Ghee Side Effects: भारतात तुपाशिवाय जेवणाची कल्पना केली जाऊ शकत नाही. बहुतेक पदार्थांमध्ये किंवा विविध प्रकारच्या मिठाईमध्ये तुपाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यासोबतच तूप अनेक आजारांमध्ये खूप फायदेशीरही मानले जाते. निरोगी आणि तंदुरूस्त शरीरासाठी खाणे खूप महत्त्वाचे आहे आणि त्यामध्ये तूप हे खूप फायदेशीर आहे. मात्र काही लोकांनी तुपापासून दूर राहणे योग्य ठरते. तुपाचे सेवन आरोग्याशी संबंधित अनेक आजारांमध्ये हानिकारक ठरू शकते आणि हा आजार अधिक गंभीरही बनवू शकते. आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. रेखा राधामोनी यांनी तुपाबाबतचे काही फायदे आणि तोटे सविस्तर सांगितले आहेत…

तुपातील पोषक घटक

तुपाचे सेवन पचन आणि हाडे मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी ठरू शकते. तुपात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन के, प्रोटीन, कॅल्शियम, हेल्दी फॅट्स, पोटॅशियम आणि फॉस्फरस यासारखे अनेक पोषक घटक असतात. ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात.

कमकुवत पचनक्रिया असणाऱ्यांनी तूप टाळा

पचनाची समस्या वारंवार होत असेल तर त्या लोकांनी तूपाचे सेवन टाळावे. अशा परिस्थितीत तुपाचे सेवन केल्याने पचनसंस्था बिघडू शकते. त्यामुळे पोटदुखी, सूज आणि पित्त यासारखे त्रास होऊ शकतात. कमकुवत पचनशक्ती असलेल्या लोकांनी तुपापासून दूर राहावे किंवा मर्यादित प्रमाणात सेवन करावे.

कोलेस्ट्रॉल समस्या

हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येने ग्रस्त असलेल्या लोकांनी जास्त तूपाचे सेवन करू नये. जास्त प्रमाणात याचे सेवन केल्याने हाय ब्लड प्रेशर आणि हार्ट संबंधित समस्येचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत तूपाचे जास्त सेवन करू नये.

लिव्हरची समस्या

फॅटी लिव्हर, लिव्हर सिरोसिस किंवा लिव्हरशी संबंधित समस्यांनी ग्रस्त असलेल्या लोकांनी तुपाचे सेवन करू नये. तुपात मोठ्या प्रमाणात सॅच्युरेटेड फॅट असते, त्यामुळे लिव्हरवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो.