Gudi Padwa 2026 Step-by-step process to Gudi: हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे, गुढी उभारणे हे केवळ परंपरेचे प्रतीक नसून ते विजय आणि समृद्धीचे लक्षण मानले जाते. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेनुसार खूप शुभ मानला जातो. म्हणून या दिवशी नव्या कामाची सुरुवात करणे फलदायी असते असे मानले जाते. महाराष्ट्रामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गुढी पाडव्यानिमित्त घरोघरी गुढ्या उभारलेल्या पाहायला मिळतात. शोभायात्रांसह नानाविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अन्य राज्यांमध्येही हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. गुढी पाडव्याच्या दिवशी गुढीला फार महत्त्व असते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या शुभ मुहूर्तावर लोक पहाटे लवकर उठून स्नान करतात. त्यानंतर गुढी तयार करुन पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार, गुढीपाडवा हा साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो.

यंदा हा सण गुरुवारी, १९ मार्च रोजी साजरा होणार आहे. हा दिवस मराठी नववर्षाची सुरुवातही मानला जातो. मात्र गुढी उभारण्याची पारंपरिक पद्धत अनेक नववधू किंवा कुटुंबापासून दूर राहणाऱ्या मुलांना माहित नसते. त्यामुळे आज आपण त्याबद्दल सविस्तर माहिती पाहुयात.गुढीपाडव्याला गुढी कशी उभारायची? गुढी उभारण्याची योग्य पद्धत, वेळ आणि मुहूर्त जाणून घ्या

गुढीपाडव्याची तिथी आणि तारीख

यंदा चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथी १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ०६ वाजून ५५ मिनिटांनी सुरू होणार असून. ती २० मार्च २०२६ पहाटे ०४ वाजून ५० मिनिटांपर्यंत असेल. अशा परिस्थितीत उदय तिथीनुसार १९ मार्च रोजी गुढीपाडवा हा सण साजरा केला जाईल.

गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त (Gudi Padwa Puja Muhurat)

हिंदी दिनदर्शिकेनुसार, गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त १९ मार्च रोजी सकाळी ०६ वाजून ४४ मिनिटांपासून ते सकाळी ०८ वाजून १४ मिनिटांपर्यंत आहे.

अभिजात मुहूर्त – दुपारी १२ वाजून ०४ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत असेल.

लाभ मुहूर्त – दुपारी १२ वाजून ४६ मिनिटांपासून ते दुपारी ०२ वाजून १७ मिनिटांपर्यंत असेल.

अमृत मुहूर्त – दुपारी ०२ वाजून १७ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल.

गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त

१९ मार्च रोजी संध्याकाळी ०५ वाजून १८ मिनिटांपासून ते संध्याकाळी ०६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत असेल.

गुढी कशी उभारावी? (how to make gudi on gudi padwa)

पूर्वतयारी

वेळ : गुढी सूर्योदयानंतर लगेच उभारली पाहिजे. (ब्रह्ममुहूर्तावर उठून अभ्यंगस्नान उरकून घेणे उत्तम).
जागा : घराच्या प्रवेशद्वारापाशी किंवा खिडकीत, जिथे बाहेरून सर्वांना दिसेल अशा उंच जागी गुढी उभारावी. ती जागा स्वच्छ करून तिथे रांगोळी काढावी.

गुढी कशी तयार करावी? (साहित्य आणि मांडणी)

  • काठी: एक मध्यम उंचीची बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्या.
  • वस्त्र: काठीच्या वरच्या टोकाला नवीन रेशमी वस्त्र (शक्यतो पिवळे, लाल किंवा जरीची काठ असलेली साडी/खण) बांधा.
  • गाठी आणि कडुलिंब: त्या वस्त्रासोबत साखरेची गाठी, कडुनिंबाची डहाळी आणि आंब्याची पाने एकत्र करून बांधा.
  • फुलांचा हार: झेंडूच्या फुलांचा हार गुढीला अर्पण करा.
  • तांब्या (कलश): सर्वात शेवटी, काठीच्या टोकावर तांब्याचा किंवा चांदीचा तांब्या (कलश) उपडा ठेवा. या तांब्यावर कुंकवाचे पाच बोटे (स्वस्तिक) काढावे.

गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी स्वच्छ धुवून घ्यावी. यानंतर काठीच्या वरच्या टोकाला एक स्वच्छ वस्र किंवा साडी गुंडाळली जाते. यावर मग, कडुलिंब, आंब्याची डहाळी, फुलांची आणि साखरेच्या गाठीची माळ बांधली जाते. या सर्व गोष्टी काठीला बांधून त्यांवर कलश तांब्या उपडा ठेवून तोसुद्धा घट्ट बसवावा.

सजवलेल्या काठीला अष्टगंध, हळद कुंकू वाहा. ज्यानंतर गुढी उभारण्यासाठीची जागा स्वच्छ करुन घ्या. खाली पाट ठेवा आणि त्याभोवती रांगोळी काढा. सर्व कुटुंबियांच्या उपस्थितीत पाटावर गुढी उभारा. तु्म्ही खिडकीला बांधून देखील गुढी उभारू शकता. आता गुढीसाठी आरतीचं ताट करुन ओवाळून घ्या.

गुढी उभारल्यानंतर

ब्रह्मध्वज नमस्तेरस्तु सर्वाभिष्ट फलप्रद।
प्राप्तेरस्मिन्वत्सरे नित्यं मदगृहे मंगल कुरु ।।

ही प्रार्थना म्हणावी. त्यानंतर पंचांगांचे पूजन करुन नववर्षाच्या पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. पुढे कडुलिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुलिंबाचे पाणी घ्यावे.

सूर्य मावळायला लागल्यावर त्याला नमस्कार करुन न गुढी उतरवून ठेवावी.