Gym mistakes: पूर्वी हृदयविकार हा प्रामुख्याने वृद्धापकाळाशी संबंधित मानला जायचा. मात्र, आज हा समज वेगाने बदलत आहे. २०, ३० आणि ४० च्या सुरुवातीच्या वयोगटातील अनेकांना हार्ट अटॅक आणि इतर हृदयविकार होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, यातील अनेक जण दिसायला फिट असतात, नियमित जिमला जातात आणि सक्रिय जीवनशैली जगतात, तरीही आतून शरीर कमकुवत बनत असतं. ही वाढती समस्या “Thin-Fat Indian” किंवा “Fit but Unhealthy” या विरोधाभासाकडे लक्ष वेधते; म्हणजेच काही व्यक्तींचा बॉडी मास इंडेक्स (BMI) सामान्य किंवा कमी असला तरी त्यांच्या शरीरात, विशेषतः पोटाभोवती (visceral fat) चरबीचे प्रमाण जास्त असते. संशोधक याज्ञिक आणि युडकिन यांनी मांडलेल्या या संकल्पनेनुसार, समान BMI असलेल्या व्यक्तींच्या शरीररचनेत मोठा फरक असू शकतो. हा प्रकार इन्सुलिन रेझिस्टन्स, टाईप २ डायबिटीज आणि हृदयविकारांचा धोका वाढवतो, जरी व्यक्ती दिसायला सडपातळ असली तरी. असोसिएट डायरेक्टर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. ऋषिकेश पाटील आणि डॉ. एल. एच. हिरानंदानी हॉस्पिटल, पवई, मुंबई यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

बाहेरून फिट दिसणे म्हणजे शरीर आतून निरोगी आहेच असे नाही. एखाद्या व्यक्तीचा बांधा सडपातळ असू शकतो, पण तरीही त्याला उच्च कोलेस्ट्रॉल, लवकर धमन्यांमध्ये ब्लॉकेज किंवा लपलेली सूज (inflammation) असू शकते. यामध्ये आनुवंशिक घटकांचाही मोठा वाटा असतो. यामध्ये तरुणांमध्ये हार्ट अटॅकचा एक महत्त्वाचा जोखीम घटक आहे. हे सगळे धोके अनेकदा कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता शांतपणे वाढत राहतात. या समस्येमागे आधुनिक जीवनशैलीही तितकीच जबाबदार आहे. कामाचे तास, ताणतणाव, अपुरी झोप, धूम्रपान आणि अयोग्य आहार यामुळे तरुणांमध्ये हृदयविकार झपाट्याने वाढत आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासांनुसार, जीवनशैली आणि ताण यामुळे तरुणांमध्ये हृदयविकारांचे प्रमाण वाढत आहे.

कामाच्या डेडलाईन्स, आर्थिक दबाव आणि डिजिटल ओव्हरलोड यामुळे मन कायम तणावाखाली असते, त्यामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, ज्यामुळे कालांतराने रक्तदाब वाढतो, ब्लड शुगर बिघडते आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान होते.
याशिवाय, दीर्घकाळ बसून राहणे ही मोठी समस्या आहे. अनेक तरुण व्यावसायिक दिवसातून ८–१० तास बसून काम करतात, नंतर व्यायाम केला तरी दिवसभराच्या निष्क्रियतेचा पूर्ण परिणाम कमी होत नाही. एक तासाचा तीव्र व्यायाम हा संपूर्ण दिवसाच्या निष्क्रियतेची भरपाई करू शकत नाही.

Award Banner

जिमला जाणारेही धोक्यात का?

नियमित व्यायाम हृदयासाठी चांगला असला तरी तो पूर्ण संरक्षण देत नाही. विशेषतः इतर जोखीम घटक दुर्लक्षित केल्यास. अनेक तरुण जीमवर अवलंबून राहतात, पण त्याचवेळी धूम्रपान, चुकीचा आहार, ताण आणि अपुरी झोप या सवयी कायम ठेवतात. फक्त व्यायामाने आतल्या सर्व नुकसानाची भरपाई होत नाही, तसेच योग्य मार्गदर्शनाशिवाय अतितीव्र (high-intensity) व्यायाम करणेही धोकादायक ठरू शकते. वॉर्म-अप, रिकव्हरी किंवा वैद्यकीय तपासणीशिवाय अचानक तीव्र व्यायाम केल्याने हृदयावर अतिरिक्त ताण येतो. ज्या लोकांना आधीपासून लपलेले आजार असतात, जसे की सुरुवातीचे ब्लॉकेज किंवा हार्ट रिदमचे प्रश्न त्यांच्यात गंभीर समस्या उद्भवू शकतात.

परफॉर्मन्स सप्लिमेंट्स, स्टेरॉइड्स आणि वैद्यकीय सल्ल्याशिवाय जास्त प्रमाणात प्रोटीन घेण्याची वाढती सवयही चिंताजनक आहे; यामुळे रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि हृदयाची गती (heart rhythm) प्रभावित होऊ शकते.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अनेक जिम करणारे लोक बाह्य दिसण्यावर जास्त भर देतात आणि एकूण आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. “आपण फिट आहोत” या समजुतीमुळे ते नियमित हेल्थ चेक-अप टाळतात, त्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, हायपरटेन्शन किंवा डायबिटीजसारखे लपलेले आजार उशिरा लक्षात येतात.

झोप हा आणखी एक दुर्लक्षित घटक आहे. अनेकजण काम किंवा इतर कारणांसाठी झोप कमी करतात. मात्र, रोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनियमित झोपेमुळे रक्तदाब, हृदयाची गती आणि हार्मोन्सचा समतोल बिघडतो.

शरीर अनेकदा सुरुवातीचे इशारे देते, पण ते दुर्लक्षित केले जातात. हलका छातीत त्रास, अनपेक्षित थकवा, श्वास लागणे किंवा हृदयाची गती वाढणे ही लक्षणे अनेकदा ताण किंवा थकवा म्हणून दुर्लक्षित होतात, प्रत्यक्षात ही हृदयविकाराची सुरुवातीची चिन्हे असू शकतात.

हृदयविकार हा आता फक्त वय किंवा जीमपुरता मर्यादित विषय राहिलेला नाही. तो आपल्या दैनंदिन सवयींशी संबंधित आहे. मात्र नियमित हेल्थ चेक-अप, संतुलित व्यायाम, पुरेशी झोप, ताण नियंत्रण आणि निरोगी आहार या सोप्या सवयी हृदयाचे संरक्षण करू शकतात.