Gas, Bloating And Indigestion Home Remedies: भारतीय स्वयंपाकघरात असणारे अनेक मसाले केवळ पदार्थाची चव वाढवत नाहीत, तर पारंपरिक आयुर्वेदात त्यांचा उपयोग विविध आरोग्यविषयक समस्यांसाठीही केला जातो. हिंग, काळं मीठ आणि लिंबाचा रस हे त्यापैकीच एक साधं मिश्रण आहे. विशेषतः पोटाशी संबंधित तक्रारींमध्ये या तिन्हींचा वापर पारंपरिक घरगुती उपायांमध्ये केला जातो. आयुर्वेदिक तज्ज्ञ श्रेय शर्मा यांच्या मते, हिंग, काळं मीठ आणि लिंबाचा रस यांचा वापर पचनाशी संबंधित काही त्रासांमध्ये केला जाऊ शकतो. मात्र, हा घरगुती उपाय सर्वांसाठी योग्य असेलच असे नाही.
पचनक्रिया सुधारण्यास होऊ शकते मदत
आयुर्वेदात हिंग हे वातनाशक मानले जाते. त्यामुळे गॅस, पोट फुगणे आणि पचनाशी संबंधित अस्वस्थता कमी करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. काळं मीठ पचनक्रियेला चालना देण्यास मदत करू शकते, तर लिंबाच्या रसातून व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे या तिन्हींचे योग्य प्रमाणातील मिश्रण पचनासाठी उपयुक्त ठरू शकते.
गॅस आणि ब्लोटिंगचा त्रास होतोय?
जेवल्यानंतर वारंवार पोट फुगणे, गॅस किंवा जडपणा जाणवत असेल तर हिंग, काळं मीठ आणि लिंबाचा रस यांचा वापर काही लोकांना आराम देऊ शकतो. हिंगामुळे गॅसशी संबंधित अस्वस्थता कमी होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळेच पोट फुगणे किंवा अपचनासाठी अनेक पारंपरिक घरगुती उपायांमध्ये हिंगाचा समावेश केला जातो.
भूक मंदावली आहे? हे मिश्रण ठरू शकते उपयोगी
कधी कधी पचन बिघडल्यामुळे भूक कमी होणे किंवा जेवणाची इच्छा न होणे अशी समस्या जाणवते. लिंबाचा आंबटपणा आणि काळ्या मिठाची चव यामुळे तोंडातील चवीच्या संवेदना सक्रिय होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे पचनरसांच्या स्रावाला चालना मिळून भूक सुधारण्यास मदत होऊ शकते.
हे मिश्रण कसे घ्यावे?
हे मिश्रण तयार करण्यासाठी एका कप पाण्यात चिमूटभर हिंग आणि काळं मीठ घालून ते उकळून घ्या. गॅस बंद केल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला. हे पेय कोमट असताना घेता येते. मात्र, याचे सेवन किती प्रमाणात आणि किती वेळा करावे, हे व्यक्तीच्या आरोग्यस्थितीनुसार बदलू शकते. त्यामुळे नियमित सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
‘या’ लोकांनी मात्र काळजी घ्यावी!
हे मिश्रण नैसर्गिक असले तरी प्रत्येकासाठी ते योग्य असेलच असे नाही. हाय ब्लड प्रेशर असणारे, किडनीशी संबंधित आजार असणारे किंवा गंभीर आरोग्य समस्या असणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टर किंवा आयुर्वेदिक तज्ज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय याचे नियमित सेवन करू नये. तसेच गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास वारंवार होत असेल, तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता त्यामागचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
