Gauri Naivedya 2026: दरवर्षी भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन केले जाते. यंदा १७ ऑगस्ट रोजी गौरी आवाहन असेल. गौराईचे मोठ्या थाटामाटात स्वागत केले जाते. पारंपरिक पद्धतीने गौरीला घरात घेतले जाते. त्यानंतर छान आरास करून गौराईला बसवले जाते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तीन दिवस गौराईला वेगवेगळे नैवेद्य दाखवले जातात. त्यांचे महत्व देखील असते. माहेरी आलेल्या गौराईचे जणू काही लाड पुरवले जातात अशाप्रकारे गौरीची पुजसेवा केली जाते. गौराई ज्या दिवशी येतात त्यादिवशी एक विशेष नैवेद्य त्यांना दाखवला जातो मग दुसऱ्या दिवशी खास गौरीचे जेवण असते यावेळी देखील साग्रसंगीत बेत करण्यात येतो आणि तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जनाला सुद्धा एक खास नैवेद्य गौरीला दाखवला जातो. मात्र हे नैवेद्य दाखवण्याची शास्त्रात शुद्ध पद्धत आहे. देवाला आपण जेव्हा भोग लावतो तेव्हा देवाने तो ग्रहण करण्यासाठी विशिष्ठ पद्धतीने नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते. त्यामुळे आज आपण पाहुयात गौराईला तीन दिवस कोणकोणते नैवेद्य दाखवले जातात व ते नैवेद्य कशाप्रकारे देवीला दाखवावे….
ग्रामीण भागात नैवेद्यात रान भाज्यांना स्थान दिले जाते. यामध्ये पालक-मेथी, चुका, आळू, अंबाडी, पत्ताकोबी, फुलकोबी, लाल भोपळा, गिलके, दोडका, गवार, वालाच्या शेंगा, कारले, भेंडी, पडवळ, शेवग्याच्या शेंगा, मिरची, दुधी भोपळा, चाकी, चवळी अशा भाज्या केल्या जातात. शहरी भागात प्रचलित भाज्या वापरतात. या नैवेद्यात आंबील आणि गुळवणीला फार महत्व आहे. ज्वारी भिजवून त्याचे ओलसर पीठ दही आणि पाण्यात शिजवून ही आंबील गुळाचा पाक किंवा दुधात मिसळून खाल्ली जाते.
१६ अंकाचे महत्व
गौरी उत्सवामध्ये १६ या अंकाचे विशेष महत्त्व आहे. १६ भाज्यांचा नैवेद्य अर्पण केल्याने गौरी प्रसन्न होते आणि घरात लक्ष्मी स्थिर राहते, तसेच घरात भरभराट आणि आनंद येतो, अशी श्रद्धा आहे. पूर्वी घरातील मुलगी १६ वर्षांची झाली की, परिपक्व झाली असे समजायचे. कन्येची स्त्री होण्याचं हे वय मानलं जायचं. याशिवाय १६ हा अंक मातृदेवतेचा असल्याने त्याला महत्व आहे. ज्येष्ठा गौरी या प्रत्येक घरी परंपरेनुसार आणल्या जातात. काही ठिकाणी मुखवट्याच्या, तर काही ठिकाणी खड्याच्या गौरी बसवतात. हा माहेरवाशींणींचा सण असून त्यांच्यासाठी आनंदाचा दिवस असतो. या दिवशी मुली माहेरी येतात आणि सुना त्यांच्या माहेरी गौरी पूजनासाठी जातात अशीही प्रथा अनेक भागात आहे.
गौरीला नैवेद्य दाखवण्याची पद्धत
शास्त्रीय पद्धतीने नैवेद्य कसा दाखवला जातो हे अनेकांना माहित नसते. बरेचजण घरातील ताटात देवीला नैवेद्य दाखवतात. मात्र असे करू नये यादिवशी खास केळीच्या पानात देवीला नैवेद्य दाखवावा. तसेच पानात सर्व पदार्थ व्यवस्थित मांडून घ्यावेत. मग पाण्याने एक चौकोन काढून ग्यावा व त्यावर नैवेद्याचे पान ठेवावे. पान ठेवताना देठ देवाकडे करावे. त्यानंतर पानाभोवती उजव्या हाताने पाणी फिरवून घ्यावे. काही चुकले तर देवीला हात जोडून माफी मागावी व आपला नैवेद्य ग्रहण करण्याची विनंती करावी
