दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांनी हॉलमार्क असलेले दागिने खरेदी करण्याची खात्री करण्यास सरकारने सांगितले आहे. यासंदर्भात ग्राहक व्यवहार विभागाच्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सने (BIS) एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटलंय की, आपण खरेदी केलेल्या सोन्याची शुद्धता कशी सुनिश्चित करावी आणि पैसे देऊन सर्वोत्तम सोनं कसं मिळवावं, याचं ज्ञान असणं महत्त्वाचं आहे.

“हॉलमार्क केलेले दागिने फक्त BIS नोंदणीकृत ज्वेलर्स विकू शकतात. तुमच्या जिल्ह्यातील BIS नोंदणीकृत ज्वेलर्सचे तपशील BIS च्या साइटवरून मिळू शकतात. गोल्ड हॉलमार्किंग हे धातूचे शुद्धता प्रमाणपत्र आहे. हॉलमार्क उघड्या डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नसल्यास, ज्वेलर्सकडून एक भिंग मागवा,” असे निवेदनात म्हटले आहे. दिवाळीत दागिन्यांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे सरकारकडून ग्राहकांना हा सल्ला दिवाळीच्या अगदी काही दिवस आधी देण्यात आला आहे. यासंदर्भात हिंदुस्तान टाईम्सने वृत्त दिलंय.

देशात १ जुलै २०२१ पासून सहा-अंकी अल्फान्यूमेरिक कोड लागू करण्यात आला. २३ जून २०२१ पासून देशातील २५६ जिल्ह्यांमध्ये १४, १८ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे. या २६५ जिल्ह्यांमध्ये किमान एक हॉलमार्किंग केंद्र आहे. नवीन नियमांनुसार, दागिने किंवा १४, १८, किंवा २२ कॅरेट सोन्याचे दागिने बीआयएस हॉलमार्कशिवाय विकल्यास, ज्वेलर्सला वस्तूच्या किंमतीच्या पाच पट दंड किंवा एक वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो. ग्राहकांची फसवणूक होऊ नये आणि त्यांना शुद्ध दागिने मिळावेत, यासाठी केंद्र सरकारने हा नियम बंधनकारक केला आहे.

सरकारी आदेशानुसार, सोने विक्रीच्या व्यवसायातील कोणताही उत्पादक, आयातदार, घाऊक विक्रेता, वितरक किंवा किरकोळ विक्रेता यांना बीआयएसमध्ये नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणी प्रक्रिया फक्त एक वेळा करावी लागले आणि त्यासाठी ज्वेलर्सकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.