Ghee VS Olive Oil: भारतीय स्वयंपाकघरात तेलाची निवड ही केवळ आरोग्याशी संबंधित नसून ती चव, सवयी आणि आठवणींशी जोडलेली असते. वरणावरील तुपाची धार आपल्याला बालपणात घेऊन जाते, तर ऑलिव्ह ऑईलचा वापर हा ‘आधुनिक’ जीवनशैलीचे प्रतीक मानला जातो. मात्र, ‘आधुनिक’ म्हणजे नेहमीच आरोग्यदायी असते का? आणि परंपरा नेहमीच सुरक्षित असतात का? भारतीय आहार आणि बदलती जीवनशैली पाहता या दोन्हीपैकी नेमके काय श्रेष्ठ आहे याबाबत सविस्तर जाणून घेऊ…
हा तुलनात्मक अभ्यास महत्त्वाचा का?
भारतात हृदयविकार, डायबिटीज आणि लठ्ठपणाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (ICMR)नुसार, आपल्या आहारातील स्निग्ध पदार्थ (Fats) या आजारांना थेट निमंत्रण देतात. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशनच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, केवळ एकाच प्रकारच्या तेलावर अवलंबून न राहता विविध प्रकारच्या तेलांचा समतोल राखणे आवश्यक आहे.
तूप: परंपरा आणि मर्यादा
तूप शतकानुशतके भारतीय आहाराचा भाग आहे. मसाल्यांसोबत आणि जास्त तापमानावर शिजवण्यासाठी तूप उत्तम मानले जाते.
तूप जीवनसत्व अ, ड, ई आणि के (A, D, E, K) ने समृद्ध असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी फायदेशीर ठरते. यातील ‘ब्युटीरेट’ हे घटक पचनसंस्थेला बळकटी देतात. शारदाकेअर-हेल्थसिटीचे तज्ज्ञ डॉ. नीरज कुमार सांगतात की, “तूप हे ‘सॅच्युरेटेड फॅट्स’ने समृद्ध असते. याचे अतिसेवन केल्यास रक्तातील एलडीएल (LDL) कोलेस्ट्रॉल वाढून हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.”
तूप भारतीय स्वयंपाकासाठी योग्य आहे, पण त्याचा वापर मर्यादित असावा.
ऑलिव्ह ऑईल: आरोग्यदायी पण मर्यादा
ऑलिव्ह ऑईल, विशेषतः ‘एक्स्ट्रा व्हर्जिन’, हे मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्सने समृद्ध असते, जे हृदयासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. जागतिक स्तरावर ‘मेडिटेरेनियन डाएट’मध्ये याचा समावेश असून यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
भारतीय पद्धतीचे ‘डीप फ्राय’, फोडणी किंवा जास्त उष्णतेवर बनवल्या जाणाऱ्या पदार्थांसाठी ऑलिव्ह ऑईल (विशेषतः एक्स्ट्रा व्हर्जिन) फारसे योग्य नसते. उच्च तापमानाला याची गुणवत्ता खालावते. सॅलड, हलके परतून केलेले पदार्थ (Sautéing) आणि पदार्थावर वरून टाकण्यासाठी हे सर्वोत्तम आहे.
‘स्मोक पॉईंट’चे शास्त्र काय सांगते?
स्वयंपाक करताना तेलाचा ‘स्मोक पॉईंट’ (ज्या तापमानाला तेल धूर सोडू लागते) महत्त्वाचा असतो.
तूप: याचा स्मोक पॉईंट जास्त (सुमारे २३०°C) असल्याने तळण्यासाठी आणि भाजण्यासाठी ते सुरक्षित आहे.
ऑलिव्ह ऑईल: एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑईलचा स्मोक पॉईंट कमी (१६०-१९०°C) असतो. त्यामुळे भारतीय पद्धतीची फोडणी किंवा तळण्यासाठी ते वापरणे आरोग्याला घातक ठरू शकते, कारण उच्च तापमानाला त्यात हानिकारक घटक तयार होऊ शकतात.
भारतीय शरीर आणि जीवनशैलीचा वास्तव
केवळ तेलाची निवड करून आरोग्य सुधारत नाही. शारीरिक हालचालींचा अभाव आणि आहारात पिष्टमय पदार्थांचे (Carbs) अतिप्रमाण असल्यास कोणतेही तेल घातक ठरू शकते. डॉ. नीरज कुमार यांच्या मते, “भारतीयांसाठी समतोल राखणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे. पारंपारिक स्वयंपाकात तुपाचा थोडा वापर आणि हृदयाच्या आरोग्यासाठी आधुनिक पदार्थात ऑलिव्ह ऑईलचा वापर करावा.”
निकालात कोण ठरले उजवे?
या युद्धात कोणीही एक विजेता नाही. दोन्हीचे आपापले फायदे आहेत.
तूप: पारंपारिक जेवण, पचन आणि उच्च तापमानासाठी उत्तम.
ऑलिव्ह ऑईल: हृदयाचे आरोग्य आणि आधुनिक, कमी उष्णतेच्या स्वयंपाकासाठी उत्तम.
तज्ज्ञांचा सल्ला
१. पोळी, डाळ आणि पारंपारिक जेवणात अल्प प्रमाणात तूप वापरा.
२. सॅलड्स आणि पाश्चात्य पद्धतीच्या स्वयंपाकात ऑलिव्ह ऑईल वापरा.
३. एकच तेल वापरण्याऐवजी तेलांची अदलाबदल (Rotate) करत राहा.
तूप किंवा ऑलिव्ह ऑईलची निवड ही भावनिक नसून व्यावहारिक असावी. परंपरेला पूर्णतः फाटा न देता आणि आधुनिकतेचे आंधळेपणाने अनुकरण न करता, या दोन्हीचा समतोल राखणे हेच दीर्घकालीन आरोग्याचे रहस्य आहे.
