Gardening Tips How To Make Onion Peel Fertilizer : बहुतेक घरांमध्ये भाजी बनवण्यापासून ते सलाडमध्ये कांद्याचा वापर केला जातो, परंतु कांद्याच्या साली कचऱ्यात फेकून दिल्या जातात. मात्र, त्या फेकून न देता त्यापासून झाडांसाठी अत्यंत उपयुक्त खत बनवता येते. कांद्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, झिंक आणि अनेक पोषक घटक आढळतात, जे झाडांची वाढ होण्यास आणि त्यांना फुले व फळे लागण्यास मदत करतात. यांचा वापर खत, मल्चिंग आणि कंपोस्ट तयार करणे अशा विविध पद्धतींनी केला जातो. जर तुम्हाला तुमच्या बागेतील रोपांना कोणत्याही रसायनांशिवाय निरोगी बनवायचे असेल, तर तुम्ही कांद्याच्या सालींचे द्रावण आणि खत तयार करू शकता. चला तर मग, झाडांमध्ये कांद्याच्या सालींचा वापर कसा करावा, ते पाहूया.
१. कुंड्यांमधील मातीवर कांद्याच्या साली पसरवा
कांद्याच्या साली झाडांच्या मातीवर पसरून ठेवाव्यात. या साली आच्छादनाचे (मल्चिंगचे) काम करतात, ज्यामुळे मातीमध्ये ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. यामुळे रोपांना सुकण्यापासून वाचवण्यास मदत होते. काही दिवसांनी या साली कुजून मातीत मिसळतात आणि झाडांना पोषणतत्त्वे देखील पुरवतात.
२. झाडांसाठी कांद्याच्या सालींचे लिक्विड फर्टिलायझर बनवा
तुम्ही कांद्याच्या सालींपासून द्रावण तयार करू शकता. यासाठी एक लिटर पाण्यात दोन मूठ कांद्याच्या साली टाका आणि २४ तास झाकून ठेवा. यानंतर पाणी गाळून घ्या. हे पोषक घटकांनी समृद्ध असे लिक्विड फर्टिलायझर तयार होते. हे पाणी झाडांच्या मुळांमध्ये दर १५ दिवसांतून एकदा टाकावे. यामुळे झाडांची वाढ झपाट्याने होते आणि भरपूर फुले व फळे येतात.
३. कांद्याच्या सालींचे सेंद्रिय खत तयार करा
कांद्याच्या साली, चहाची पत्ती आणि केळीची सालं एकत्र वाळवून बारीक करून घ्या. ही पावडर तुम्ही झाडांच्या मातीत मिसळू शकता. हे नैसर्गिक खताप्रमाणे कार्य करते आणि झाडांना आवश्यक पोषक घटक पुरवते.
४. कंपोस्ट खतामध्ये कांद्याच्या साली टाका
जर तुम्ही घरीच कंपोस्ट खत तयार करत असाल, तर त्यात कांद्याच्या साली देखील टाकू शकता. या साली सहज कुजतात आणि खताचा दर्जा सुधारण्यास मदत करतात. काही आठवड्यांत ती पूर्णपणे कुजून कंपोस्ट खताचा एक भाग बनतात.
