Diabetes Weight loss Therapy Effect: भारतात डायबिटीज आणि लठ्ठपणाने ग्रस्त लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या दोन्ही समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विविध औषधे आणि उपचारपद्धती वापरल्या जातात. जीएलपी-१ (ग्लुकागॉन लाइक पेप्टाइड-१ ) थेरपी हा एक प्रभावी उपचार आहे. तो लठ्ठपणा आणि डायबिटीजच्या व्यवस्थापनासाठी वापरला जातो. या थेरपीमध्ये जीएलपी-१ हार्मोनचे कार्य करणाऱ्या औषधांचे सेवन केले जाते. ही औषधे शरीरातील इन्सुलिनचे उत्पादन वाढवतात, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतात, पोटातील अन्न पचनक्रिया मंदावतात आणि भूक कमी करतात. त्यामुळे वजन कमी होते.
नवी दिल्ली इथल्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधील एंडोक्राइनोलॉजी विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सप्तर्षी भट्टाचार्य यांनी स्पष्ट केले आहे की, भारतात जीएलपी-१ औषधांचा वापर झपाट्याने वाढत आहे. सेमाग्लुटाइड आणि टिर्झेपेटाइड यासारखी जीएलपी-१ आधारित औषधे डायबिटीज आणि लठ्ठपणाच्या नियंत्रणासाठी वापरली जात आहेत. ही औषधे पोटातील अन्न पचनाची प्रक्रिया मंदावतात, इन्सुलिनला मिळणारा प्रतिसाद सुधारतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भूक कमी करतात. तज्ज्ञांच्या मते, त्यांच्या निदर्शनास अशी एक केस आहे ज्यात ही थेरपी घेणाऱ्या एका महिलेला काही दुष्परिणाम जाणवले. तर मग जाणून घेऊया की, जीएलपी-१ थेरपीचा त्या महिलेच्या शरीरावर कसा परिणाम झाला…
जीएलपी-१ थेरपीचा शरीरावर कसा परिणाम होतो?
एका ४२ वर्षीय शालेय शिक्षिकेने लठ्ठपणा आणि टाईप-२ डायबिटीज नियंत्रणात आणण्यासाठी जीएपी-१ थेरपी सुरू केली. काही महिन्यातच तिची भूक मोठ्या प्रमाणात कमी झाली. ती कमी खाऊ लागली आणि अनेकदा जेवण टाळू लागली. या थेरपीमुळे तिचे वजन आणि रक्तातील साखरेची पातळी सामान्य झाली असली तरी तिच्या शरीरात थकवा आणि केस गळणे यासारख्या काही समस्या दिसू लागल्या. तपासणीनंतर असे आढळले की, त्या महिलेच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२, व्हिटॅमिन डी आणि लोहाची कमतरता होती. तज्ज्ञांनी सांगितले की, पोषणविषयक सल्ला, प्रोटीनयुक्त छोटे जेवण, हिरव्या भाज्य, दुग्धजन्य पदार्थ आणि सप्लिमेंट्सच्या माध्यमातून त्या महिलेच्या आरोग्यात सुधारणा झाली आणि तिने सुरक्षितपणे थेरपी सुरू ठेवली.
ही थेरपी घेतल्याने कोणते आजार होऊ शकतात?
ही समस्या भारतात अधिक गंभीर आहे. कारण आपला आहार आधीच कार्बोहायड्रेट्सवर आधारित आहे. यात तांदूळ, गहू आणि बटाटे यांचा समावेश असतो. आपल्या आहारात प्रोटीन, फळे आणि भाज्या यांचे प्रमाण कमी असते. या उपचारादरम्यान आहारावर काळजीपूर्वक लक्ष न ठेवल्यास शरीरात काही विशिष्ट पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते.
- लोह
- व्हिटॅमिन बी १२
- व्हिटॅमिन डी
- कॅल्शियम
- फोलेट
भारतात व्हिटॅमिन बी १२ची कमतरता आधीपासूनच सामान्य आहे. डायबिटीज रूग्णांना अनेकदा मेटफॉर्मिन देखील दिले जाते. त्यामुळे बी १२ची कमतरता आणखी वाढू शकते.
व्हिटॅमिन डी आणि फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्सवर प्रभाव
जीएलपी-१ थेरपी दरम्यान व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा धोका वाढू शकतो. लठ्ठ लोकांमध्ये व्हिटॅमिन डीची पातळी आधीच कमी असते. वेगाने वजन कमी झाल्यामुळे ही कमतरता आणखी वाढू शकते. या थेरपीमुळे व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के यासारख्या फॅटमध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्त्वांच्या शोषणावरही परिणाम होऊ शकतो.
प्रोटीन देखील महत्त्वाचे
प्रोटीन हे स्थूल पोषक तत्व नसले तरी, स्नायू टिकवून ठेवण्यासाठी ते आवश्यक आहे. जीएलपी-१ घेणारे लोक अनेकदा हलका आहार निवडतात. त्यामुळे प्रोटीनची कमतरता निर्माण होऊ शकते आणि एकूण पोषणावर परिणाम होऊ शकतो.
जीएलपी थेरपीदरम्यान पोषणाची काळजी कशी घ्यावी?
या परिस्थितीत कमी प्रमाणात पण उच्च पोषक तत्वांनी समृद्ध आहारावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.
थोडे थोडे आणि संतुलित जेवण घ्या
आपल्या आहारात दही, चीज आणि कडधान्यांचा समावेश करा
या उपचारासोबतच आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा
सुकामेवा आणि हंगामी फळे खा
जीएलपी-१ थेरपीदरम्यान सप्लिमेंट्स घेणे आवश्यक आहे का?
तज्ज्ञांच्या मते, काही केसेसमध्ये व्हिटॅमिन बी १२ आणि व्हिटॅमिन डी पूरकांची आवश्यकता भासू शकते. मात्र ते केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले पाहिजेत.
जीएलपी-१ थेरपी दरम्यान तज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची
उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांनी रूग्णाला हे समजावून सांगितले पाहिजे की हे औषध घेतल्याने भूक कमी होईल. त्यामुळे संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांनी रूग्णाला केवळ वजन कमी करण्यावरच नव्हे तर पोषणावरही लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला पाहिजे.
जीएलपी-१ थेरपी लठ्ठपणा आणि डायबिटीजवर उपचार करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. मात्र त्यामुळे खाण्याच्या सवयी बदलतात. त्यामुळे पोषक तत्वांची कमतरता निर्माण होऊ शकते. भारतासारख्या देशात हे महत्त्वाचे आहे. इथे पोषक तत्वांची कमतरता आधीच सामान्य आहे. योग्य आहार, देखरेख आणि वैद्यकीय सल्ल्याने या थेरपीचे फायदे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय मिळवता येतात.
