Home Remedies for Toothache: दात हे आपल्या शरीरातील महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहेत. अन्न चावण्यापासून ते चेहऱ्याच्या सौंदर्यापर्यंत दातांची भूमिका मोठी असते. त्यामुळे दात स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत दातांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते. गोड पदार्थ, साखरयुक्त पेये, तोंडाची अपुरी स्वच्छता व दातांवर साचणारा थर यांमुळे दातांमध्ये कीड निर्माण होण्याचा धोका वाढतो. सुरुवातीला दातावर छोटासा काळा किंवा तपकिरी डाग दिसतो. पुढे त्या ठिकाणी छिद्र निर्माण होऊ शकते. कालांतराने थंड किंवा गरम पदार्थ खाताना संवेदनशीलता, दातदुखी आणि चावताना वेदना जाणवू शकतात.
मात्र, इथेच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. दातांमध्ये निर्माण झालेली कीड घरगुती पदार्थ चावून पूर्णपणे निघून जात नाही. दातांमध्ये छिद्र पडले असल्यास दंतचिकित्सकाकडून तपासणी आणि आवश्यक उपचार घेणे गरजेचे आहे. तरीही काही पदार्थांमध्ये असलेले नैसर्गिक घटक तोंडातील जीवाणूंवर परिणाम करण्यास किंवा दातदुखीमध्ये तात्पुरता आराम मिळवून देण्यास मदत करू शकतात.
मग स्वयंपाकघरातील असे कोणते दोन पदार्थ आहेत, ज्यांचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जातो? चला, जाणून घेऊया…
१. पहिला पदार्थ – लहान, पण गुणकारी
आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारा हा पदार्थ चवीसाठी जवळपास प्रत्येक घरात वापरला जातो. त्यामध्ये काही नैसर्गिक जंतुनाशक आणि दाह कमी करणारे गुणधर्म असल्याचे मानले जाते. त्यामुळे दातदुखी किंवा हिरड्यांच्या त्रासात काही प्रमाणात तात्पुरता दिलासा मिळू शकतो.
याचा वापर करताना प्रमाण आणि पद्धत महत्त्वाची आहे. कच्चा पदार्थ थेट दातांवर दीर्घकाळ चोळणे किंवा जास्त प्रमाणात वापरणे टाळावे. संवेदनशील हिरड्या असतील, तर अशा उपायांमुळे उलट जळजळ किंवा त्रास वाढू शकतो.
हा पदार्थ म्हणजे लसूण.
लसणातील काही संयुगांमध्ये जीवाणूंविरोधी गुणधर्म आढळतात. त्यामुळे पारंपरिक घरगुती उपायांमध्ये लसणाचा वापर केला जातो. मात्र, दातातील कीड बरी करण्यासाठी केवळ लसणावर अवलंबून राहणे योग्य नाही.
२. दुसरा पदार्थ – दातदुखीत दिलासादायी
दुसरा पदार्थ आकाराने छोटा असला तरी त्याचा वापर वर्षानुवर्षे घरगुती उपचारांमध्ये केला जातो. विशेषतः दातदुखीचा त्रास झाल्यास त्याचे नाव अनेकांना आठवते.
या पदार्थामध्ये युजेनॉल नावाचे संयुग आढळते. त्याला वेदनाशामक आणि जंतुनाशक गुणधर्म आहेत. त्यामुळे दातदुखीत तात्पुरता आराम मिळण्यास मदत होऊ शकते.
याचा वापर करताना थेट आणि मोठ्या प्रमाणात तेल दातांवर लावणे टाळावे. संवेदनशील हिरड्या किंवा तोंडात जखम असल्यास जळजळ होऊ शकते.
हा दुसरा पदार्थ म्हणजे लवंग
लवंग किंवा लवंग तेलाचा वापर दातदुखीसाठी पारंपरिक पद्धतीने केला जातो. मात्र, हा केवळ तात्पुरता उपाय समजावा. दातांमध्ये कीड वाढली असेल, छिद्र पडले असेल किंवा सतत वेदना होत असतील, तर दंतचिकित्सकांकडून उपचार करून घेणे आवश्यक आहे.
दात चमकदार ठेवण्यासाठी काय कराल?
दातांवर पिवळा किंवा काळा थर दिसत असल्यास केवळ घरगुती उपायांनी, तो पूर्णपणे निघेलच, असे नाही. दिवसातून किमान दोन वेळा फ्लोराईडयुक्त दंतमंजनाने दात घासणे, दातांमध्ये अडकलेले अन्नकण बाहेर काढून दात स्वच्छ करणे, गोड पदार्थांचे अतिसेवन टाळणे आणि नियमित दंततपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे.
दातदुखी, हिरड्यांतून रक्त येणे, चेहऱ्यावर सूज येणे किंवा दातात मोठे छिद्र दिसणे, अशी लक्षणे असल्यास विलंब न करता दंतचिकित्सकांचा सल्ला घ्या.
(टीप : ही माहिती सामान्य स्वरूपाची आहे. घरगुती उपायांमुळे दातातील कीड पूर्णपणे बरी होते किंवा दात मोत्यांसारखे शुभ्र होतात, असे समजू नये. योग्य निदान आणि उपचारांसाठी दंतचिकित्सकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
