा तो बटवा आजही मला आठवतो. त्यात किती पैसे असायचे माहित नाही पण जेव्हा कधी मी हात पुढे केला तिने तो हात कधीच रिकामा माघारी फिरु दिला नाही. दिवसभर मी काय केलं हे शांतपणे ऐकून घेत मला समजून घेणारी ती माझी मैत्रीण. स्वत: हाफ ग्लास लस्सी घेऊन मला फुल ग्लास मागवणारी ती माझी श्रीमंत मैत्रीण होती. खरं सांगायचं तर आपण समजूतदार नसणं आपल्या फायद्याचंच असतं. कारण समजूतदार झालो की आपण नात्यात फायदा शोधू लागतो. पण लहानपणी ते निरागस असतं…एखादं बाळ जेव्हा जन्माला येतं तेव्हा फक्त एक स्त्री आई होत नाही तर त्यावेळी दोन स्रिया आई होतात…त्यातील एकीचा आई म्हणून तो पुनर्जन्म असतो…आणि त्या बाळाला मिळते एक मैत्रीण…जी त्याला या जगाची ओळख करुन देते. काय बरोबर, काय चुकीचं सगळं समजावून सांगते.

तुम्हाला मोठं करताना स्वत: छोटी होते. तुम्हाला सगळं काही शिकवून या जगात पाठवते आणि मग ती मागे पडू लागते. आपल्या त्या वेगासोबत साथ देणं तिला जमत नाही. मग एकेकाळी जिचा हात पकडून आपण या जगाची भटकंती करत असतो तो हात कुठेतरी हरवतो. ती मैत्रीण निस्वार्थपणे आपल्याला आपल्या नव्या मित्रांच्या घोळक्यात सोडून स्वत: मात्र बाजूला झालेली असते.

#HappyFriendshipDay: चला पुन्हा कट्टी-बट्टीकडे, कारण…

यानंतर अजून एक मैत्रीण आपल्या आयुष्यात येते ती म्हणजे बायको. ही मैत्रीण तुमच्या आयुष्यभराची असते बरं का….म्हणजे तुम्ही कितीही म्हणालात तरी ही मैत्रीण काही तुमची पाठ सोडत नाही…ही फक्त मैत्रीण नसते तर तुमचा आयुष्यभराचा जोडीदार असतो. लग्नाआधी मित्र मैत्रीण असणारे अनेकजण लग्नानंतर नवरा बायको होतात..पण माझं ऐकाल तर तुम्ही मित्र मैत्रीणच राहिलं पाहिजे.

बायको ही एक अशी मैत्रीण असते जी तुम्हाला आयुष्य नव्याने जगायला शिकवते. भरकटलेलं आयुष्य स्थिरावण्याचं काम ही मैत्रीण करते. या मैत्रिणीइतकी समंजस मैत्रीण मिळणं थोडं कठीणच. ही मैत्रीण तुमच्या आयुष्यात स्थिरता आणते. तुम्हाला चार पैसे सेव्हिंग करायला शिकवते. एरव्ही नाक्यावर मित्रांसोबत गप्पा मारणारे तुम्ही वेळेत घरी पोहोचू लागता. नाक्यावर उभं राहून मित्रांसमोर कधीतरी घर घेऊ रे अशा बढाया मारणाऱ्या तुम्हाला ती स्वत:चं हक्काचं घर घ्यायला लावते. खरं सांगायचं तर तुमच्या आयुष्याला शिस्त लावायचं काम कोण करतं ती असते ही आपली मैत्रीण.

वाचा : Friendship day 2018: तुटलेली पण तरीही मनात रुतलेली मैत्री…

माझ्या आयुष्यातल्या या माझ्या दोन जीवलग मैत्रिणी….या दोघींमध्ये काय साम्य आहे माहिती आहे ….एकीने मला बोटं धरुन चालायला शिकवलं आणि दुसरी मी धडपडू नये म्हणून हातात हात घेऊन खंबीरपणे चालत असते. माझ्या या दोघी मैत्रीणींना फ्रेंडशिपच्या डे च्या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा…तुम्ही नसता तर कदाचित मी चांगला मित्र झालो नसतो.

shivraj.yadav@loksatta.com