Gauri Avahan 2026: गणेशोत्सवाच्या धामधुमीत बाप्पााच्या पाठोपाठ माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या लाडक्या गौराईच्या स्वागताची तयारी आता सुरू झाली आहे. सोन्याच्या पावलांनी येणाऱ्या महालक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी रांगोळ्या, फुलांची आरास आणि पारंपरिक पद्धतीने तयारी केली जाते. पहिल्या दिवशी थाटामाटात गौराईचे स्वागत, दुसऱ्या दिवशी पूजन आणि भोजनाचा नैवेद्य आणि तिसऱ्या दिवशी मनावर दगड ठेवून प्रत्येक जण बाप्पासोबतच गौराईचेही विसर्जन करतात.
ज्येष्ठ गौरी आवाहन मुहूर्त
शास्त्रानुसार, अनुराधा नक्षत्रावर आवाहन, ज्येष्ठ नक्षत्रावर पूजन आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्यात येतं. गौरी आवाहन गुरूवारी १७ सप्टेंबर २०२६ रोजी अनुराधा नक्षत्रात करायचं आहे. त्यानुसार संध्याकाळी ७ वाजून ५२ मिनिटांपूर्वी गौरीचं आवाहन करणे अत्यंत शुभ मानले गेले आहे. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्र सुरू होणार आहे. दुसऱ्या दिवशी गौरी पूजन शुक्रवारी १८ सप्टेंबर २०२६ या दिवशी ज्येष्ठ नक्षत्र दिवसभर असल्याने तुम्ही कधीही पूजा आणि नैवैद्य दाखवू शकता. तर गौरी विसर्जन शनिवारी १९ सप्टेंबर २०२६ या दिवशी मूळ नक्षत्रात सूर्योदयापासून दुपारी ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत करायचं आहे.
गौराईला घरात घेण्याची पद्धत
एका पाटावर ताट घेऊन त्यात एक किंवा दोन जशा गौरी तुम्ही बसवता, त्याप्रमाणे मुखवटे ठेवावेत. पाटाभोवती रांगोळी काढावी. आरतीचे ताट तयार ठेवावे. घरातील सुवासिनी महिलांनी मुखवट्याचे हळद-कुंकू, अक्षता वाहून औक्षण करून पूजा करावी. गौरीला यावेळी दूध-साखरेचा नैवेद्य दाखवावा. यावेळी तुळशीचेही पूजन करावे.
गौरी घरात घेताना काय म्हटले जाते?
एकजण म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली, मद दुसरी म्हणते धनधान्याच्या पावली, पुन्हा एकजण म्हणते गौरी आल्या कशाच्या पावली मद दुसरी म्हणते धनसंपदा सुखसमृद्धीच्या पावली, गारी आल्या कशाच्या पावली हळदी-कुंकूच्या पावली, गौरी आल्या कशाच्या पावली सौभाग्याच्या पावली, गौरी आल्या कशाच्या पावली सोन्याचांदीच्या पावली, गौरी आल्या कशाच्या पावली पाऊसपाणी, गुरंढोरं मुलाबाळांच्या पावली…अशा अनेक प्रकारे तुमच्या इच्छा यावेळी बोलून दाखवाव्या. कारण गौरी आपल्या घरी येताना भरभराट, धनसंपदा आणि सुखशांती घेऊन येतात.
गौरीचा नैवेद्य
गौरीचे घरात आगमन झाले की, तिला छान साज-शृगांर करून तिला सजवलं जातं. त्यानंतर तिला खास पालेभाजीचा आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. काही ठिकाणी अळूवडी, ढेसे अशा भाज्यांचाही समावेश असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिच्यासमोर पंचपक्वान्न ठेवले जातात.
