Gallstones Symptoms vs Acidity: अनेकदा शरीरात एखादा त्रास जाणवला की आपण त्याचं कारण स्वतःच ठरवून टाकतो. छातीत दुखतंय? गॅस असेल. पोटात दुखतंय? अ‍ॅसिडिटी असेल. अशी लक्षणं वारंवार होत असतानाही अनेकजण स्वतःहून औषधं किंवा अँटासिड घेत राहतात. मात्र, प्रत्येक वेळी हा त्रास अ‍ॅसिडिटीमुळेच होतो असं नाही. काही वेळा अ‍ॅसिडिटीसारखी वाटणारी लक्षणं गॉलस्टोन म्हणजेच पित्ताशयातील खडे यामुळेही होऊ शकतात. अँटासिड घेतल्यानंतरही त्रास कमी होत नसेल आणि तो पुन्हा-पुन्हा होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही.

अँटासिड घेतल्यानंतरही आराम मिळत नाहीये?

AIIMS, नवी दिल्ली येथील डॉ. हेमांग कुमार भट्टाचार्य यांच्या माहितीनुसार, जर एखादी व्यक्ती अनेक महिन्यांपासून अँटासिड घेत असेल आणि तरीही वेदना वारंवार परत येत असतील, तर हा त्रास केवळ अ‍ॅसिडिटीचा नसण्याची शक्यता आहे. अशावेळी गॉलस्टोनचाही विचार करणे गरजेचे ठरू शकते. म्हणूनच सतत होणारा पोटदुखी किंवा छातीजवळचा त्रास केवळ ‘गॅस’ म्हणून दुर्लक्षित न करता त्यामागचं नेमकं कारण समजून घेणं महत्त्वाचं आहे.

गॉलस्टोन म्हणजे नेमकं काय?

आपल्या लिव्हरच्या खाली पित्ताशय (Gallbladder) नावाचा छोटा अवयव असतो. यामध्ये पित्त (Bile) साठवलं जातं. हे पित्त अन्नातील चरबी पचवण्यास मदत करतं. या पित्तामधील कोलेस्टेरॉल किंवा बिलिरुबिनसारखे घटक जास्त प्रमाणात जमा होऊन कठीण झाले, तर त्यापासून पित्ताशयातील खडे म्हणजेच गॉलस्टोन तयार होऊ शकतात. हे खडे अगदी वाळूच्या कणाएवढे छोटे असू शकतात, तर काही वेळा ते मोठेही होऊ शकतात. विशेष म्हणजे अनेक लोकांच्या पित्ताशयात खडे असूनही सुरुवातीला कोणतीही लक्षणं दिसत नाहीत.

मग गॉलस्टोनचा त्रास कधी जाणवतो?

पित्ताशयातील खडा हलून सिस्टिक डक्ट किंवा बाइल डक्टमध्ये अडथळा निर्माण झाला, तर अचानक तीव्र वेदना होऊ शकतात. याला गॉल ब्लॅडर अटॅक किंवा बायलरी कोलिकसारखी स्थिती म्हणतात. हा त्रास काही लोकांसाठी अत्यंत वेदनादायक असू शकतो.

अ‍ॅसिडिटी की गॉलस्टोन? असा ओळखा फरक

दोन्हींची काही लक्षणं सारखी वाटू शकतात. त्यामुळे अनेकदा गॉलस्टोनचा त्रास अ‍ॅसिडिटी समजला जातो. अ‍ॅसिडिटीमध्ये साधारणपणे छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा अन्न वर येण्यासारखा त्रास होऊ शकतो. अँटासिड घेतल्यानंतर काही प्रमाणात आराम मिळू शकतो.

गॉलस्टोनमध्ये, मात्र खालील लक्षणं दिसू शकतात…

पोटाच्या वरच्या उजव्या भागात अचानक किंवा तीव्र वेदना
वेदना उजव्या खांद्याकडे किंवा पाठीकडे जाणे
तेलकट किंवा जास्त चरबीयुक्त पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास वाढणे
मळमळ किंवा उलटी
वेदना ३० मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकणे
अँटासिड घेतल्यानंतरही वेदना कमी न होणे

अशी लक्षणं वारंवार होत असतील, तर स्वतःहून अ‍ॅसिडिटीची औषधं घेत राहण्यापेक्षा डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.

कोणाला गॉलस्टोनचा धोका अधिक असू शकतो?

गॉलस्टोन तयार होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. त्यामध्ये—

  • ४० वर्षांपेक्षा जास्त वय
  • गर्भधारणेदरम्यान किंवा त्यानंतर होणारे काही शारीरिक बदल
  • लठ्ठपणा
  • अतिशय वेगाने वजन कमी होणे
  • जास्त चरबीयुक्त आणि कमी फायबर असलेला आहार

यांसारख्या घटकांचा समावेश होतो.

गॉलस्टोनची तपासणी कशी केली जाते?

गॉलस्टोनचा शोध घेण्यासाठी अ‍ॅब्डॉमिनल अल्ट्रासाऊंड ही सामान्यपणे केली जाणारी तपासणी आहे. ही तुलनेने सोपी आणि वेदनारहित तपासणी आहे. मात्र, पित्ताशयात खडे आढळले म्हणजे प्रत्येक व्यक्तीला लगेच उपचार किंवा शस्त्रक्रिया करावी लागतेच असं नाही. उपचारांचा निर्णय लक्षणं, खड्यांची स्थिती आणि डॉक्टरांच्या तपासणीवर अवलंबून असतो.

लक्षणं नसतील तर काय?

जर पित्ताशयातील खडे आढळले पण कोणतीही लक्षणं नसतील, तर काही रुग्णांमध्ये डॉक्टर केवळ निरीक्षण करण्याचा सल्ला देऊ शकतात. मात्र, वारंवार वेदना, गुंतागुंत किंवा इतर संबंधित लक्षणं असल्यास उपचारांची गरज भासू शकते.

गॉलस्टोनवर उपचार काय?

लक्षणं निर्माण करणाऱ्या गॉलस्टोनच्या अनेक प्रकरणांमध्ये पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया (Cholecystectomy) केली जाते. शस्त्रक्रियेनंतर बहुतेक रुग्णांची रिकव्हरी चांगली होते. प्रत्येक पोटदुखी किंवा छातीत होणारा त्रास गॉलस्टोनमुळेच होतो असं नाही आणि प्रत्येक वेळी तो अॅसिडिटीमुळेही होत नाही. त्यामुळे अँटासिड घेतल्यानंतरही त्रास वारंवार होत असेल, विशेषतः पोटाच्या वरच्या उजव्या भागात वेदना होत असतील, तर डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं योग्य ठरेल.