Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
piyush goyal
कर्तबगारीने ‘तेजांकित’ झालेल्यांचा गौरव!
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

ठाणे : ठाणे, डोंबिवलीत काढण्यात आलेल्या स्वागत यात्रांमध्ये प्रामुख्याने सामाजिक संदेश देणारे चित्ररथ आकर्षण ठरले होते. पारंपरिक वेशभूषेतील तरुणाई तसेच दुचाकी रॅलीत मोठय़ा संख्येने महिलांचा सहभाग होता. विविध वाद्यांच्या तालावर ठेका धरत ठिकठिकाणी मराठी नववर्षांचे उत्साहात स्वागत केले. ठाण्यात स्वागत यात्रेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांची उपस्थिती होती. गेली दोन वर्षे करोनामुळे स्वागत यात्रांवर निर्बंध होते. यंदा फडके रस्त्यावर गर्दी आणि उत्साह होता. 

 ठाण्यात श्री कौपिनेश्वर न्यासतर्फे यंदा स्वागत यात्रेची मोठय़ा उत्साहात तयारी करण्यात आली होती. स्वागत यात्रेचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे यात्रेच्या सुरुवातीपासून सहभागी झाले होते. यंदाच्या यात्रेत ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा, शिक्षण, घनकचरा, वृक्ष प्राधिकरण, स्मार्ट सिटी, विद्युत विभागाचे रथ सहभागी झाले होते. ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून शैक्षणिक गुढी या संकल्पनेवर आधारित रथ साकारण्यात आला होता. यामध्ये काही विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षणाविषयी जनजागृती करत होते. पाणीपुरवठा विभागाच्या रथामार्फत पाणी वाचवा, पाणी जपूण वापरा असे विविध संदेश दिले जात होते. सौर ऊर्जेविषयी नागरिकांना आवाहन करणारा महापालिकेचा विद्युत विभागाचा रथही आकर्षक होता. तर शहरातील इतर सामाजिक संस्थांकडून विविध संदेश देणारे चित्र रथ साकारण्यात आले होते. यामध्ये येऊर येथील एकलव्य क्रीडा मंडळ या संस्थेचा आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविणारा वैशिष्टय़पूर्ण ठरला. यामध्ये मल्लखांबचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले होते. सरस्वती क्रीडा संकुलातील जिमनॅस्टिकच्या विद्यार्थ्यांनी जिमनॅस्टिकच्या सादरीकरणातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला उजाळा दिला.

 पर्यावरण दक्षता मंडळातर्फे रथामध्ये फुलपाखरांची बाग साकारण्यात आली होती. यामध्ये कोणत्या वृक्षांवर फुलपाखरे येतात, कोणकोणत्या प्रजातींची फुलपाखरे असतात या संदर्भात माहिती देण्यात आली होती. तसेच काही लहान मुले, तरुण मंडळी फुलपाखरांच्या प्रतिकृती लावून यात्रेत सहभागी झाले होते. तर लक्षवेधी सामाजिक संस्थेतर्फे महिला सक्षमीकरण याविषयी संदेश देण्यात आले. यात्रेच्या मार्गावर रस्त्यांच्या दुतर्फा तसेच चौकाचौकांत मध्यभागी संस्कार भारतीतर्फे साकारण्यात आलेली रांगोळय़ांनी यात्रेची शोभा अधिक वाढवली होती.

 उपयात्राही जल्लोषात

श्री कौपिनेश्वर न्यासाच्या साहाय्याने मराठी नववर्षांच्या स्वागतानिमित्त यंदा मुख्य यात्रेसह शहरातील कळवा, खारेगाव, लोकमान्य नगर, वसंत विहार, ब्रह्मांड, घोडबंदर, लोढा या भागातून मोठय़ा जल्लोषात उपयात्रा काढण्यात आल्या होत्या. वसंत विहार भागातील हनुमान मंदिरापासून यात्रेची सुरुवात करण्यात आली. या यात्रेत इस्कॉन आणि लक्ष्मीनारायण गृहसंकुलाचा रथ होता. यामध्ये ‘माती वाचवा’ असा संदेशही देण्यात आला. या वेळी पारंपरिक नृत्य, पथनाटय़, लेझीम आणि मल्लखांबचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तर लोकमान्यनगर भागातील यात्रेच्या माध्यमातून बेटी बचाव, बेटी पढाव असा संदेश देण्यात आला.

सरस्वती क्रीडा संकुल प्रथम

श्री कौपिनेश्वर न्यासतर्फे दरवर्षी स्वागत यात्रेत उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आलेल्या संस्थांना पारितोषिके देण्यात येतात. यंदाच्या वर्षी प्रथम क्रमांक सरस्वती क्रीडा संकुल, द्वितीय ठाणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरण विभाग आणि तृतीय क्रमांक एकलव्य क्रीडा मंडळ यांनी पटकावला. तर उत्तेजनार्थ ठाणे महानगरपालिकेचा विद्युत विभाग, पाणीपुरवठा विभाग त्यासह विद्या भारती आणि संस्कृत भारती या संस्थांना देण्यात आले.

आपला प्राचीन सांस्कृतिक वारसा जपणे गरजेचे आहे. यंदा करोनाची परिस्थिती सुधारल्याने आणि परवानगी मिळाल्याने स्वागत यात्रेत सहभागी सर्व नागरिकांमध्ये मोठा उत्साह आणि जोश पाहायला मिळाला. तसेच आयोजकांनीदेखील अगदी कमी वेळेत स्वागत यात्रेची उत्तम आखणी केली होती. 

– डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