Gut Health Tips : काही लोक दिवसातून एकदा शौचास जातात, तर काही जण दोन किंवा तीन वेळाही जातात. अशावेळी दिवसातून कितीवेळा शौचास जाणं योग्य, कोणत्या गोष्टी आरोग्यासाठी समस्या निर्माण करू शकतात हे समजणे कठीण होते. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीची पचनक्रिया वेगळी असते, त्यामुळे शौचास होण्याचे प्रमाणही वेगवेगळे असू शकते. निरोगी पचनसंस्था हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. चला तर मग जाणून घेऊया, दिवसातून किती वेळा शौचास जाणे सामान्य मानले जाते आणि कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

दिवसातून किती वेळा शौचास होणे सामान्य आहे?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसातून ३ वेळा ते आठवड्यातून ३ वेळा मलत्याग (पॉटी) करणे सामान्य मानले जाऊ शकते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तुमची शौचाची सवय (Bowell Habits) नियमित असावी आणि त्यात अचानक कोणताही मोठा बदल होऊ नये.

१) दिवसातून एकदा शौचास होणे: बहुतेक निरोगी लोकांमध्ये दिवसातून एकदा शौचास जाण्याची सवय असते. हे तुमची पचनसंस्था अगदी व्यवस्थित काम करत असल्याचे लक्षण आहे. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही खाल्लेले अन्न योग्य वेळेत पचत आहे आणि शरीरातील टाकाऊ पदार्थ सहजपणे बाहेर पडत आहेत.

२) दिवसातून २-३ वेळा शौचास होणे: काही लोकांचा मेटाबॉलिज्म (चयापचय क्रिया) खूप वेगवान असतो किंवा ते आहारात फायबरयुक्त अन्नपदार्थांचे सेवन जास्त करतात. अशा लोकांच्या बाबतीत दिवसातून २ ते ३ वेळा शौचास जाणे पूर्णपणे सामान्य आहे. हे पचनसंस्था सक्रिय असल्याचे आणि अन्न लवकर पचत असल्याचे दर्शवते.

३) आठवड्यातून ३ वेळा शौचास होणे: काही लोकांची पचनक्रिया संथ असते. अशा व्यक्तींसाठी आठवड्यातून ३ वेळा शौचास जाणेदेखील सामान्य मानले जाते. हे शरीर हळूहळू अन्न पचवत असल्याचे लक्षण आहे. मात्र, आठवड्यातून ३ पेक्षा कमी वेळा शौचास होत असेल आणि पोट जड किंवा अस्वस्थ वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

कोणत्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये?

१) सतत बद्धकोष्ठता राहणे.

२) वारंवार जुलाब होणे.

३) मलमधून रक्त पडणे.

४) पोटात तीव्र वेदना होणे.

५) शौचानंतरही पोट साफ न झाल्यासारखे वाटणे.

६) अचानक वजन कमी होणे.

७) मलत्याग करण्याच्या सवयींमध्ये अचानक बदल होणे.

डॉक्टरांना केव्हा भेटावे

जर तुम्हाला बद्धकोष्ठता किंवा जुलाबाचा त्रास दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ सतावत असेल, मलमधून रक्त पडत असेल, पोटात सतत वेदना होत असतील किंवा तुमच्या नेहमीच्या शौचाच्या सवयींमध्ये अचानक बदल झाला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ही लक्षणे पचनसंस्थेशी संबंधित गंभीर समस्येचा संकेत असू शकतात.

गट हेल्थ (पाचन आरोग्य) उत्तम ठेवण्यासाठी टिप्स:

१) रोज भरपूर आणि पुरेसे पाणी प्या.

२) आहारात फायबरयुक्त (तंतुमय) पदार्थांचा समावेश करा.

३) नियमित व्यायाम किंवा योगासने करा.

४) आहारात प्रोबायोटिक फूड्सचा (उदा. दही, ताक) समावेश करा.

५) मानसिक ताण कमी करा आणि पुरेशी झोप घ्या.