मुंबई : करोनामुळे लागू र्निबध मुक्त केल्यामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर साजरा होणारा गुढीपाडवा यंदा सर्वत्र जल्लोषात साजरा होणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी विविध सांस्कृतिक संस्थांच्या वतीने संगीतिक कार्यक्रम, तसेच शोभायात्रांचे मोठय़ा प्रमाणावर आयोजन करण्यात आले आहे.‘सईशा फाऊंडेशन मुंबई’ यांच्या वतीने ढेपेवाडा येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, ढोल-ताशांचा गजर आणि महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणारी अशी ही शोभायात्रा असेल. तसेच २ आणि ३ एप्रिल रोजी ‘चैत्रोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी संध्याकाळी ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ या शिवचरित्राचे सादरीकरण करण्यात येणार आहे. शिल्पकार गणेश कुंभार यांनी साकार केलेल्या संतसृष्टीने महाराष्ट्राच्या संतांचे दर्शन घडणार आहे.‘हिंदू नववर्ष स्वागत समिती शिवडी’ यांच्यातर्फेही यंदा दोन वर्षांच्या खंडानंतर शिवडी नाका येथून शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. लेझीम, तसेच झेंडा पथकांचा या मिरवणुकीत समावेश असणार आहे.नववर्षांच्या स्वागतासाठी दादर येथे ‘आम्ही दादरकर’ आणि ‘वेध फाऊंडेशन’च्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ७ ते १० या वेळात ही शोभायात्रा निघणार असून फुलांनी सजवलेल्या रथामध्ये गुढी उभारून शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. रानडे रोडवरून भवानी शंकर मार्ग ते गोखले रोड मार्गे शोभायात्रा मार्गस्थ होणार आहे. ढोलताशा पथके तसेच लेझीम पथकासोबतच मल्लखांब, मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, तसेच भजन कीर्तनाचे कार्यक्रम आणि दुचाकीस्वारांच्या ताफ्याचा समावेश शोभायात्रेत करण्यात आला आहे.‘सॅफ्रॉन’ या संस्थेच्या वतीने विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात सकाळी ७ वाजता दिवाळी पहाटप्रमाणे गुढीपाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध संगीतकारांच्या उपस्थितीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून गायिका अदिती प्रभुदेसाई, श्रद्धा वेटे-मोकाशी यांच्यासह बासरी, ढोलकी, तबलावादकांच्या सहकार्याने ही पहाट रंगणार आहे.मराठी मनोरंजन क्षेत्रातही सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कला, क्रीडा, संस्कृती आणि आरोग्य या चारही क्षेत्रात मागील ५० वर्षे कार्यरत असलेली प्रबोधन गोरेगाव ही संस्था शुक्रवार १ एप्रिल रोजी आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्षांची सांगता करत आहे. या निमित्ताने प्रबोधन गोरेगाव संस्थेतर्फे सुप्रसिद्ध संगीतकार अजय, अतुल यांच्या अजय-अतुल लाईव्ह कॉन्सर्ट या संगीत मैफलीचा कार्यक्रम गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला सायंकाळी ६ वाजता मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथील प्रबोधन क्रीडांगण येथे आयोजित करण्यात आला आहे. मराठी नववर्षांचे स्वागतासाठी ‘शेलार मामा फाऊंडेशन’ आणि ‘प्लॅनेट मराठी’च्या वतीने शुक्रवारी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘चिरायू २०२२’ तर्फे मराठी कलाप्रांतात भरीव योगदान देणाऱ्या पडद्यामागच्या कलाकर्मीचा सन्मान करण्यात येणार आहे.