scorecardresearch

उद्यानांमुळे मुलांची एकाग्रता विकसित होण्यास मदत

शहरातील उद्यानांमुळे सामाजिक संबंध प्रस्थापित होतात. तसेच शारीरिक हालचाल करण्यासाठी जागा उपलब्ध होते. 

garden
(संग्रहित छायाचित्र)

पालकांनो, लक्ष द्या! जी मुले उद्यान अथवा हिरवळीच्या जवळपास मोठी होतात त्यांच्यामध्ये एकाग्रता विकसित होण्याची क्षमता इतरांच्या तुलनेत अधिक असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.

बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थच्या संशोधकांनी २००३-२०१३ या दरम्यान स्पेनमधील १ हजार ५०० मुलांची माहिती गोळा करून याबाबतचा निष्कर्ष काढला आहे.

मागील अभ्यासामध्ये शाळेभोवती आणि शाळेसमोर हिरवळ असल्यास सात ते १० वर्षे वयोगटातील मुलांच्या आकलनामध्ये अधिक प्रमाणात वाढ होत असल्याचे दिसून आले होते.

‘पर्यावरण स्वास्थ्य दृष्टिकोन’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या संशोधनामध्ये, घराच्या आसपास म्हणजेच घरापासून १००, ३०० आणि ५०० मीटर अंतरावर जर उद्यान आणि हिरवळ असेल तर मुलाच्या जन्मावेळी, चार ते पाच वर्षे आणि सात वर्षांच्या मुलावर काय परिणाम होतो, याचे विश्लेषण करण्यात आले.

संशोधकांनी यासाठी चार ते पाच वर्षे आणि सात वर्षांच्या मुलांसाठी दोन प्रकारच्या आकलन चाचण्या केल्या. यामध्ये ज्या मुलांच्या घराजवळ अधिक हिरवळ होती, त्यांची आकलनक्षमता इतर मुलांच्या तुलनेत अधिक आढळून आली.

मुलांच्या आरोग्य आणि मेंदूच्या विकासासाठी शहरांमध्ये अधिकाधिक उद्याने व हिरवळीची ठिकाणे असणे आवश्यक असल्याचे, इन्स्टिटय़ूटच्या संशोधकांनी म्हटले आहे.

शहरातील उद्यानांमुळे सामाजिक संबंध प्रस्थापित होतात. तसेच शारीरिक हालचाल करण्यासाठी जागा उपलब्ध होते.  उद्यानांमुळे हवा प्रदूषण आणि गोंगाट कमी होतो. तसेच उद्यानांमुळे नवीन पिढीच्या मेंदूचा आवश्यक असणारा विकास होण्यास मदत होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-10-2017 at 05:21 IST