Gas Stove Cleaning Tips : स्वयंपाक करताना गॅसची फ्लेम निळी दिसणे सामान्य आहे. मात्र, काही वेळा हीच फ्लेम पिवळी किंवा नारंगी दिसू लागते. अनेक जण याकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करतात. पण, फ्लेमचा रंग सतत बदलत असेल, तर त्यामागचे कारण जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
गॅस व्यवस्थित जळावा यासाठी गॅस आणि हवेचे योग्य प्रमाणात मिश्रण होणे आवश्यक असते. या मिश्रणात अडथळा निर्माण झाल्यास गॅस पूर्णपणे जळत नाही. त्यामुळे फ्लेम निळी न राहता, पिवळी किंवा नारंगी दिसू शकते.
बर्नरमध्ये घाण जमा होणे
गॅसची फ्लेम पिवळी होण्यामागे बर्नरमध्ये साचलेली घाण हे एक सामान्य कारण असू शकते. स्वयंपाक करताना तेल, मसाले, दूध किंवा अन्नाचे बारीक कण बर्नरच्या छोट्या छिद्रांमध्ये अडकतात. त्यामुळे गॅसचा प्रवाह आणि हवा यांचे प्रमाण योग्य राहत नाही आणि फ्लेमचा रंग बदलू शकतो.
अशा वेळी गॅस कंपनीच्या सूचनांनुसार बर्नर काढून व्यवस्थित स्वच्छ करा. तो पूर्णपणे कोरडा झाल्यानंतरच पुन्हा शेगडीवर नीट ठेवा. बर्नरची छिद्रे मोठी करण्यासाठी किंवा खराब करण्यासाठी कोणतीही टोकदार वस्तू जोराने वापरू नका.
पिवळी फ्लेम दिसल्यास करू नका दुर्लक्ष
गॅसची फ्लेम बराच वेळ पिवळी किंवा नारंगी राहणे म्हणजे गॅस पूर्णपणे जळत नसल्याचे लक्षण असू शकते. अशा वेळी कार्बन मोनो-ऑक्साईड तयार होण्याचा धोका असतो. हा वायू विषारी असून, बंद किंवा कमी हवेशीर स्वयंपाकघरात समस्या अधिक गंभीर ठरू शकते.
त्यामुळे फ्लेम काही क्षणांसाठी नव्हे, तर सतत पिवळी दिसत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
बर्नर साफ केल्यानंतरही फ्लेम पिवळी असेल, तर काय करावे?
बसवल्यानंतरही फ्लेम पिवळी किंवा नारंगीच राहिली, तर शेगडीमध्ये इतर तांत्रिक समस्या असण्याची शक्यता आहे. बर्नरची कॅप योग्य पद्धतीने बसलेली आहे का, हेही तपासा. काही मॉडेल्समध्ये बर्नर कॅप चुकीच्या पद्धतीने बसल्याने फ्लेम असमान किंवा पिवळी दिसू शकते.
अशा वेळी शेगडीची स्वतःहून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. अधिकृत किंवा प्रशिक्षित तंत्रज्ञाकडून चुलीची तपासणी करून घेणे योग्य ठरेल.
ही लक्षणे दिसली, तर शेगडीचा वापर थांबवा
पिवळ्या फ्लेमबरोबर खालीलपैकी कोणतीही समस्या जाणवत असेल, तर विशेष काळजी घ्या—
- बर्नरमधून सतत पिवळी किंवा नारंगी फ्लेम येणे
- भांड्याच्या तळाला काजळी लागणे
- गॅस व्यवस्थित न पेटणे
- फ्लेम असमान किंवा खूप कमी होणे
- गॅसचा वास येणे
अशा परिस्थितीत गॅसचा वापर थांबवून तज्ज्ञांकडून तपासणी करून घेणे सुरक्षित आहे.
स्वयंपाकघरात हवा खेळती ठेवा
गॅसचा वापर करताना स्वयंपाकघरात योग्य व्हेंटिलेशन असणे महत्त्वाचे आहे. खिडक्या किंवा व्हेंटिलेशनची व्यवस्था बंद ठेवू नका. विशेषतः फ्लेम सतत पिवळी दिसत असल्यास खोलीत हवा खेळती राहत नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे स्वयंपाकघरात ताजी हवा येईल अशी व्यवस्था होणे आवश्यक आहे.
