How To Stop Tulsi Plant From Dying: तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात मांगल्याचे प्रतीक मानले जाते. आयुर्वेदातही तुळशीला फार महत्त्व आहे, त्यामुळे गावात अनेकांच्या घराच्या अंगणात तुळशीचे वृंदावन असते; पण शहरात लोक घराची बाल्कनी, खिडकीत लहानच्या कुंडीत तुळस लावतात. पण, मुळांना कुंडीत जागा कमी पडत असल्याने रोप ताजे टवटवीत दिसत नाही. योग्य निगा राखूनही, योग्य पाणी देऊनही तुळशीची पानं सुकतात यावर आज आपण एक प्रभावी उपाय म्हणून पाहणार आहोत.
तुम्हाला माहीत आहे का की, एक विशेष प्रकारचे मीठ तुमच्या कोमेजलेल्या तुळशीच्या रोपाला जीवदान देऊ शकते. तज्ज्ञ बागायतदारांच्या मते, एप्सम मिठाच्या योग्य वापराने तुम्ही तुळशीला पुन्हा हिरवेगार आणि टवटवीत करू शकता. एप्सम सॉल्टला वैज्ञानिक भाषेत मॅग्नेशियम सल्फेट, असे म्हणतात.
लोक अनेकदा तुळशीचे रोप सुकल्यानंतर ते कुंडीतून काढून टाकतात; परंतु आता तुम्हाला असे करण्याची गरज नाही. ही सोपी पद्धत युनिक फार्मिंग सोशल मीडिया अकाउंटने शेअर केली आहे, ज्याच्या मदतीने कोमेजलेली तुळस पुन्हा फुलवू शकता. एप्सम सॉल्ट मातीला आवश्यक पोषक तत्त्वे प्रदान करते.
एप्सम सॉल्ट अनेक जण टेबल सॉल्ट समजतात; परंतु ते अगदी वेगळे आहे. त्यातील मॅग्नेशियम रोपाला क्लोरोफिल तयार करण्यास मदत करते, ज्यामुळे पानांचा रंग अगदी गडद हिरवा होतो. सल्फेट रोपाला आवश्यक पोषक तत्त्वे शोषण्यासदेखील मदत करते. पण लक्षात ठेवा, एप्सम सॉल्ट समजून चुकूनही आपल्या स्वयंपाकघरातील मीठ वापरू नका. अशाने रोपाचे नुकसान होऊ शकते.
तुळशीचे रोप ताजे टवटवीत राहण्यासाठी सोपे उपाय
योग्य प्रमाणात तयार करा आणि मिसळा
तुळशीच्या रोपांसाठी एप्सम मिठाचा वापर अत्यंत योग्य प्रकारे केला पाहिजे. बागायतदारांच्या मते, एक लिटर स्वच्छ पाण्यात फक्त एक चमचा एप्सम मीठ घाला. मीठ पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहा. हे रोपांसाठी एक शक्तिशाली टॉनिक म्हणून काम करते, थेट मुळांपर्यंत पोहोचते आणि त्यांना पोषण देते.
रोपासाठी एप्सम मिठाचा वापर कसा करायचा? (How to make Tulsi plant bushy and green)
तयार केलेले द्रावण थेट तुळशीच्या कुंडीतील मातीत ओता आणि ते ओतताना माती जास्त कोरडी नाही ना याची खात्री करा. असेल, तर आधी थोडे पाणी टाका. पर्याय म्हणून तुम्ही हे द्रावण स्प्रे बाटलीत भरू शकता आणि ते पानांवर फवारू शकता. त्यामुळे रोपाच्या पानांमधील छिद्रांमधून थेट मॅग्नेशियम शोषू शकते आणि परिणाम लवकर दिसून येतील.
एप्सम मिठाचे तयार द्रावण कुंडीतील मातीत ओतण्यापूर्वी माती लहान कुदळ किंवा उपकरणाने हलकी सैल करा. माती उलटी-सुलटी केल्याने हवा आणि ऑक्सिजन मातीत पोहोचू शकेल. तसेच एप्सम मिठाचे तयार द्रावण मुळांमध्ये खोलवर जाते. त्यामुळे माती मऊ होते आणि मृत रोप पुन्हा हिरवेगार होण्यास मदत होते.
एप्सम मीठ कुठे मिळेल?
एप्सम मीठ खरेदी करणे खूप सोपे आहे. तुम्हाला ते तुमच्या जवळच्या खत-बियाणे दुकानात किंवा हार्डवेअर स्टोअरमध्ये मिळेल. ते मेडिकल स्टोअरमध्येदेखील उपलब्ध आहे. कारण- त्याचा वापर पेन किलर म्हणूनही केला जातो.
फक्त एवढेच करणे पुरेसे नाही; परंतु तुळशीचे रोप का कोमेजते हेदेखील तपासावे लागेल. जर रोपाला खूप मंजिऱ्या असतील, तर त्या ताबडतोब काढून टाका. कारण- त्या रोपाची ऊर्जा शोषून घेतात. त्याव्यतिरिक्त बुरशीजन्य संसर्ग टाळण्यासाठी तुम्ही मातीत थोडीशी कडुलिंबाची पेस्ट किंवा हळद पावडर घालू शकता.
तुळस हिरवीगार कशी करावी?
एप्सम मिठाचे द्रावण टाकल्यानंतर तुळशीचे रोप सकाळी चार-पाच तास सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी ठेवा. दुपारच्या प्रखर उन्हापासून त्याचे रक्षण करा. मातीचा वरचा थर कोरडा दिसेल तेव्हाच पाणी द्या. जास्त पाणी दिल्याने मुळे कुजू शकतात. म्हणून पाणी आणि सूर्यप्रकाशाचे योग्य संतुलन एप्सम मिठाचे द्रावण तुळशीच्या रोपाला टवटवीत करेल.
