भारतात वाढतोय गेमिंगचा ट्रेंण्ड; करिअर पर्याय, ताण दूर करण्यासाठीही गेमिंगची केली जातेय निवड

अनेकांनी गेमिंगसाठी पीसीला प्राधान्य दिले आहे. पश्चिम भारतात ८८ टक्के गेमर्सनी गेमिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

पश्चिम भारतातील ७० टक्के गेमर्स गेमिंग पीसीवर ५०,००० ते १ लाखापर्यंत खर्च करण्यास तयार आहेत. (Image Source: Limelight)

मागील काही वर्षांपासून ऑनलाइन गेमिंगमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. भारतातही हा ट्रेंण्ड कायम असून पीसी गेमिंग हा ट्रेंण्ड सर्वाधिक वेगाने वाढत आहे. एचपी इंडिया गेमिंग लँडस्केप रीपोर्ट २०२१ नुसार, ८८ टक्के गेमर्सनी गेमिंगसाठी पीसीला प्राधान्य दिले आहे. हे प्राधान्य भारतातील पीसी गेमिंगच्या वाढीला प्रचंड संधी असल्याचे सुचित करत आहे. या सर्वेक्षणातील ३७ टक्के प्रतिसादकर्त्यांनी गेमिंगसाठी ते पीसीकडे वळत असल्याचे नमूद केले. एचपीच्या सर्वेक्षणानुसार गेमिंग आता फक्त मौजमजेची बाब राहिली नाही. गेमर्स ताण दूर करणे, सोशलायझिंग आणि कौशल्ये वृद्धिंगत करण्यासोबत गेमिंगकडे एक करिअर पर्याय म्हणूनही पाहत आहेत. पश्चिम भारतातील मुंबई, पुणे, अहमदाबाद आणि नागपूर अशा शहरांमध्ये असे चित्र दिसून येते.

गेमिंग एक करिअर पर्याय

पश्चिम भारतात ८८ टक्के गेमर्सनी गेमिंगमध्ये करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. विशेष म्हणजे पश्चिम भारतात पुरुषांच्या तुलनेत (८७ टक्के) अधिक महिला (९१ टक्के) गेमिंगचा प्रोफेशन म्हणून विचार करतात. तर नागपूरमधील ९६ टक्के आणि मुंबईमधील ९५ टक्के गेमर्सनी करिअरचा पर्याय म्हणून गेमिंगमध्ये अधिक रुची दाखवली आहे. एचपी इंडियाच्या पर्सनल सिस्टम्सचे प्रमुख नितिश सिंघल म्हणाले, “मागील १८ महिन्यांमध्ये भारतातील गेमिंग क्षेत्रात अतुलनीय वाढ झाली आहे. ताण कमी करण्यात आणि कौशल्ये वृद्धिंगत करण्यात गेमिंग महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. शिवाय यातून भारतातील तरुण प्रतिभावंतांना करिअरचा एक सुयोग्य पर्याय लाभत आहे. भारतीय पीसी क्षेत्रासाठी गेमिंगमध्ये प्रगतीच्या लक्षणीय संधी आहेत.”

मानसिक आरोग्य आणि सोशलायझिंगचा स्रोत

गेमिंगसंदर्भातील या बदलत्या दृष्टिकोनात गेमिंगला ताण हलका करण्याचा, आकलनात्मक कौशल्ये वृद्धिंगत करण्याचा आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा स्रोत म्हणून पाहण्यात महिला आघाडीवर आहेत. एचपी सर्वेक्षणानुसार, पश्चिम भारतातील ९६ टक्के महिला प्रतिसादकर्त्यांनी हे मान्य केले की गेमिंगमुळे ताण कमी होऊन सकारात्मक भावना वाढीस लागण्यात साह्य होते. त्याचप्रमाणे, ९४ टक्के महिला प्रतिसादकर्त्यांच्या मते गेमिंग हा रिलॅक्स होण्याचा उत्तम मार्ग आहे.

 गेमिंग पीसी खरेदीमधील ग्राहकांचा ट्रेंण्ड

एचपी सर्वेक्षणानुसार, पश्चिम भारतातील ७० टक्के गेमर्स गेमिंग पीसीवर ५०,००० ते १ लाखापर्यंत खर्च करण्यास तयार आहेत. विशेष म्हणजे, गेमिंग पीसीवर एक लाखांहून अधिक खर्च करण्याची तयारी मुंबईतील फक्त १९ टक्के गेमर्सने दाखवली आहे.

 कसं केलं सर्वेक्षण?

या सर्वेक्षणात मार्च आणि एप्रिल २०२१ यामध्ये  भारतातील २५ महानगरे, प्रथम आणि द्वितीय श्रेणी शहरांमधील १५०० प्रतिसादकर्त्यांना सहभागी करून घेण्यात आले. SEC A1, A2 आणि B1 विभागातील १५ ते ४० या वयोगटातील पुरुष (७२ टक्के) आणि महिलांच्या (२८ टक्के) मुलाखती यासाठी घेण्यात आल्या. सर्व प्रतिसादकर्ते पीसी किंवा मोबाइल फोन वापरकर्ते होते. ते पीसी आणि स्मार्टफोनवर अॅक्शन आणि अॅडव्हेंचर गेम्स खेळतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Growing trend of gaming in india career options gaming is also a choice to relieve stress ttg

Next Story
एचआयव्ही परिक्षणाने भारतात वाचतील लाखो प्राण
फोटो गॅलरी