Home Remedies To Reduce Lip Darkening: आपण कामानिमित्त किंवा इतर गोष्टींसाठी अनेकांना भेटतो. अशावेळी चेहरा हा सर्वात महत्त्वाचा उठून दिसणारा असतो. याच चेहऱ्यावर काळे पडलेले ओठ अधिक लक्ष वेधून घेतात. शिवाय आपल्या आजूबाजूच्या काही लोकांचे ओठ अगदी गुलाबी, मऊ, अजिबात भेगा नसलेले असतात. ओठ काळ्या पडण्याला आपल्याच काही सवयी जबाबदार असतात. शिवाय हिवाळ्यात अशा काळ्या पडलेल्या, भेगा पडलेल्या ओठांचं दुखणं आणखी वाढतं. यावर काही घरगुती उपाय तर आहेतच, पण काही सवयीदेखील बदलणं गरजेचं आहे.

धूम्रपान हे केवळ आरोग्यासाठी हानिकारक नाही, तर त्याचे परिणाम त्वचेवरही दिसतात. अति धूम्रपान केल्याने ओठ काळे होतात, शिवाय वृद्धत्वाची लक्षणंदेखील चेहऱ्यावर दिसू शकतात. काळ्या ओठांवर घरगुती उपाय जाणून घेण्याआधी काही सवयी तुम्ही बदलणं अत्यंत गरजेचं आहे.

खूप गरम चहा-कॉफी पिणं बंद करा

काही लोकांना चहा-कॉफीचं व्यसन असतं. ते अति प्रमाणात पिणं चांगलं नाहीच, पण अति गरम पिणंदेखील आरोग्यासाठी हानिकारक आहे. ओठांसाठी ही सवय अत्यंत चुकीची आहे. ओठांना चहा-कॉफीचा गरमपणा सहन होत नाही. परिणामी ते काळे पडतात.

ओठांना स्क्रब न करणं

टॅन झालेला चेहरा किंवा डेड स्कीन वाढलेला चेहरा स्वच्छ करण्यासाठी स्क्रब वापरले जाते. अशाचप्रकारे ओठांची त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी देखील कधीतरी स्क्रब करणं गरजेचं आहे.

ओठ चावणे

काही लोकांना सतत ओठ तोंडांत किंवा दातात चावण्याची सवय असते. तसंच वारंवार ओठांवरून जीभ फिरवण्याची सवय असते. यामुळे ओठांचं नुकसान होतं. ओठ काळ तर पडतातच आणि त्यांची ठेवणही बिघडते.

धूम्रपान

धूम्रपान हे ओठ काळे पडण्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. धूम्रपानाचं प्रमाण सध्या महिलांमध्ये वाढलं आहे. मात्र ही सवय लवकरात लवकर सोडवा.

हलक्या दर्जाची सौंदर्य उत्पादनं वापरणे

लिपस्टिक, लिपलायनर, लिपग्लॉस असे कॉस्मेटिक्स हलक्या दर्जाची वापरल्याने देखील ओठांचे नुकसान होते. हलक्या दर्जाच्या कॉस्मेटिक्समध्ये रसायनांचं प्रमाण खूप जास्त असतं आणि ते नाजूक ओठांना सहन होत नाही.

ओठांचा काळेपणा कसा दूर करावा?

१. एक्सफोलिएटिंग स्क्रब तयार करा
हा स्क्रब तयार करण्यासाठी सर्वात आधी एका लहान भांड्याच अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि लिंबाचा २ ते ३ थेंब रस मिसळा. तुमच्या बोटावर हे मिश्रण घेऊन अलगदपणे ओठांवर चोळा. यामुळे ओठांवरील डेड स्किन निघून जाते आणि रक्ताभिसरण वाढते. स्क्रबमध्ये व्हिटॅमिन ई तेलाचा एक थेंबदेखील तुम्ही मिसळू शकता.

२. टूथब्रश आणि पेट्रोलियम जेली
ओठांना मॉइश्चराइज करण्यासाठी पेट्रोलियम जेली टूथब्रशवर घेऊन हलक्या हाताने गोलाकार आकारात फिरवा. नंतर ओठ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.

३. साखर, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबू
ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी साखर, ऑलिव्ह ऑइल आणि लिंबूचे मिश्रण लावा. एका भांड्यात १ चमचा पांढरी दाणेदार साखर घ्या. त्यात १ ते २ थेंब ऑलिव्ह ऑइल घ्या आणि १ ते २ थेंब लिंबाचा रस घाला आणि पेस्ट तयार करा. हे लावल्याने तुमचा ओठांचा रंग हळूहळू फिकट होत जाईल.

४. बीटरूटचा रस
बीटरूटचा रस ओठांना नैसर्गिकरित्या गुलाबी बनवतो आणि त्यांना मऊ देखील करतो.