Fruits on Empty Stomach: फळं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि सकाळच्या आहारात ती खाणं चांगलं मानलं जातं. तज्ज्ञही सांगतात की दिवसाची सुरुवात फळांनी केल्यास शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि ऊर्जा टिकून राहते. पण सर्व फळं उपाशीपोटी खाणं योग्य नसतं. काही फळं सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्यास त्रास वाढू शकतो. चला तर मग जाणून घेऊया, हिवाळ्यात कोणती फळं खाणं टाळावं.
संत्री, लिंबू, ग्रेपफ्रूट
हिवाळ्यात संत्री, लिंबू, ग्रेपफ्रूटसारखी आंबट फळं सहज मिळतात. या फळांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन C असतं आणि मर्यादित प्रमाणात खाल्ल्यास ती फायदेशीरही ठरतात. पण ही फळं सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यास पोटाच्या आतल्या आवरणाला जळजळ होऊ शकते, विशेषतः ज्यांना गॅस किंवा ॲसिड रिफ्लक्सचा त्रास असतो त्यांना. त्यामुळे ही फळं खात असाल, तर ती थोड्या प्रमाणातच खाण्याचा प्रयत्न करावा.
सफरचंद
सफरचंद सर्व ऋतूंमध्ये सहज मिळतं आणि “रोज एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टर दूर राहतो” ही म्हणही प्रसिद्ध आहे. मात्र, बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर सफरचंद खाल्ल्यास काही लोकांना ते जड जाऊ शकतो. सफरचंदामध्ये फायबर आणि फ्रुक्टोज जास्त असतं, त्यामुळे पोट फुगणं, अपचन होणं किंवा साखरेची पातळी अचानक वाढणं-घटणं शक्य आहे. म्हणून सफरचंद खाणं विचारपूर्वक आणि मर्यादेत करावं.
द्राक्षे
द्राक्षे गोड लागतात, पण त्यात थोडी आम्लता आणि भरपूर फायबर असतं. उपाशीपोटी खाल्ल्यास ते रक्तातील साखर लवकर वाढवू शकतात, त्यामुळे थोड्याच वेळात पुन्हा भूक लागणे आणि चिडचिड होऊ शकते. म्हणून द्राक्षे खाताना याची काळजी घेणं गरजेचं आहे.
पपई
पपई पचनासाठी चांगली मानली जाते, पण बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर ती खाणं सर्वांसाठी योग्य नसतं. ज्यांचं पोट संवेदनशील असतं, त्यांना पपईमधील पपेन एन्झाइममुळे पोटात अस्वस्थता किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो.
टरबूज, खरबूज आणि हनीड्यू
टरबूज, खरबूज आणि हनीड्यूसारखी गोड फळं चविष्ट असतात, पण ती जास्त प्रमाणात उपाशीपोटी खाल्ल्यास रक्तातील साखर पटकन वाढू शकते. या फळांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे पोटातील ॲसिडचं संतुलनही बिघडू शकतं.
केळी
बराच वेळ उपाशी राहिल्यानंतर केळी खाणंही योग्य मानलं जात नाही. केळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि साखरेचं प्रमाण जास्त असतं. विशेषतः हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांनी केळी खाताना काळजी घ्यावी.

