Ginger Water Benefits After Lunch : हिंदी चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ. आज कलाविश्वात जॅकी यांचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचा प्रत्येक सिनेमा त्या काळात बॉक्स ऑफिसवर गाजला. उत्तम अभिनय, स्वभावातील साधेपणा आणि पर्यावरणप्रेमी असल्यामुळे जॅकी श्रॉफ यांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

झाडे आणि वनस्पतींना आपले मित्र मानले पाहिजे असे ते अनेकदा म्हणतात आणि जिथे कुठे जातात, तिथे अनेकदा झाडे बरोबर घेऊन जातात आणि लोकांनाही अधिकाधिक झाडे लावण्याचे आवाहन करतात. याचबरोबर, वयाच्या ६९व्या वर्षीही जॅकी श्रॉफ आपल्या फिटनेससाठी ओळखले जातात. नियमित दिनचर्या आणि आहाराकडे दिलेले लक्ष हे त्यांच्या फिटनेसचा महत्त्वाचा भाग असल्याचे ते अनेकदा सांगताना दिसतात.

जॅकी श्रॉफ यांनी अलीकडेच त्यांना आल्याचे पाणी प्यायला आवडते याबद्दल सांगितले आहे. आले वाटून, पाण्यात उकळून जेवणानंतर किंवा दिवसातून एकदा पिण्याचा सल्ला अभिनेत्याने दिला आहे. हे लक्षात घेऊन, जेवणानंतर आल्याचे पाणी पिणे खरोखरच फायदेशीर आहे का? याबद्दल समजून घेण्यासाठी इंडियन एक्सप्रेसच्या टीमने ठाण्यातील केआयएमएस (KIMS) रुग्णालयाच्या मुख्य आहारतज्ञ डॉक्टर अमरीन शेख यांच्याशी संवाद साधला.

डॉक्टर म्हणतात की, आल्याचे पाणी तुमच्या दैनंदिन दिनचर्येत समाविष्ट करण्यासाठी एक “सोपा आणि आरोग्यदायी पर्याय” असू शकतो. आल्यामध्ये दाहशामक आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असलेले नैसर्गिक घटक असतात. हे पचनक्रियेस, पोट फुगणे आणि मळमळ कमी करण्यास मदत करतात. हवामानातील बदलांदरम्यान किंवा जड जेवणानंतर अनेकांना हे पेय विशेषतः आरामदायी वाटते.

रोगप्रतिकारशक्ती आणि आरोग्यासाठी ते किती फायदेशीर आहे?

शरीर उबदार ठेवण्यासाठी, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, विविध आरोग्य समस्या कमी करण्यासाठी भारतीय घरांमध्ये आल्याचा वापर फार पूर्वीपासून केला जात आहे. पण, डॉक्टर अमरीन शेख यांच्या मते, या एका पेयाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढू शकत नाही. पण, संतुलित आहार, चांगली झोप, नियमित व्यायाम, पुरेसे पाणी पिण्यासोबत आल्याच्या सेवनाने शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊ शकते.

कोणती खबरदारी घ्यावी?

आल्याचे सेवन मर्यादित प्रमाणातच करावे. जास्त प्रमाणात आल्याच्या सेवनाने काही लोकांना आम्लपित्त, छातीत जळजळ किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते. रक्त पातळ करणारी औषधे घेणाऱ्या किंवा विशिष्ट वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांनी नियमितपणे मोठ्या प्रमाणात आल्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आल्याचे पाणी पिण्याची योग्य पद्धत

पाण्यात आल्याचे काही ताजे तुकडे टाकून ते उकळा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. मात्र, त्यात साखर घालू नका. आल्याचे पाणी निरोगी जीवनशैलीचा एक भाग असू शकते. मात्र, ते पौष्टिक आहार किंवा कोणत्याही आजारावरील उपचारांचा पर्याय नाही. त्यामुळे त्याचे सेवन संतुलित आहार आणि नियमित व्यायामासोबत करणे योग्य ठरू शकते. चांगल्या सवयी दीर्घकाळ टिकतात. कारण – त्या सोप्या आणि नियमितपणे अंगीकारता येण्यासारख्या असतात. संतुलित जीवनशैलीबरोबर आल्याचे पाणी पिणे हीदेखील अशीच एक साधी सवय ठरू शकते.