scorecardresearch

नागपूरकर निर्बंधमुक्त गुढी उभारणार ; दोन वर्षांनंतर सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

भारतीय नववर्ष स्वागत समितीच्यावतीने शुक्रवारी दुपारी ४ वाजता इतवारी भागातून महिलांची स्कूटर मिरवणूक निघणार आहे.

नागपूर : करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांत लागू असलेल्या निर्बंधांमुळे मराठी नववर्षांनिमित्त होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि शोभायात्रेवर बंदी होती. आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे राज्य शासनाने सर्व निर्बंध हटवले आहे. यामुळे यंदाचा गुढीपाडवा धुमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनाची पूर्वतयारी जोरात सुरू झाली आहे.

गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्र आणि मराठी नववर्षांला प्रारंभ होतो. यावर्षी पोद्दारेश्वर मंदिर, रामनगरातील राम मंदिर आणि उत्तर नागपुरातील महादेव मंदिरातून रामनवमीनिमित्त निघणाऱ्या शोभायात्रा रद्द करण्यात आल्या असल्या तरी विविध सामाजिक संस्थांतर्फे गुढीपाडव्यानिमित्त छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. घरोघरी भगवा ध्वज लावा आणि शोभायात्रा काढा, असे आवाहन विश्व हिंदूू परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

भारतीय नववर्ष स्वागत समितीच्यावतीने शुक्रवारी दुपारी ४ वाजता इतवारी भागातून महिलांची स्कूटर मिरवणूक निघणार आहे. आग्याराम देवी मंदिर येथून प्रारंभ होऊन विविध मार्गाने फिरून ही मिरवणूक पोद्दारेश्वर राम मंदिर येथे समाप्त होईल. महिलांच्या विविध संस्था, संघटना व बचत गट यात सहभागी होणार आहेत.

‘दी ब्लाईंड रिलीफ असोसिएशन’, संस्कार भारती व मैत्री परिवाराच्यावतीने गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच शुक्रवारी दक्षिण अंबाझरी मार्गावरील अंध विद्यालयातील मुंडले सभागृहात ‘रंग मराठी मातीचा’ हा मराठी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अनिरुद्ध जोशी, अमर कुळकर्णी, मंजिरी वैद्य अय्यर, सायली मास्टे, निधी रानडे, आकांक्षा चारभाई गीते सादर करणार आहेत.

नवरात्रला प्रारंभ

शनिवारी भारतीयांचे नवीन शुभकृत संवत्सर सुरू होत आहे. नूतन वर्षांच्या आगमानानिमित्त सूर्योदयाला म्हणजेच सकाळी ६ वाजून १७ मिनिटानी घरासमोर उंच जागेवर गुढी उभारून पूजा करावी. या दिवशी प्रभूरामचंद्राच्या नवरात्राला प्रारंभ होत असल्यामुळे घरोघरी गुढय़ा तोरणे लावत नवीन वर्ष साजरे करावे, असे आवाहन पंचांगकर्त्यां विद्या राजंदेकर यांनी केले.

चैत्र पहाटचे आयोजन

मराठी नववर्षांनिमित्त चिटणवीस सेंटर येथे २ एप्रिलला सकाळी ६.३० वाजता मैफील संस्थेच्यावतीने ‘चैत्र पहाट’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. इंदूरच्या गायिका अनुझा झोकरकर यांचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन होणार आहे. राम खडसे व श्याम ओझा त्यांना तबला व संवादिनीची साथसंगत करतील. या कार्यक्रमाचा रसिकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन मैफीलतर्फे करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व गुढी पाडवा ( Gudi-padwa ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: This year gudi padwa will be celebrated with much fanfare in nagpur zws

ताज्या बातम्या