Gas and Bloating Remedies: आजकाल चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे अनेकांना गॅस, अ‍ॅसिडिटी आणि पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. कधी जेवल्यानंतर पोट जड वाटतं, तर कधी आंबट ढेकर आणि पोटात गॅस झाल्यामुळे अस्वस्थता जाणवते. सतत बसून काम करणं, कमी पाणी पिणं, तळलेले पदार्थ जास्त खाणं आणि जेवल्यानंतर लगेच झोपणं यांसारख्या सवयींचाही पचनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी अनेकजण घरगुती उपायांचा आधार घेतात.

यामध्ये लसूण आणि कांद्याचाही समावेश केला जातो. योगगुरू बाब रामदेव यांनीही लसूण, कांदा आणि डाळिंब यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करण्याबाबत काही उपाय सुचवले आहेत. पण लसूण आणि कांदा खाल्ल्याने खरंच गॅसचा त्रास कमी होतो का? कच्चा लसूण सकाळी रिकाम्या पोटी खाणं योग्य आहे का? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास नेमका कशामुळे होतो?

पचनाच्या प्रक्रियेदरम्यान आतड्यांमध्ये गॅस तयार होणं ही सामान्य बाब आहे. मात्र, गॅस जास्त प्रमाणात तयार झाल्यास किंवा तो सहज बाहेर पडत नसल्यास पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. यालाच ब्लोटिंग असं म्हणतात. घाईघाईने जेवणं, जेवताना जास्त हवा गिळली जाणं, काही पदार्थ न पचणं, बद्धकोष्ठता आणि पचनसंस्थेशी संबंधित काही विकार यांमुळेही हा त्रास होऊ शकतो. काही लोकांना दूध, डाळी, विशिष्ट भाज्या किंवा जास्त तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर गॅसचा त्रास जाणवतो. रात्री उशिरा किंवा भरपेट जेवणं आणि जेवल्यानंतर लगेच झोपणं यामुळे अ‍ॅसिडिटीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे रात्रीचं जेवण हलकं ठेवणं आणि झोपण्यापूर्वी पुरेसं अंतर ठेवणं फायदेशीर ठरू शकतं.

लसूण आणि कांदा खाल्ल्याने गॅसचा त्रास कमी होतो का?

लसूण आणि कांदा हे आपल्या रोजच्या आहारातील महत्त्वाचे पदार्थ आहेत. त्यामध्ये विविध पोषक घटक असतात. मात्र, हे पदार्थ खाल्ल्याने गॅस किंवा ब्लोटिंगचा त्रास हमखास कमी होतो, असं ठोसपणे सांगता येत नाही.

विशेष म्हणजे, कांदा आणि लसूण यांमध्ये फ्रुक्टन्स नावाचे किण्वनशील कार्बोहायड्रेट्स असतात. काही संवेदनशील व्यक्तींमध्ये या घटकांमुळे आतड्यांमध्ये गॅस तयार होऊन पोट फुगणं किंवा पोटात दुखणं यांसारखी लक्षणं वाढू शकतात. बाबा रामदेव यांच्या सल्ल्यानुसार, लसूण आणि कांद्याचा आहारात समावेश करण्याचा विचार केला जात असला, तरी प्रत्येक व्यक्तीची पचनक्षमता वेगळी असते. त्यामुळे हे पदार्थ खाल्ल्यानंतर तुम्हाला आराम मिळतो की त्रास वाढतो, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाणं योग्य आहे का?

गॅस आणि अ‍ॅसिडिटीपासून आराम मिळावा म्हणून काहीजण सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या खातात. मात्र, हा उपाय सर्वांसाठी योग्य असेलच असं नाही.

