गौरी प्रधान

गुढीपाडवा.. नववर्षांची सुरुवात आणि ही सुरुवात आपण करतो नवीन खरेदीने. नवीन वर्षांत आपण काय खरेदी नाही करत? कधी कपडे, कधी दागिने, कधी गृहोपयोगी वस्तू तर कधी फर्निचरदेखील. नववर्षांच्या मुहूर्तावर अनेक घरांत अंतर्गत सजावट बदलण्याचेदेखील बेत शिजू लागतात, मग पाचारण केले जाते इंटेरियर डिझाइनरला.

March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
24 Year Old Women Pee Turned Black Like Cola Rush To ICU Are You Overdoing Perfect Ratio For Work and Exercise by dr Mehta
तुमचं शरीर किती थकतंय? ‘ही’ लक्षणे लगेच ओळखा; डॉ. मेहतांनी सांगितलं व्यायाम व कामाच्या वेळेचं परफेक्ट सूत्र
Experts also demand that the regulatory framework of Finetech needs to be reconsidered to reduce the pressure of regulations eco news
‘फिनेटक’च्या नियामक चौकटीचा पुनर्विचार आवश्यक; नियमावलीची जाचकता कमी करण्याचीही तज्ज्ञांची मागणी

घरात काय काय नवे हवे याची यादी तयार होऊ लागते. यात घरातील प्रत्येक सदस्य आपल्या परीने भर घालत असतात. आता तुम्ही म्हणाल, यात विशेष असे काय आहे? हा काही लेखाचा विषय होऊ शकतो का? पण जरा थांबा, आजचा आपला विषय घरात काय काय घ्या याविषयी नसून काय काय घ्यायचे टाळा हा आहे.

आपल्या संस्कृतीमध्ये घर घेण्याला प्रचंड महत्त्व आहे. बहुतेक माणसे आयुष्यात एकदाच घर घेतात आणि मग आपली बऱ्याच वर्षांची राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी घरात निरनिराळय़ा प्रकारचे फर्निचर करून घेण्याच्या मागे लागतात. यात काही वेळा गरजेपेक्षा हौसेला जास्त महत्त्व दिले जाते. जसे की, आम्हाला लहानपणी स्टडी टेबल मिळाले नाही मग ते आमच्या मुलांना मिळालेच पाहिजे, किंवा मला किनई डायिनग टेबलची भारीच हौस आहे इत्यादी इत्यादी.

आता तुम्ही जरी घर एकदाच घेता आणि ते एकदाच सजवता परंतु आम्ही इंटेरियर डिझाइनर मात्र अनेक घरे सजवतो; त्यामुळे आमच्या गाठीशी जे अनुभव येतात त्यातून कोणत्या घरासाठी काय आवश्यक आहे, हे आम्हाला त्यामानाने चटकन समजते.

आपल्या मुलांनी स्टडी टेबल वापरून अभ्यास करावा ही बहुतेक पालकांची अपेक्षा असते, त्यामुळे क्लाएंट आपल्या घरातील जागेचा, आपल्या पाल्याच्या सवयींचा विचार न करताच अगदी अशक्य असेल तर फोल्डिंग तरी स्टडी टेबल कराच म्हणून मागे लागतात. परंतु माझा अनुभव मात्र सांगतो की, शंभरपैकी नव्वद वेळा स्टडी टेबल ही निरुपयोगी आणि जागा खाणारी वस्तू ठरते. मुळात आपली शहरातील घरे ही जेमतेम असतात, त्यात बेडरूम किंवा लिव्हिंग रूममध्ये सगळे फर्निचर बसवून उरलेल्या जागेत कसेबसे स्टडी टेबल कोंबले जाते. जर स्टडी टेबल करायचेच असेल तर आधी आपले मूल स्टडी टेबल वापरून अभ्यास करण्यास तयार आहे का? त्याची सर्वसाधारण अभ्यासाची काय पद्धत आहे? आणि सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे पुढील किती वर्षे ते मूल स्टडी टेबल वापरणार आहे? कारण प्रत्येकाची अभ्यासाला बसण्याची एक आरामदायक पद्धत असते. जर आपले मूल स्टडी टेबलवर एका जागी बसून अभ्यास करू शकणार नसेल, तर त्यावर होणारा खर्च दुसरीकडे वळवून त्याऐवजी पुस्तकांचे कपाट, अथवा मुलांना स्वत:चा असा एखादा कोपरा देता येईल, जिथे फक्त छान आरामदायक खुर्ची किंवा बिन बॅग असेल आणि आजूबाजूला पुस्तके असतील. अगदी डेस्कटॉप वापरत असाल तर पुस्तकांच्या कपाटातच तीस इंचांवर एक खण डेस्क टॉपसाठी ठेवता येतो- ज्याच्या खाली की-बोर्डसाठी ड्रॉवर दिला की झाले काम.

