World Cancer Day 2026 : दरवर्षी ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) पाळला जातो. २०२६ मध्ये या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे, कारण कर्करोग आजही जगभरातील कोट्यवधी लोकांना प्रभावित करत आहे. आंतरराष्ट्रीय कर्करोग संशोधन संस्था (IARC)नुसार, २०२२ मध्ये जगभरात सुमारे २ कोटी नवीन कर्करोग रुग्ण नोंदवले गेले, तर ९.७ दशलक्ष लोकांचा कर्करोगामुळे मृत्यू झाला.

भारतामध्ये वाढती कर्करोगाची संख्या (Cancer burden in India)

भारतामध्ये कर्करोगाचा वाढता भार अधिक तीव्रपणे जाणवत आहे. २०२४ मध्ये देशात १५ लाखांहून अधिक कर्करोग रुग्ण नोंदवले गेले. भारतात कर्करोगाच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसते. २०१९ मध्ये १३.५ लाख प्रकरणे होती, जी २०२४ मध्ये १५.३ लाखांवर पोहोचली आहेत. तपशीलवार पाहिले तर, २०२० मध्ये १३.९ लाख, २०२१ मध्ये १४.२ लाख, २०२२ मध्ये १४.६ लाख, आणि २०२३ मध्ये १४.९ लाख कर्करोग रुग्णांचे निदान झाले.

‘युनायटेड बाय युनिक’ ही संकल्पना (United by Unique theme)

जागतिक कर्करोग दिन २०२६ ची संकल्पना (Theme) आहे – “United by Unique”. या संकल्पनेचा अर्थ असा की,”प्रत्येक व्यक्तीचा कर्करोगाशी लढण्याचा प्रवास वेगळा आहे, अनुभव वेगळे आहेत; पण तरीही आपण सर्वजण उत्तम उपचार, मजबूत आधारव्यवस्था आणि अधिक चांगले परिणाम या एकाच ध्येयासाठी एकत्र आहोत. कर्करोगाविरुद्धच्या या लढ्यात वैयक्तिक अनुभवांची दखल घेत, सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करणारी ही संकल्पना आहे.

“ही संकल्पना आजारापेक्षा माणसाला केंद्रस्थानी ठेवणारी आहे. कर्करोग उपचार म्हणजे केवळ वैद्यकीय प्रक्रिया नव्हे, तर प्रत्येक रुग्णाच्या गरजा, भावना आणि परिस्थिती समजून घेणारी व्यवस्था असावी,; असा यामागचा संदेश आहे. आरोग्ययंत्रणांनी रुग्णांच्या वैयक्तिक गरजांनुसार संवेदनशीलपणे प्रतिसाद द्यावा, यावर भर देते.

जागतिक कर्करोग दिन केवळ हॅशटॅग शेअर करण्यापुरता मर्यादित नाही. तो एक आठवण करून देणारा दिवस आहे की कर्करोगाविरुद्ध वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर ठोस कृती आवश्यक आहे. लवकर निदान (Early Detection) जीव वाचवू शकते, पण तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. स्तनांचा कर्करोग, गर्भाशय मुखाचा (सर्व्हायकल) कर्करोग, तोंडाचा (ओरल) कर्करोग आणि मोठ्या आतड्याच्या (Colon) किंवा मलाशयाच्या (Rectum/गुदाशय) भागात होणारा (कोलोरेक्टल) कर्करोग यांसाठीच्या तपासण्या अनेक भागांमध्ये अजूनही अनियमित आहेत.

भीती, सामाजिक कलंक आणि माहितीअभावी अनेक लोक तपासणी करणे टाळतात. त्याचप्रमाणे, जीवनशैलीतील साधे बदलही अनेकदा दुर्लक्षित राहतात. तंबाखूचे सेवन बंद करणे, मद्यपान मर्यादित ठेवणे, निरोगी वजन राखणे, नियमित व्यायाम करणे आणि पोषणमूल्यांनी समृद्ध आहार घेणे — हे उपाय कर्करोगाचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतात.

लवकर निदान का महत्त्वाचे? (Importance of early detection)

प्रतिबंध (Prevention) हे प्रभावी नक्कीच आहे. स्क्रीनिंग चाचण्या का महत्त्वाच्या आहेत आणि तरुणांनी कोणत्या तपासण्या कराव्यात, याबाबत TOI Healthला माहिती देताना अँड्रोमेडा कॅन्सर हॉस्पिटलच्या संचालक – सर्जिकल ऑन्कोलॉजी व ब्रेस्ट ऑन्कोलॉजी विभागातील डॉ. वैशाली झामरे यांच्या यांनी सांगितले की, लोक कर्करोगाचा इशार देणारी लक्षणे अनेकदा “काही गंभीर नाही” म्हणून दुर्लक्षित करतात. उदाहरणार्थ, स्तनात वेदनारहित गाठ, कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन घटणे, सतत जाणवणारा अतिशय थकवा, किंवा दीर्घकाळ टिकणारा खोकला, ही लक्षणे गंभीर आजाराची शक्यता दर्शवू शकतात, पण तरीही अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात.