कच्चा लसूण काही व्यक्तींमध्ये छातीत जळजळ, पोटात अस्वस्थता किंवा अ‍ॅसिड रिफ्लक्सची लक्षणं वाढवू शकतो. त्यामुळे आधीपासून अॅसिडिटीचा त्रास असणाऱ्यांनी रिकाम्या पोटी कच्चा लसूण खाण्याबाबत विशेष काळजी घ्यावी. लसूण खायचा असल्यास तो शिजवून आणि कमी प्रमाणात आहारात समाविष्ट करून पाहू शकता. त्यानंतरही त्रास जाणवत असल्यास त्याचं सेवन टाळावं.

लसूण-कांदा खात नसाल तर डाळिंब खाणं फायदेशीर ठरेल का?

लसूण आणि कांदा खाणं पसंत नसणाऱ्यांसाठी डाळिंब हा पौष्टिक पर्याय ठरू शकतो. डाळिंबामध्ये फायबर आणि विविध अँटिऑक्सिडंट्स असतात. मात्र, डाळिंब खाल्ल्याने गॅस किंवा अ‍ॅसिडिटीचा त्रास थेट कमी होतो, याचे ठोस पुरावे मर्यादित आहेत.

डाळिंबाचा आहारात समावेश करताना आपल्या पचनाला ते मानवतं का, हे पाहावं. काही व्यक्तींना फायबरयुक्त पदार्थांचा फायदा होऊ शकतो; तर काहींना विशिष्ट प्रमाणात खाल्ल्यानंतर पोट फुगल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे केवळ एखाद्या घरगुती उपायावर अवलंबून न राहता, गॅसचा त्रास कशामुळे वाढतो हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे.

गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास टाळण्यासाठी या ५ सवयी बदला

१. जेवताना घाई करू नका- अन्न व्यवस्थित चावून आणि हळूहळू खा. घाईघाईने खाल्ल्याने जास्त हवा गिळली जाऊ शकते, ज्यामुळे पोट फुगण्याचा त्रास होऊ शकतो.

२. एकाच वेळी भरपूर खाणं टाळा- एकदम भरपेट जेवण्याऐवजी योग्य प्रमाणात खा. कोणते पदार्थ खाल्ल्यानंतर त्रास वाढतो, हे समजून घेण्यासाठी अन्न आणि लक्षणांची नोंद ठेवणंही उपयोगी ठरू शकतं.

३. जेवल्यानंतर लगेच झोपू नका- जेवणानंतर काही वेळ हलकं चालणं फायदेशीर ठरू शकतं. विशेषतः अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास जेवल्यानंतर लगेच आडवं होणं टाळा.

४. दिवसभर पुरेसं पाणी प्या- पुरेसं पाणी पिणं पचनक्रियेला मदत करतं आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यास उपयोगी ठरू शकतं. मात्र, पाण्याचं प्रमाण तुमची तहान, हवामान आणि शारीरिक गरज यांनुसार ठेवा.

५. तळलेले आणि त्रास वाढवणारे पदार्थ कमी करा- अतितेलकट पदार्थ, मोठ्या प्रमाणातील जेवण आणि काही विशिष्ट खाद्यपदार्थांमुळे गॅस किंवा अॅसिडिटी वाढू शकते. त्यामुळे आपल्या शरीराला न मानवणारे पदार्थ ओळखून त्यांचं सेवन मर्यादित करा.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

गॅस आणि पोट फुगण्याचा त्रास वारंवार होत असेल, दीर्घकाळ टिकत असेल किंवा त्यासोबत तीव्र पोटदुखी, सतत उलट्या, वजन अनपेक्षितपणे कमी होणं, शौचात रक्त दिसणं किंवा शौचाच्या सवयींमध्ये सतत बदल होणं अशी लक्षणं असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. लसूण, कांदा किंवा डाळिंब हे गॅस आणि अ‍ॅसिडिटीवरील हमखास उपचार नाहीत. योग्य आहार, नियमित हालचाल आणि आपल्या शरीराला न मानवणारे पदार्थ ओळखणं यामुळे पचनाशी संबंधित तक्रारी नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते.