Ganesh Chaturthi Pooja Items List: गणेश चतुर्थीचा उत्सव यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी साजरा केला जाणार आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी ‘श्री गणेश चतुर्थी’ साजरी केली जाते. या दिवशी घरोघरी गणपती बाप्पाची स्थापना करून विधिवत पूजा केली जाते.

गणरायाच्या आगमनाची तयारी अगदी १ ते २ महिन्यापूर्वीच सुरू झालेली असते. डेकोरेशन, खरेदी, पूजेचं साहित्य, आमंत्रण अशा सगळ्या गोष्टींमध्ये अनेकदा पूजेच्या वेळी एखादी वस्तू राहून जाते म्हणूनच पूजेचे साहित्य आधीच जमा करून ठेवणं सोयीचं ठरतं. जर तुमच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान होणार असतील तर पूजेसाठी लागणाऱ्या सगळ्या साहित्याची यादी जाणून घेऊया…

गणपती बाप्पाच्या प्रतिष्ठापना पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी पुढीलप्रमाणे…

१. गणपती बाप्पाला विराजमान केल्यावर चौरंगावर किंवा पाटावर ठेवण्यासाठी वस्त्र, तर दाराबाहेर काढण्यासाठी रांगोळी

२. पूजेसाठी लागणारे महत्त्वाचे साहित्य म्हणजे निरांजन, उदबत्ती, समई, धूप, कापूर, वाती, आरतीचे ताट

३. पाच फळे, सुपारी, नारळ, विड्याची पाने, सुक्या खोबऱ्याची वाटी व त्यात ठेवायला गूळ, सुट्टे पैसे

४. पूजेच्या ठिकाणी ठेवण्यासाठी कलश, पाणी व आंब्याची पाने

५. निवडलेल्या दुर्वांची २१-२१ ची जुडी

६. गणपतीची मूर्ती सजवण्यासाठी व बाप्पाला आवडतात म्हणून लाल जास्वंदाची फुले, सुगंधित फुले, दुर्वा.

७. पूजेदरम्यान श्लोक म्हणण्यासाठी अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र, आरतीचे पुस्तक.

८. मूर्तीला अर्पण करण्यासाठी जानवे, कार्पासवस्त्र (कापसाचे व्रस्त्र) आणि पूजेसाठी दोन ताम्हण, तीन पोफळे.

९. अभिषेक करण्यासाठी पंचामृत, सुगंधित जल, शुद्ध पाणी, अष्टगंध, हळद, कुंकू आणि अक्षता. पूजेसाठी पंचामृत तयार करण्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखर लागते. त्यासोबत गंगाजल किंवा शुद्ध पाणी, पळी-पंचपात्र, ताम्हण आणि पूजेची थाळीही तयार ठेवावी.

१०. गणपती बाप्पाला अभिषेक करण्यासाठी दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवलेले पंचामृत.

नैवेद्य आणि आरतीचे साहित्य

नैवेद्यासाठी मोदक हा गणपती पूजेतील प्रमुख पदार्थ मानला जातो. त्यासोबत फळे, गूळ-खोबरे आणि इतर सात्त्विक पदार्थ ठेवता येतात. आरतीसाठी तुपाचे निरांजन किंवा समई, कापसाच्या वाती, कापूर, उदबत्ती आणि काडेपेटी आवश्यक आहे. पूजेच्या शेवटी गणपतीची आरती करून नैवेद्य दाखवला जातो.

याशिवाय दक्षिणेसाठी सुट्टे पैसे, विड्याची पाने, सुपाऱ्या आणि आवश्यक असल्यास गणपतीसाठी नवीन वस्त्र किंवा उपरणे ठेवावे. पूजेची पद्धत आणि साहित्य कुटुंबाच्या परंपरेनुसार थोडेफार वेगळे असू शकते. त्यामुळे आपल्या घरातील पारंपरिक पद्धतीला प्राधान्य देणे योग्य ठरेल.

या यादीतील अनेक गोष्टी तुमच्या घरीसुद्धा उपलब्ध असतील, तर काही गोष्टी तुम्हाला बाजारातून आणाव्या लागतील. अजून काही तास बाकी आहेत, त्यामुळे मूर्ती स्थापनेआधी या सगळ्या वस्तू पूजेसाठी घरी आणून ठेवा, म्हणजे तुमचा वेळही वाचेल आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापनेची पूजा अगदी वेळेत होईल.