scorecardresearch

गृहसुरक्षेची गुढी!

निरनिराळ्या सुरक्षाविषयक समस्या आणि त्यावरच्या उपायांची माहिती करून घेऊ  आणि एका सुरक्षित जीवनाची गुढी उभारू.

गौरी प्रधान gouripradhan01@gmail.com

गुढीपाडवा काही दिवसांवरच येऊन ठेवला आहे. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षांची सुरुवात. तसेही आपण हिंदू उत्सवप्रिय. वर्षांच्या प्रत्येक महिन्यात एकतरी सण आपण साजरा करतोच. पण जेव्हा असे मोठे सण येतात तेव्हा आपली सुरुवात होते स्वच्छतेपासून.. घराची साफसफाई मग सजावट, दाराला तोरण इत्यादी.

शब्दश: जसे आपण दाराला तोरण बांधतो किंवा गुढी उभारतो तसेच एखाद्या चांगल्या कामाच्या सुरुवातीलादेखील आपण तोरण बांधणे किंवा गुढी उभारणे असे वाक्प्रचार वापरतो. मग आज तर दोन्ही योग एकत्र, प्रत्यक्षात दारात गुढी उभी करायची आणि त्यासोबत, मनात एखाद्या उत्तम संकल्पाची गुढी उभारायची.

मीदेखील आज एक संकल्प केला आहे- गृहसुरक्षेचा! यापूर्वीही या विषयावर मी काही लेख लिहिले होते, पण एक इंटेरिअर डिझाइनर म्हणून मी जसा एखाद्या वास्तूच्या संरचनेचा विचार करते, ती वास्तू सुंदर दिसावी म्हणून झटते तसेच त्या वास्तूच्या सुरक्षिततेबाबतही लोकांना सतर्क करण्याची जबाबदारीही मी माझीच समजते. त्यामुळेच या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावादेखील महत्त्वाचा आहे.

गृहसुरक्षेचा विचार करताना

सर्वप्रथम विचार करण्यात येतो तो अग्नी सुरक्षेचा. साहजिकच आहे, अगदी मुंबईसारख्या शहरात वारंवार घडणाऱ्या आगीच्या घटना पाहता अग्नी सुरक्षा हा विषय इतर कोणत्याही सुरक्षेपेक्षा महत्त्वाचाच आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी सातत्याने या विषयावर कार्य करत आहेत. त्यांच्या प्रयत्नाने नवीन बांधकाम होत असलेल्या ठिकाणी बऱ्याच सुधारणा देखील दिसून येताहेत ही सकारात्मक बाब आहे.

अग्नी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इमारतीच्या प्रत्येक घरातून हल्ली पाण्याचे स्प्रिंकलर अर्थात कारंजी दिली जातात- जी आग लागल्याची जाणीव होताच पाण्याचे फवारे मारून माणसांना किमान घराबाहेर पडण्यास मदत करतात. त्याशिवाय फायर एक्झिट अर्थात आग लागल्यास वापरायचा जिना, हादेखील नव्या बांधकामांना बंधनकारक केलेला आहे. तसेच कार्बनडाय ऑक्साईडचे पॅसेजमध्ये लावलेले सिलिंडर.

वरील सर्व गोष्टी इमारत बांधत असतानाच पुरवल्या जातात, पण म्हणून आपण सर्व बाजूंनी सुरक्षित झालो का?  हे सगळे सुरक्षा उपाय दुसऱ्या कोणीतरी आपल्यासाठी योजले आहेत, पण ते कसे वापरायचे किंवा आपण स्वत:च्या सुरक्षेची कशी काळजी घ्यायची हे आपल्याला देखील माहीत हवे.

शिवाय अग्निसुरक्षा हा जरी सगळ्यात मोठा मुद्दा असला तरी तो एकमेव सुरक्षेचा मापदंड नाही हे लक्षात घेऊन सुरक्षाचे इतर पैलूही अभ्यासणे गरजेचे आहे.

वरील सगळ्या बाबींचा विचार करताना माझ्या असे ध्यानात आले की, सुरक्षा हा विषय फक्त एका लेखात मावेल इतका लहान नाही. हा विषय बहुआयामी आहे, एक प्रकारच्या सुरक्षेचा विचार करताना दुसरीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, शिवाय एकच लांबच लांब उपदेशाचे डोस असणारा लेख वाचक तरी कसा पचवतील, म्हणून आपण याची चार भागात विभागणी करून निरनिराळ्या सुरक्षाविषयक समस्या आणि त्यावरच्या उपायांची माहिती करून घेऊ  आणि एका सुरक्षित जीवनाची गुढी उभारू.

मराठीतील सर्व गुढी पाडवा ( Gudi-padwa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Home security gudi padwa 2022 zws

ताज्या बातम्या