Gut Health Warning Signs: आपल्या शरीरातील अनेक आजारांची सुरुवात पोटापासून होत असल्याचं तज्ज्ञ वारंवार सांगतात. मात्र शरीर काही संकेत आधीच देत असतं आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. आतड्यांचं आरोग्य बिघडल्यास शरीरात नेमके कोणते बदल दिसू शकतात, याविषयी पोषणतज्ज्ञांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
आतड्यांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनियमित आहार, बाहेरचं अन्न, कमी झोप व सततचा ताण यांचा सर्वाधिक परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. विशेषतः आतड्यांचं आरोग्य बिघडू लागलं, तर त्याचे परिणाम केवळ पोटापुरते मर्यादित राहत नाहीत, तर संपूर्ण शरीरावर दिसू लागतात.
अनेकांना वारंवार पोट फुगणे, अपचन किंवा थकवा यांसारख्या तक्रारी जाणवतात; पण त्या केवळ साध्या समस्या समजून दुर्लक्ष केलं जातं. प्रत्यक्षात ही लक्षणं आतड्यांमध्ये असंतुलन निर्माण झाल्याची सूचना असू शकतात.
प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ मीनाक्षी पेटुकोला यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित काही महत्त्वाच्या लक्षणांविषयी माहिती दिली आहे. त्यांच्या मते, ही लक्षणे वेळेत ओळखली, तर पुढील त्रास टाळण्यास मदत होऊ शकते.
१. सतत पोट फुगणे, गॅस किंवा आम्लपित्त
वारंवार गॅस होणे, पोट फुगणे किंवा आम्लपित्ताचा त्रास होत असेल, तर ते केवळ चुकीच्या आहारामुळेच असेल असे नाही. आतड्यांतील चांगले आणि वाईट जीवाणू यांचे संतुलन बिघडल्यास पचनक्रिया मंदावू शकते. त्यामुळे गॅस, जळजळ आणि अपचनाच्या तक्रारी वाढू शकतात.
अशा वेळी पौष्टिक आहार, शांतपणे जेवण करणे आणि अन्न व्यवस्थित चावून खाणे फायदेशीर ठरू शकते.
२. मूड सतत बदलतोय?
कारण नसताना चिडचिड होणे, मन उदास राहणे किंवा सतत मूड बदलत राहणे हेही आतड्यांच्या आरोग्याशी संबंधित असू शकते.
तज्ज्ञांच्या मते, आतडे आणि मेंदू यांचा परस्परांशी घनिष्ठ संबंध आहे. त्यामुळे आतड्यांतील असंतुलनाचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होऊ शकतो. पुरेशी झोप, तणावावर नियंत्रण आणि ताज्या अन्नपदार्थांचा आहार यांमुळे आतडे आणि मेंदू दोघांनाही फायदा होऊ शकतो.
३. लक्ष केंद्रित करण्यात अडचण
काम करताना एकाग्रता न राहणे, सतत थकवा जाणवणे किंवा मानसिक गोंधळ जाणवणे हीदेखील दुर्लक्ष करण्यासारखी लक्षणे नाहीत.
पचनसंस्थेतील बिघाडामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक योग्य प्रमाणात मिळत नाहीत. त्यामुळे एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.
४. त्वचेवर अचानक दिसणारे बदल
आतड्यांतील दाह, पचनातील अडचणी किंवा इतर समस्या सर्वप्रथम त्वचेवर दिसू शकतात. त्वचा निस्तेज होणे, पुरळ येणे किंवा त्वचेचा नैसर्गिक तेज कमी होणे ही काही संभाव्य लक्षणे असू शकतात.
निरोगी आणि तेजस्वी त्वचा ही अनेकदा चांगल्या पचनसंस्थेचं आणि संतुलित जीवनशैलीचं प्रतीक मानली जाते.
आतड्यांची काळजी का महत्त्वाची?
आपल्या शरीरातील पोषक तत्त्वांचे शोषण, रोगप्रतिकारक शक्ती आणि एकूणच आरोग्य टिकवून ठेवण्यात आतड्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे वारंवार पोटाशी संबंधित त्रास होत असेल किंवा वरील लक्षणे सातत्याने जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
संतुलित आहार, पुरेसे पाणी, नियमित व्यायाम, चांगली झोप आणि तणाव कमी ठेवणे यांमुळे आतड्यांचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होऊ शकते.
(टीप : ही माहिती पोषणतज्ज्ञांनी दिलेल्या सर्वसाधारण आरोग्यविषयक मार्गदर्शनावर आधारित आहे. कोणतीही लक्षणे दीर्घकाळ जाणवत असल्यास किंवा तीव्र स्वरूपाची असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
