How to Grow Gokarna: घराच्या बाल्कनीत किंवा अंगणात फुलांनी बहरलेली हिरवीगार वेल पाहायला प्रत्येकालाच आवडते. त्यातही गोकर्णाच्या वेलीवर उमलणारी निळी आणि पांढरी फुलं घराचं सौंदर्य आणखी खुलवतात. अनेक जण आवडीनं गोकर्णाची वेल लावतात. सुरुवातीला वेल चांगली वाढते, पानंही दाट येतात; पण बराच काळ उलटूनही फुलं मात्र उमलत नाहीत. त्यामुळे अनेकांची निराशा होते.

तुमच्याही गोकर्णाच्या वेलीची अशीच अवस्था झाली असेल, तर घाईघाईनं महागडी खतं किंवा रासायनिक औषधं वापरण्याची गरज नाही. अनेकदा वेल निरोगी दिसत असली तरी मातीतील पोषणतत्त्वांचा अभाव, मातीचं बिघडलेलं पीएच संतुलन किंवा मुळांपर्यंत योग्य पोषण न पोहोचणं ही फुलं न येण्यामागची प्रमुख कारणं असू शकतात. योग्य काळजी घेतली, तर काही दिवसांतच वेलीवर पुन्हा कळ्या उमलू लागतात.

गोकर्णाची फुलं केवळ शोभेसाठीच उपयुक्त नाहीत, तर आयुर्वेदातही या फुलांना विशेष महत्त्व आहे. गडद निळ्या रंगाची फुलं कोणत्याही बागेचं सौंदर्य वाढवतात. अनेक ठिकाणी पूजा-अर्चेतही या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे ही वेल वर्षभर बहरलेली राहावी, अशी प्रत्येक बागप्रेमीची इच्छा असते.

बागकाम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, गोकर्णाच्या वेलीला किंचित आम्लयुक्त म्हणजेच ॲसिडिक माती अधिक अनुकूल असते. मातीचं संतुलन बिघडलं किंवा मुळांना बुरशीचा प्रादुर्भाव झाला, तर नवीन कळ्या येणं कमी होतं. त्याशिवाय वेलीला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला नाही, तर फुलांची संख्या घटते. त्यामुळे दररोज किमान चार ते सहा तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ही वेल ठेवणं आवश्यक आहे.

त्यासोबतच वाळलेली फुलं आणि सुकलेल्या फांद्या वेळोवेळी काढून टाकल्यास नवीन कळ्या फुटण्यास मदत होते. नियमित पाणी देताना माती कायम ओलसर राहील हे पाहताना पाणी साठणार नाही याचीही काळजी घ्यावी. या छोट्या सवयींमुळे वेलीची वाढ अधिक जोमाने होते.

सोशल मीडियावर एका बागकामप्रेमीनं यासाठी अतिशय स्वस्त आणि घरच्या घरी करता येईल असा उपाय सांगितला आहे. विशेष म्हणजे हा उपाय करण्यासाठी महागडी खतं किंवा बाजारातील उत्पादनं विकत घेण्याची गरज नाही. स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या दोन साध्या पदार्थांपासून हे द्रावण तयार करता येतं. अनेकांनी हा उपाय करून वेलीवर पुन्हा भरपूर फुलं आल्याचा अनुभवही शेअर केला आहे.

जाणून घ्या २ रुपयांचा घरगुती उपाय

अर्धा लिटर स्वच्छ पाण्यात अर्धा चमचा कॉफी पावडर आणि अर्धा चमचा हळद मिसळा. हे मिश्रण चांगलं ढवळून तयार झालेलं द्रावण आठवड्यातून एकदा गोकर्णाच्या वेलीच्या मुळाशी घाला. कॉफीमुळे मातीतील नायट्रोजनचं प्रमाण वाढण्यास मदत होते, तर हळदीतील नैसर्गिक गुणधर्म माती निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात. त्यामुळे वेलीला आवश्यक पोषण मिळते, पानं हिरवीगार राहतात आणि नवीन कळ्या येण्यास मदत होते.

यासोबतच वेलीला दररोज चार ते सहा तास सूर्यप्रकाश मिळेल याची काळजी घ्या आणि सुकलेली फुलं नियमित काढत राहा. योग्य निगा आणि या सोप्या घरगुती उपायामुळे काही दिवसांतच गोकर्णाच्या वेलीवर पुन्हा सुंदर निळ्या फुलांचा बहर दिसू शकतो.

(टीप : हा उपाय सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. त्याचे परिणाम माती, हवामान आणि रोपाची स्थिती यानुसार बदलू शकतात.)