Glaucoma Blindness Prevention: डोळ्यांशी संबंधित काही आजार असे असतात, जे सुरुवातीला कोणतीही ठळक लक्षणे दाखवत नाहीत; मात्र हळूहळू दृष्टीवर गंभीर परिणाम करतात. यातीलच एक अत्यंत धोकादायक आजार म्हणजे काचबिंदू. काचबिंदूमुळे आलेले अंधत्व कायमस्वरूपी असते आणि एकदा दृष्टी गेल्यानंतर ती पुन्हा मिळवता येत नाही. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, वेळीच निदान झाले तर काचबिंदूपासून होणारे अंधत्व टाळता येऊ शकते. मॅक्स मल्टी स्पेशालिटी केंद्रातील नेत्ररोग विभागातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉक्टर देवेंद्र सूद यांनी काचबिंदूची ओळख आणि तपासणीविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
काचबिंदू म्हणजे नेमके काय?
काचबिंदू हा डोळ्याच्या आतील दाब वाढल्यामुळे होणारा आजार आहे. या वाढलेल्या दाबामुळे दृष्टीस्नायूला (ऑप्टिक नर्व्ह) हळूहळू इजा होते. ही इजा वाढत गेल्यास दृष्टीक्षेत्र अरुंद होत जाते आणि अखेरीस अंधत्व येऊ शकते. विशेष म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णाला कोणताही त्रास जाणवत नाही, त्यामुळे हा आजार “मूक चोर” म्हणून ओळखला जातो.
डोळ्यांतील आतील दाबाचे महत्त्व
डॉक्टरांच्या मते, काचबिंदूची तपासणी करताना डोळ्यांतील आतील दाब हा एक अत्यंत महत्त्वाचा निकष आहे. अनेक वर्षांपासून या दाबाच्या मोजमापाच्या आधारे काचबिंदूची ओळख आणि उपचारांचा परिणाम तपासला जातो, त्यामुळे प्रत्येक तपासणीवेळी हा दाब मोजला जातो. सामान्यतः केवळ दाब जास्त आहे म्हणूनच काचबिंदू होतो असे नाही; तसेच काही वेळा कमी दाब असूनही काचबिंदू आढळू शकतो, म्हणूनच इतर तपासण्या तितक्याच आवश्यक ठरतात.
काचबिंदूची लक्षणे (Symptoms of Glaucoma)
- डोकेदुखी
- डोळे दुखणे
- उलट्या आणि मळमळ
- दृष्टी अस्पष्ट होणे
- डोळ्यांची जळजळ
वरील सर्व लक्षणे तुमच्यामध्ये आढळल्यास, तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जेणेकरून काचबिंदूचा धोका टाळता येईल.
सर्वांगीण तपासणी का गरजेची?
काचबिंदू ओळखण्यासाठी चार महत्त्वाचे घटक तपासले जातात-
- डोळ्यांतील आतील दाब
- दृष्टीस्नायूमधील रचनात्मक बदल
- दृष्टीक्षेत्रातील कार्यात्मक बदल
- आणि गोनियोस्कोपी ही विशेष तपासणी.
गोनियोस्कोपीद्वारे काचबिंदूचा प्रकार निश्चित करता येतो. काचबिंदूचा उपचार हा त्याच्या प्रकारावर अवलंबून असल्याने ही तपासणी अत्यंत आवश्यक आहे.
भारतीयांमध्ये तपासणी अधिक आवश्यक
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, भारतात डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती आणि नियमित तपासणीचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे काचबिंदू उशिरा आढळतो आणि तोपर्यंत मोठे नुकसान झालेले असते. चाळिशी ओलांडल्यानंतर दरवर्षी एकदा डोळ्यांची तपासणी करून घेणे अत्यंत आवश्यक आहे, जरी कोणतीही तक्रार नसली तरीही.
मधुमेह असलेले रुग्ण, कुटुंबात काचबिंदूचा इतिहास असलेले, जास्त क्रमांकाचा चष्मा वापरणारे किंवा दीर्घकाळ स्टेरॉइड औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याने अधिक वेळा तपासणी करून घ्यावी.
वेळेवर तपासणीच संरक्षणाची गुरुकिल्ली
काचबिंदूच्या तपासणीत केवळ डोळ्यांतील दाब मोजणे पुरेसे नाही, तर संपूर्ण आणि नियमित तपासणी आवश्यक आहे. वेळेवर निदान आणि सातत्याने पाठपुरावा केल्यास आजाराची तीव्रता वाढण्यापासून रोखता येऊ शकते. डोळ्यांची काळजी हीच दृष्टी टिकवण्याची खरी गुरुकिल्ली आहे, असे तज्ज्ञ सांगतात.