याशिवाय, शौच किंवा लघवीच्या सवयींमध्ये बदल, असामान्य रक्तस्राव, बराच काळ बरा न होणाऱ्या जखमा, तसेच त्वचेतील अनोखे किंवा अचानक बदल हीही कर्करोगाची संभाव्य चेतावणीची चिन्हे असू शकतात. मात्र, ही लक्षणे अनेकदा किरकोळ समजून दुर्लक्षित केली जातात, ज्यामुळे निदान उशिरा होते.

तरुण वयोगटात वाढत असलेले कर्करोग आणि त्यांचे लवकर निदान कसे शक्य आहे?

अलीकडच्या काळात तरुण प्रौढांमध्ये काही कर्करोगांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. यामध्ये विशेषतः स्तन कर्करोग, कोलोरेक्टल (आतडे) कर्करोग, एंडोमेट्रियल (गर्भाशयाचा आतील थर) कर्करोग, थायरॉईड कर्करोग आणि मेलानोमा (त्वचा कर्करोग) यांचा समावेश आहे.

या कर्करोगांचे लवकर निदान करण्यासाठी स्क्रीनिंग तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. मॅमोग्राफी, कोलोनोस्कोपी, पॅप स्मीअर व HPV चाचणी, तसेच त्वचेची तपासणी (स्किन एक्झाम) या चाचण्या सामान्य कर्करोग लवकर आणि उपचारास तुलनेने सोप्या टप्प्यात ओळखण्यास मदत करतात.

मॅमोग्राफी

मॅमोग्राफीमध्ये कमी प्रमाणातील किरणोत्सर्ग वापरून स्तनाचे चित्र घेतले जाते. तिचा उपयोग फक्त ब्रेस्ट कॅन्सरची लवकर लक्षणे आणि सूक्ष्म बदल शोधण्यासाठी केला जातो. यामुळे कोणतीही शारीरिक लक्षणे दिसण्याच्या अनेक वर्षांपूर्वी सूक्ष्म बदल ओळखता येतात. परिणामी उपचार सोपे होतात आणि रुग्णाच्या बरे होण्याची शक्यता वाढते.

कोलोनोस्कोपी

कोलोनोस्कोपीद्वारे गुदद्वार आणि मोठ्या आतड्याच्या आत कॅमेऱ्याने तपासणी केली जाते. यामुळे सुरुवातीच्या टप्प्यातील कर्करोग ओळखता येतो, तसेच कर्करोगात रूपांतर होऊ शकणाऱ्या प्री-कॅन्सरस पॉलिप्स वेळेत काढून टाकता येतात.

World Cancer Day 2026
जागतिक कर्करोग दिन २०२६(फोटोसौजन्य -गुगल ट्रेंड)

पॅप स्मीअर आणि HPV चाचणी

पॅप स्मीअर आणि HPV चाचणी गर्भाशय मुखातील असामान्य पेशी ओळखतात आणि गर्भाशयाच्या कर्करोगास कारणीभूत ठरू शकणाऱ्या उच्च-धोका विषाणूंची माहिती कर्करोग होण्याच्या अनेक वर्षांपूर्वीच देतात. त्यामुळे लवकर हस्तक्षेप शक्य होतो.

त्वचेची तपासणी, डॉक्टरांकडून तसेच स्वतः नियमितपणे केल्यास, नवीन किंवा बदलणाऱ्या तीळ, डाग किंवा गाठी लवकर लक्षात येतात. हे बदल मेलानोमा किंवा इतर त्वचा कर्करोगांचे संकेत असू शकतात.

या सर्व तपासण्यांमुळे पूर्वीपेक्षा खूप वेगाने कर्करोगाचे निदान शक्य झाले आहे. निदान जितके लवकर, तितका उपचार अधिक प्रभावी आहे आणि त्यामुळेच या चाचण्या अनेकांचे प्राण वाचवत आहेत.

म्हणूनच, जागतिक कर्करोग दिनाला केवळ एक दिवसाची भावना किंवा सोशल मीडिया पोस्टपुरते मर्यादित ठेवू नये. आकडे समजून घेणे, वास्तव स्वीकारणे आणि कृती करणे, नियमित तपासण्या, जीवनशैलीतील बदल, आणि कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना आधार देणे, हे खरे उत्तर आहे.

कर्करोग वाढत असला, तरी त्याच वेगाने त्याच्याविरुद्ध लढण्याची आपली क्षमता देखील वाढत आहे. फक्त दररोज त्याला गांभीर्याने घेतले पाहिजे, केवळ ४ फेब्रुवारीला नाही.