How To Celebrate Gudi Padwa At Home : काही तासांनंतर मराठी नववर्षाची सुरुवात होणार आहे. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांतील एक दिवस मानला जातो. अभ्यंगस्नान करून, गुढी उभारून, नवीन संकल्प करून शुभकार्याचा प्रारंभ करण्याचा हा दिवस आहे. त्यामुळे आपण या दिवसाची उत्सुकतेने वाट बघत असतो. तर यंदा गुढीपाडव्याचा सण १९ मार्च रोजी साजरा केला जाणार आहे.
या दिवशी आपण सकाळी लवकर उठून, दारात रांगोळी काढून, दारात फुलांचे तोरण लावून सजावट करतो. पण, उद्या गुढी उभारण्यासाठी लागणारे साहित्य, प्रसाद बनविण्यासाठी काय लागतं ते आणण्यासाठी तुमची आयत्या वेळी धावपळ होऊ नये म्हणून आज आम्ही तुम्हाला मदत करणार आहोत. आज आम्ही तुम्हाला गुढीपाडव्यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी देणार आहोत, ज्या वस्तू तुम्ही आजच मार्केटमधून विकत घेऊन या…
१. तुम्ही सकाळी अंघोळ केल्यानंतर सगळ्यात आधी दारात रांगोळी काढणार आहात.
ती रांगोळी काढण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :
- पांढरी आणि विविध रंगांची रांगोळी, रांगोळीचे पुस्तक, छापे.
- दारात लावायला फुलांचे तोरण.
- स्वस्तिक आणि ओमचे स्टिकर.
२. सगळ्यात पहिल्यांदा आपण पूजेचं ताट तयार करून घेतो.
त्यामुळे पूजेचं ताट तयार करून ठेवण्यासाठी तुम्हाला लागणारे साहित्य :
- आरतीचे ताट
- आरतीच्या ताटाखाली ठेवण्यासाठी लाल कपडा
- हळद
- कुंकू
- अक्षता
- वात घातलेला दिवा
- कापूर
- अगरबत्ती
- फुले
- घंटी
३. एकदा पूजेचे ताट तयार झाले की, मग आपण प्रसादाची तयारी करायला घेतो.
तर त्यासाठी तुम्हाला मार्केटमधून आणावे लागणारे साहित्य :
- मूठभर चणा डाळ, गूळ, कडुलिंब – हे सगळे पदार्थ एकत्र मिसळून प्रसादाची एक वाटी तयार करून घ्या.
- गूळ-खोबरे – खोबऱ्यात थोडेसे गूळ ठेवून द्या.
- तांब्या – त्यात पाणी भरून ठेवा.
- पान-सुपारी
४. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुढी उभारणे.
त्यासाठी काय साहित्य लागेल चला पाहूयात…
- बांबू / काठी
- गुढीसाठी वस्त्र
- आंब्याची पाने (डहाळे)
- कडुलिंब
- हार
- फुले
- नारळ
- घंटी
- पान-सुपारी
- पितळेचा तांब्या
गुढी उभारल्यानंतर नैवेद्य तयार करून घ्या. त्यासाठी आज संध्याकाळी मार्केटमधून केळीचे पान आठवणीने घेऊन या. केळीच्या पानात पुरणपोळी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, पापड, गोड पदार्थ ठेवा. तर उद्या गुढीपाडव्याची तयारी करण्यासाठी आजच मार्केटमधून आठवणीने या सगळ्या वस्तू, पदार्थ घेऊन या…
