यशस्वी व्हायचंय? या सवयी लगेच बदला

स्पर्धेच्या युगात ‘बी रेडी’ !!

छाया सौजन्य- डिजिटल डीलर

यशस्वी सगळ्यांनाच व्हायचंय. पण कसं याबाबत आपल्या सगळ्यांच्याच मनात गोंधळ सुरू असतो. नक्की काय करावं? काय करू नये याबाबतीत मनात कोलाहल होणं साहजिक आहे. जीवनात आत्मविश्वासाने पुढे जायला काय करण टाळलं पाहिजे यासाठी आमची काही सजेशन्स,

नेहमीच छोटे गोल्स ठेवू नका

‘नाॅट फेल्युअर बट लो एम इझ क्राईम’ ही म्हण आपण बऱ्याच वेळा एेकली आहे. आपल्याला अनेकदा अपयश येतं पण म्हणून त्याच्या भीतीने नेहमीच छोटी लक्ष्य ठेवणं चुकीचं आहे. प्रत्येक वेळी सेफ गेम खेळणंही योग्य नाही. कधीकधी मैदानात उतरावं लागतं. धोके पत्करावे लागतात आणि त्यातून मार्ग काढत पुढे जायचं असतं तेव्हाच विजय मिळतो.

कारणं देणं बंद करा

‘आता सध्या माझ्या आयुष्यात वाईट काळ सुरू आहे रे, म्हणून हे सगळं होतंय’, ‘माझ्यामागे हे आजार लागलेत गं, त्यातनं एकदा बरी झाले की बघ सगळ्या गोष्टी कशा छान होतात’. या प्रातिनिधिक कारणांसारखी अनेक कारणं आपण स्वत:ला देत असतो. आळशीपणा करण्यासाठी किंवा प्रयत्न करणं टाळण्यासाठी आपणच आपल्याला दिलेली ही ‘एक्सक्युझेस’ असतात. तुम्ही स्वत:ला अशी काही कारणं देत आहात का? ही कारणं खरी आहेत का? याचा मागोवा घ्या आणि ही सवय झटकून टाका. पहा किती फरक पडतो ते !

आरोग्याची हेळसांड करू नका

कदाचित हा सर्वात बोअरिंग सल्ला वाटत असेल पण हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपल्याकडे आयुष्यभर एकच शरीर असणार आहे. या शरिरात ‘राहत’ आपण जे काही करायचंय ते करणार आहोत. त्यामुळे शरिराची आणि आरोग्याची हेळसांड थांबवणं हे यशस्वी होण्याच्या दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे. आरोग्य सुधारण्यासाठी दोन मुद्दे महत्त्वाचे आहेत

१. आहार

२. व्यायाम

याचा अर्थ आजच्याआज दोन तास जिममध्ये जात दिवसभर फळांचा रस प्यायचा असा नाही. आपल्या जीवनशैलीत टप्प्याटप्प्याने सुधारणा करत हळू पण नियमितपणे आरोग्य सुधारणं याला महत्त्व आहे.

प्रत्येक वेळी शाॅर्ट टर्म विचार करू नका

सध्याचं आयुष्य प्रचंड वेगवान आहे. ‘नाऊ आॅर नेव्हर’अशी परिस्थिती अनेकवेळा आपल्यासमोर उभी ठाकते. त्यावेळी इतर बाबींचा विचार सोडत समोर असणाऱ्या आव्हानाचा मुकाबला जिद्दीने करणं नक्कीच आवश्यक आहे. पण हे करत असतानाही लाँग टर्म म्हणजेच दीर्घकालीन विचार करणंही आवश्यक आहे. या दोन विचारसरणींमध्ये योग्य ताळमेळ आपला आपण साधणं आवश्यक आहे. आयुष्य एकदाच जगायला मिळतं पण ते योग्य पध्दतीने जगलं तर एकदा जगणंही पुष्कळ होतं.

सगळ्यांना खूष ठेवणं बंद करा

हे कदाचित विनोदी वाटेल पण ही विचार करण्यासारखी बाब आहे. आपल्या आयुष्यात आपण शेकडो लोकांना भेटतो. त्यावेळी सगळ्यांशीच गोडगोड बोलत, भिडस्त स्वभाव ठेवत स-ग-ळ्यां-ची मर्जी राखण्याचा प्रयत्न करणं हे स्वत:साठी प्रचंड घातक ठरतं. त्यामुळे आयुष्यात कोण महत्त्वाचं आहे आणि कोण नाही याचा अंदाज घेत पुढे जाणं महत्त्वाचं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Habits you should give up if you want to be successful

ताज्या बातम्या