डोंबिवली: श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित नववर्ष पालखी सोहळय़ात डोंबिवलीतील उत्सवप्रिय रहिवासी सहभागी झाले होते. दोन वर्षांनंतर आयोजित करण्यात आलेल्या या सोहळय़ाच्या निमित्ताने फडके रोड पुन्हा गर्दीने ओसंडल्याचे पहायला मिळाले.

चैत्रपाडव्याच्या नववर्ष स्वागत यात्रेचे दिवस जवळ आले तरी शासनाकडून करोना साथीचे निर्बंध हटविण्यात येत नव्हते. त्यामुळे स्वागत यात्रा संयोजकांमध्ये अस्वस्थता होती. अशा परिस्थितीत डोंबिवलीतील श्री गणेश मंदिर संस्थानने निर्बंध पाळत कोणत्याही परिस्थितीत पालखी सोहळा काढण्याचा निर्णय घेतला. अवघ्या दहा दिवसांत मंदिर संस्थानचे अध्यक्ष राहुल दामले यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी सोहळय़ाची तयारी करण्यात आली. हिंदू नववर्ष पालखी सोहळय़ानिमित्त श्री गणेश मंदिरात शनिवारी पहाटे गणपतीला अभिषेक, मंदिरावर गुढी उभारण्याचा कार्यक्रम अध्यक्ष राहुल दामले यांच्या हस्ते झाला. 

डोंबिवली पश्चिमेतील पंडित दीनदयाळ रस्त्यावरील नाख्ये समूहाच्या मारुती मंदिरातून पालखी सोहळय़ाला गुढी उभारून प्रारंभ करण्यात आला. या वेळी करोना महासाथीमध्ये आरोग्य, वैद्यकीय, सामाजिक सेवा कार्यात योगदान दिलेल्या डॉक्टर, परिचारिका, करोनाने मृत रुग्णांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणारे, स्मशानभूमीत रात्रंदिवस दहनासाठी सेवा देणारे, शहर स्वच्छ ठेवणारे सफाई कामगार, रुग्णवाहिका चालक यांचा प्रातिनिधिक सत्कार संस्थानतर्फे करण्यात आला. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रमोद पाटील, माजी नगरसेवक मंदार हळबे व्यासपीठावर उपस्थित होते.

पालखी सोहळय़ात इंधन बचत, पर्यावरण संवर्धन, मराठीला राजभाषेचा दर्जा देण्याची मागणी करणाऱ्या संस्था कार्यकर्ते हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. पालखीच्या अग्रभागी ध्वज पथक, दुचाकी स्वारांचा ताफा होता. तरुण, तरुणी वाहनांचे सारथ्य करत होते. डोंबिवली सायकल संघटनेचे सदस्य इंधन बचतीचा संदेश देत होते. संस्कार भारतीची स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची रांगोळी, फडके रस्त्यावरील स्वागत यात्रेच्या रांगोळय़ा पाहण्यासाठी गर्दी झाली होती. पालखी सोहळय़ात काही वेळ अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता आदिनाथ कोठारे सहभागी झाले. त्यांनी ढोलताशाच्या वादनावर ठेका धरल्यावर तरुणाईने जल्लोष केला. फडके रोड ते शिवाजी पुतळय़ादरम्यान सात ढोलताशा पथके अंतराने वादन करत होती. कल्याण येथेही स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.