यानंतर नियोजनपूर्वक केली तर घरातील सगळय़ात उपयुक्त अशी वस्तू म्हणजे डायिनग टेबल. डायिनग टेबल घेताना सर्वप्रथम घरात किती माणसे आहेत त्याप्रमाणे जागा आहे का, या साऱ्याचा ताळमेळ बसवणे महत्त्वाचे. मुळात डायिनग टेबल हे हौस म्हणून नव्हे तर गरज म्हणून घेतले पाहिजे- तर आणि तरच त्याचा योग्य प्रकारे वापर होतो. डायिनग टेबल जिथे ठेवले असेल तिथे त्याच्या आजूबाजूने फिरायला पुरेशी जागा असायला हवी. बरेचदा जागेअभावी डायिनग टेबल भिंतीला टेकवून ठेवले जाते, त्यातूनही डायिनग टेबलाची लांबीकडील बाजू भिंतीला टेकलेली असेल तर डायिनग टेबलच्या वापराची शक्यता अध्र्याहून कमी होते, त्यामुळे फार फार तर डायिनग टेबल ठेवताना त्याच्या रुंदीकडील कड भिंतीला टेकवून ठेवावी. दुसरा प्रकार म्हणजे वॉल माऊंट डायिनग टेबल. यामध्ये डायिनग टेबलच नाही तर इतर कोणतेही फर्निचर घेताना ते तसे घेण्यामागील भूमिका अगदी सुस्पष्ट असावी. खूप वेळा असे पाहण्यात येते की, आधी उत्साहाने वॉल माऊंट डायिनग घेतले जाते, पण थोडय़ाच काळात ते रोज काढा व ठेवा या खटाटोपीमुळे ते काढणेच बंद केले जाते. किंवा एकदाच उघडून परत बंदच नाही केले जात. याला पर्याय फोल्डिंग डायिनग टेबल होऊ शकतो, जे एका छोटय़ा कन्सोलसारखे दिसते आणि दोन्हीकडील किंवा एकच बाजूचा फोल्ड सहज बंदउघड करून वापरता येते.

जी गत डायिनग टेबलची तीच गत वॉल माऊंट बेडची. वॉल माऊंट बेड ही संकल्पना ऐकायला जितकी ग्लॅमरस वाटते तितकी ती प्रत्यक्षात ठरतेच असे नाही. ज्या ज्या समस्या वॉल माऊंट डायिनग टेबलच्या त्याच थोडय़ाफार फरकाने वॉल माऊंट बेडच्या. शिवाय यात खाली जागा तर रिकामी राहते, पण पुन्हा बसण्या- उठण्यासाठी वेगळा पर्याय बेडरूमध्ये द्यावाच लागतो. मग वॉल माऊंट बेडऐवजी सोफा कम बेड हा पर्याय जास्त उपयुक्त ठरतो. जागा तर कमी व्यापतोच त्याच सोबत दिवसा जेव्हा संपूर्ण बेडची आवश्यकता नसते, तेव्हादेखील एका व्यक्तीच्या झोपण्याची किंवा तीन लोकांना बसण्याची आरामशीर सोय होऊ शकते.

घरात जर लहान मुले असतील आणि त्यांना वेगळी खोली देता येत असेल तर पालकांचा उत्साह फारच दुणावतो. अगदी बंक बेडपासून ते कार्टून कॅरेक्टरचा वापर फर्निचरमध्ये करण्यापर्यंत अनेक गोष्टी केल्या जातात. हे असे इंटेरियर दिसायला उत्कंठावर्धक दिसते, मुलेदेखील त्याचा आनंदच घेतात, पण तरीही अशा प्रकारच्या फर्निचरचे आयुष्यमान फारच कमी असते, त्यामुळे मुलांचा वयोगट पाहून असे फर्निचर अथवा इंटेरियर करावे. साधारणपणे चार-पाच वर्षांच्या मुलांसाठी असे इंटेरियर करणे योग्य. कारण पुढील किमान पाच-सहा वर्षे ते वापरले जाते. मात्र तुमची मुले जर आठ वर्षांपुढील वयाची असतील तर मात्र अगदी बालिश इंटेरियरच्या मागे न लागणे बरे. त्याऐवजी मुलांना कॉन्टेम्पररी डिझाइन्स द्यावीत- जी त्यांना त्यांच्या किशोरवयापर्यंत आनंदाने वापरता येतील.

घरातील फर्निचर ही एक प्रकारची गुंतवणूकच असते- जी नियोजनबद्ध पद्धतीने केली तर आनंददायी ठरते. नवीन वर्षांच्या निमित्ताने योग्य गुंतवणुकीची सुरुवात करूयात, घरात तेच आणूयात जे आवश्यक आहे.