Home Remedy for Constipation: सकाळी उठल्यावरही पोट साफ व्हायला खूप वेळ लागतोय का? अर्धा-पाऊण तास शौचालयात बसूनही समाधान मिळत नाही? असे वारंवार होत असेल, तर हा त्रास केवळ किरकोळ नसून दीर्घकाळ टिकणाऱ्या बद्धकोष्ठतेची ती सुरुवात असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. दररोज पोट साफ न झाल्यास त्याचा परिणाम केवळ पचनसंस्थेपुरता मर्यादित राहत नाही, तर शरीर आणि मेंदूतही तो हळूहळू जाणवू लागतो.
पोट नीट साफ न झाल्याने शरीरात अपायकारक घटक साचू लागतात. हे घटक रक्तप्रवाहातून संपूर्ण शरीरात पसरतात आणि त्यामुळे थकवा, डोकेदुखी, त्वचेचे विकार, अस्वस्थता, तसेच चिडचिडेपणा वाढू शकतो. अनेकांना अशा अवस्थेत कोणतेही काम करण्याची इच्छा राहत नाही. उलट, जर सकाळी पोट पूर्णपणे मोकळे झाले, तर दिवसभर शरीर हलके, मन प्रसन्न राहून, ऊर्जा टिकून राहते, असा अनेकांचा अनुभव आहे.
निसर्गाने मानवी शरीराची रचना अशी केली आहे की, आपण आज जे खातो, ते पुढच्या दिवशी शरीरातून बाहेर पडायला हवे. मात्र, चुकीची आहारपद्धत, कमी पाणी पिणे, बैठी जीवनशैली व सततचा ताण यांमुळे ही नैसर्गिक प्रक्रिया विस्कळित होते. परिणामी पचलेले अन्न आतड्यांमध्ये अडकून राहते. कालांतराने ही घाण आतड्यांच्या भिंतींना चिकटते आणि तिथेच कुजत राहते.
आतड्यांमध्ये अशी घाण साचून राहिल्यामुळे अपायकारक जंतू आणि विषारी घटक तयार होतात. हे घटक शरीरात विविध आजारांना आमंत्रण देऊ शकतात, असे अनेक अभ्यासांतून सूचित झाले आहे. दीर्घकाळ पोट साफ न झाल्यास बद्धकोष्ठता वाढू शकते, तसेच मूळव्याध, गुदद्वाराशी संबंधित त्रास, अपचन, सततची डोकेदुखी आणि त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.
आयुर्वेद आणि पारंपरिक उपचारपद्धतींचे जाणकार सांगतात की, पोट आणि आतड्यांची नियमित स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी काही सोपे, घरगुती उपाय उपयोगी ठरू शकतात. काही तज्ज्ञांच्या मते, झोपण्यापूर्वी योग्य घटकांचे सेवन केल्यास आतड्यांची हालचाल सुधारते आणि सकाळी पोट साफ होण्यास मदत मिळते.
याच संदर्भात एक उपाय विशेष चर्चेत आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दूध घेऊन, त्यात एक विशिष्ट नैसर्गिक घटक मिसळून पिण्याचा सल्ला दिला जातो. हे मिश्रण आतड्यांमध्ये नैसर्गिक स्निग्धता निर्माण करते आणि साचलेली घाण बाहेर काढण्यास मदत करू शकते, असे मानले जाते. त्यामुळे सकाळी उठताच पोट मोकळे होण्याचा अनुभव अनेकांना येतो, असेही सांगितले जाते.
आता प्रश्न पडतो तो घटक नेमका कोणता?
तो घटक म्हणजे इसबगोल.
इसबगोल म्हणजे काय?
इसबगोल हा Plantago ovata या वनस्पतीच्या बियांपासून मिळणारा नैसर्गिक तंतुमय पदार्थ आहे. आयुर्वेदात इसबगोलला नैसर्गिक रेचक आणि पचन सुधारक मानले जाते. त्यात विद्राव्य आणि अविद्राव्य अशा दोन्ही प्रकारचे तंतू भरपूर प्रमाणात असतात. हे तंतू पाण्याच्या संपर्कात आल्यावर जेलसारखे रूप धारण करतात. पोटात गेल्यावर हेच जेल आतड्यांना स्निग्धता देते आणि साचलेली घाण सहज बाहेर पडण्यास मदत करते, अशी ज्योतिष व आयुर्वेदिक तज्ज्ञांची मांडणी आहे.
म्हणूनच काही जाणकार रात्री झोपण्यापूर्वी दुधात इसबगोल मिसळून सेवन करण्याचा सल्ला देतात. अर्थात, कोणताही उपाय सुरू करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे नेहमीच हितावह ठरते.
(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. यातील माहिती वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांना पर्याय नाही. अधिक तपशिलासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी ‘लोकसत्ता’ घेत नाही.)
