Green Grapes vs Black Grapes Which Is Healthier: द्राक्षे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे फळ आहे. गोडसर चव, रसाळ गर आणि सहज खाता येण्यामुळे अनेकांच्या आहारात द्राक्षांचा समावेश असतो. बाजारात प्रामुख्याने हिरवी आणि काळी अशा दोन प्रकारची द्राक्षे पाहायला मिळतात. दोन्हींची चव काहीशी वेगळी असली, तरी पोषणमूल्यांच्या बाबतीत त्यांच्यात काही महत्त्वाचे फरक आहेत, त्यामुळे अनेकदा काळी द्राक्षे खावीत की हिरवी असा प्रश्न पडतो. हृदयाचे आरोग्य, पचन, रोगप्रतिकारशक्ती आणि शरीराला मिळणारे पोषक घटक या दृष्टीने कोणत्या द्राक्षांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरू शकते जाणून घेऊया.

काळ्या द्राक्षांचे आरोग्यदायी फायदे

काळ्या द्राक्षांमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते. हे घटक शरीरातील पेशींचे ऑक्सिडेटिव्ह तणावामुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करू शकतात. काळ्या द्राक्षांमध्ये रेस्व्हेराट्रोल नावाचे एक महत्त्वाचे संयुग आढळते. विशेषतः द्राक्षांच्या सालीमध्ये हे घटक असतात. रेस्व्हेराट्रोलमध्ये दाहशामक गुणधर्म असल्याचे काही संशोधनातून सूचित झाले आहे, त्यामुळे हृदय आणि मेंदूच्या आरोग्याच्या दृष्टीनेही या घटकाचा अभ्यास केला जात आहे.

आकाश हेल्थकेअरच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख गिन्नी कालरा यांच्या मते, काळ्या द्राक्षांमध्ये रेस्व्हेराट्रोलसह विविध अँटीऑक्सिडंट्स आढळतात. तसेच त्यात तंतुमय पदार्थ, जीवनसत्त्व क आणि जीवनसत्त्व के यांचे प्रमाणही चांगले असते. या द्राक्षांमध्ये फ्रुक्टोज नावाची नैसर्गिक साखर असते.

अँटीऑक्सिडंट्स शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास मदत करतात. मधुमेह, हृदयविकार आणि मेंदूशी संबंधित काही आजारांच्या जोखमीवर त्यांचा संभाव्य परिणाम काय होतो यावर संशोधन सुरू आहे. मात्र, केवळ काळी द्राक्षे खाल्ल्याने हे आजार टाळता येतात किंवा बरे होतात असे म्हणता येत नाही.

हिरव्या द्राक्षांचे फायदेही कमी नाहीत!

हिरवी द्राक्षेही पोषणमूल्यांच्या बाबतीत महत्त्वाची आहेत. त्यामध्ये जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व के, पोटॅशियम आणि तंतुमय पदार्थ आढळतात. याशिवाय फ्लॅव्होनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्सही असतात. हे घटक शरीरातील दाह कमी करण्यास आणि पेशींचे संरक्षण करण्यास मदत करू शकतात.

पीएसआरआय रुग्णालयाच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख देबजानी बॅनर्जी यांच्या मते, हिरव्या द्राक्षांमध्ये जीवनसत्त्व क, जीवनसत्त्व के, पोटॅशियम आणि तंतुमय पदार्थ चांगल्या प्रमाणात असतात. त्यामध्ये नैसर्गिक साखरेच्या स्वरूपात ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते.

हिरव्या द्राक्षांमध्येही रेस्व्हेराट्रोलसारखी संयुगे आढळतात. याशिवाय त्यातील फ्लॅव्होनॉइड्सचा शरीरातील चयापचय क्रिया आणि वजन नियंत्रणाशी असलेला संबंध अभ्यासला जात आहे. काही संशोधनांनुसार, अँटीऑक्सिडंट्सयुक्त आहार वजन निरोगी मर्यादेत राखण्यास मदत करू शकतो. हिरव्या द्राक्षांमधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते. मात्र, उच्च रक्तदाबावर उपचार म्हणून केवळ द्राक्षांवर अवलंबून राहू नये.

मग काळी की हिरवी, कोणती द्राक्षे खावीत?

काळी आणि हिरवी या दोन्ही प्रकारच्या द्राक्षांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, तंतुमय पदार्थ आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे दोन्ही प्रकारांचा संतुलित आहारात समावेश करता येतो. कोणती द्राक्षे निवडायची हे तुमची चव आणि आहारविषयक गरज यावर अवलंबून आहे.

तुम्हाला गोड चव आवडत असेल तर काळी द्राक्षे पसंतीस उतरू शकतात. अँटीऑक्सिडंट्सच्या दृष्टीनेही त्यांचा विचार करता येतो. दुसरीकडे, हिरवी द्राक्षे किंचित आंबटसर चवीची असल्याने ती आवडणाऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतात. मात्र, वजन नियंत्रणासाठी हिरवी द्राक्षे काळ्या द्राक्षांपेक्षा हमखास चांगली असतात असे नाही. दोन्ही प्रकारांमध्ये नैसर्गिक साखर असते, त्यामुळे प्रमाणात खाणे महत्त्वाचे आहे.

एकूणच काळी असोत किंवा हिरवी, द्राक्षे ही पौष्टिक फळे आहेत, त्यामुळे केवळ रंगावरून त्यांची निवड करण्याऐवजी आपल्या आवडीनुसार आणि आरोग्याच्या गरजेनुसार त्यांचा आहारात समावेश करा.