scorecardresearch

Gudhi Padwa 2017: तयारी शोभायात्रांची

ढोलपथकांची लगबग….

Gudhi Padwa 2017: तयारी शोभायात्रांची
ढोल बाजे,,,,, (छाया सौजन्य- फेसबुक)

गुढीपाडव्याच्या दिवशी गेल्या १०-१२ वर्षांमध्ये आकर्षण असतं ते म्हणजे शोभायात्रांचं. डोंबिवली, ठाणे, दादर. गिरगाव अशा मराठी पट्ट्यांमध्ये या शोभायात्रांची मोठी लगबग असते. या शोभायात्रांमध्ये वेगवेगळे देखावे केलेले फ्लोट्सचं आकर्षण असतंच. पण त्याचजोडीला नऊवारी नेसलेल्या आणि बाईकवर बसलेल्या महिला तसंच वेगवेगळी ढोलपथकं, लेझिमच्या तालावर थिरकणारा मुलामुलींचा समूह आणि अनेक एेतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा पोषाख करून आलेली लहान मुलं अशी या शोभायात्रांची खास आकर्षणं असतात.

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री मुंबईच्या कितीतरी उपनगरांमध्ये शोभेचे फटाके फोडलं जातात. ते पहायला लहानांसोबत मोठ्यांचीही गर्दी होते.

गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी शोभायात्रेसाठी तयारीही जोरात आणि जोशात सुरू असते. ढोलपथकांच्या सदस्यांची तर विशेष घाई असते. इतके दिवस घेतलेल्या मेहनतीचं चीज होण्याचा, मांगल्यमय असा गुढीपाडव्याच्या सण येणार असतो.

गुडीपाडवा जवळ आल्याने त्याच्या आदल्या दिवशी ढोलपथकांची जोरदार प्रॅक्टिस चालू असते असं आपल्याला वाटणं साहजिकच आहे. पण असं नेहमीच होतं अशातला भाग नाही.

“गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ढोलपथकांमधल्या सदस्यांना विश्रांती देण्याकडे जास्त कल असतो” दादरच्या ‘वंदन’ ढोलपथकामधल्या एका महिला सदस्याने सांगितलं. गुढीपाडव्याच्या दिवशी शोभायात्रेमध्ये कितीतरी तास सलग ढोलवादन करावं लागतं. हे काम प्रचंड शारिरीक कष्टाचं आहे. त्यामुळे अगदीच आदल्याच दिवशी प्रॅक्टिस करून हात दुखवून घेण्यापेक्षा विश्रांती घेत गुडीपा़डव्याच्या मुख्य दिवस गाजवायला ही सगळी पथकं तयार होतात.

पण विश्रांती असते ती ढोलवादनापुरतीच. कारण आपली सगळी वाद्यं चांगल्या स्थितीत आहेत की नाहीत याची शेवटची खातरजमा करण्याचाही हा एक दिवस असतो. नाहीतर एेन शोभायात्रेत वाजवतानाच जर वाजवता वाजवता ढोल फुटला तर मोठी पंचाईत.
या दिवशी ढोलाचं ‘पान’; म्हणजेच जिकडे आपण हाताने किंवा काठीने नाद करत ढोल वाजवतो;  ते चांगल्या स्थितीत आहे की नाही याची काळजी घ्यावी लागते. तसंच ढोलाचा कुठला भाग सैल झाला असेल तर तोसुध्दा ढोलाचं नट-बोल्ट लावत व्यवस्थित केला जातो. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मग हे संपूर्ण पथक एकत्र येतं आणि शेवटच्या काही सूचना दिल्या जातात.

एका ढोलपथकामध्ये १०० च्यावर मुलं मुली असू शकतात. या सर्वाचा एकमेकांशी ताळमेळ योग्य बसणं अत्यंत महत्त्वाचं असतं. दोन्ही हात ढोल वाजवण्यात मग्न असल्याने डोळ्यांच्या खाणाखुणा करत दिलेले इशारे अतिशय महत्त्वाचे ठरत असता. इतके दिवस एकत्र प्रॅक्टिस करून या सगळ्या वादकांचा ताळमेळ योग्य बसलेलाच असतो. पण गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी या सगळ्या संकेतांची उजळणी केली जाते. त्याचसोबत ढोलपथकाच्या एकंदर ताळमेळासाठी महत्त्वाच्या सूचना दिल्या जातात. उदाहरणार्थ डोल वाजवताना सतत पाणी प्यायलं तर त्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पाणी कधी व केवढं प्यावं याचेही सल्ले दिले जातात. त्याचप्रमाणे मंडळाचे कोणते कार्यकर्ते पाणी आणि खाद्यपदार्थ घेत उभे असतील याच्याही सूचना दिल्या जातात.

एकंदरीतच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी या ढोलपथकांच्या सदस्यांच्या मनात एक विलक्षण हुरहूर दाटून राहिलेली असते. एवढे दिवस आपण जे कष्ट केले त्याचं चीज करणारा हा दिवस लवकरच उजाडणार असतो. गुढीपाडव्याचा दिवसच मुळी जुनं विसरून नव्याकडे जाण्याचा.आणि या नव्या युगाची वाजतगाजत नांदी करायला ही सगळी ढोलपथकं तयार असतात.

मराठीतील सर्व गुढी पाडवा ( Gudi-padwa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या