Hair Oil Benefits : भारतात केसांना तेल लावण्याची परंपरा अनेक वर्षे जुनी आहे. नियमित तेल मालिश केल्याने केस वेगाने लांब आणि दाट होतात, असे अनेकदा म्हटले जाते. पण खरंच असे घडते का? डर्मेटोलॉजिस्ट (त्वचारोगतज्ज्ञ) आणि आंतरराष्ट्रीय संशोधनानुसार, केसांना तेल लावल्याने थेट नवीन केस उगवतात किंवा ते वेगाने वाढतात, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही. अर्थात, काही तेल स्कॅल्प निरोगी ठेवण्यास, केस तुटण्यापासून वाचवण्यास आणि कोरडेपणा कमी करण्यास नक्कीच मदत करू शकतात. म्हणजेच, तेल केसांना मजबूत करू शकते, पण त्यामुळेच केस वाढतात असे म्हणता येणार नाही.

तेल केसांना कशा प्रकारे फायदा पोहोचवते?

हेअर एक्सपर्ट्सच्या मते, केसांना तेल लावण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे मॉइश्चर (ओलावा) आणि प्रोटेक्शन (संरक्षण) मिळणे हा आहे. अमेरिकेच्या ‘क्लीव्हलँड क्लिनिक’नुसार, केसांना तेल लावल्याने स्कॅल्प हायड्रेट राहण्यास आणि केस तुटण्यापासून वाचवण्यास मदत होऊ शकते.

‘हेल्थलाइन’च्या रिपोर्टनुसार, ऑलिव्ह ऑइल आणि इतर नॅचरल ऑइल्स केसांना मऊ आणि कमी फ्रीझी (रफ) बनवू शकतात, परंतु यामुळे केस वेगाने वाढतील, याचा कोणताही मजबूत वैज्ञानिक पुरावा सध्यातरी उपलब्ध नाही.

डर्मेटोलॉजिस्टचे काय म्हणणे आहे?

अनेक डर्मेटोलॉजिस्ट मानतात की, तेल केसांचा दर्जा सुधारू शकते, परंतु केसांच्या वाढीमध्ये मुख्य भूमिका ही जेनेटिक्स (अनुवांशिकता), हार्मोन्स, आहार आणि तुमच्या आरोग्याची असते. अमेरिकन ब्युटी मॅगझिन ‘ऑल्युअर’ (Allure) नुसार, एरंडेल तेलाबद्दल (Castor Oil) सोशल मीडियावर अनेक दावे केले जातात, परंतु यामुळे केस वेगाने वाढतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. एरंडेल तेल केसांना चमकदार बनवू शकते, पण केसांची वाढ वाढवण्याच्या दाव्यांमागे कोणतेही ठोस संशोधन नाही.

कोणते तेल थोडी मदत करू शकते?

काही संशोधनांमध्ये रोझमेरी ऑइलबद्दल (Rosemary Oil) सकारात्मक परिणाम नक्कीच पाहायला मिळाले आहेत. रोझमेरी ऑइल स्कॅल्पमधील रक्तभिसरण (Blood Circulation) सुधारू शकते आणि काही प्रकरणांमध्ये केस गळती कमी करण्यास मदत करू शकते. तरीही, तज्ज्ञ स्पष्ट सांगतात की, कोणत्याही तेलाला “मॅजिक हेअर ग्रोथ सोल्यूशन” मानले जाऊ नये. केसांच्या वाढीसाठी योग्य आहार, प्रोटीन, आयर्न, पुरेशी झोप आणि तणावमुक्ती (स्ट्रेस कंट्रोल) हे घटकही तितकेच महत्त्वाचे आहेत.

जास्त तेल लावणे देखील ठरू शकते नुकसानकारक

डॉक्टरांच्या मते, गरजेपेक्षा जास्त तेल लावल्याने स्कॅल्पवर घाण, कोंडा (डँड्रफ) आणि फंगल इन्फेक्शनची समस्या वाढू शकते. अनेकदा जड किंवा चिकट तेल पोअर्स (त्वचेची छिद्रे) ब्लॉक करतात, ज्यामुळे स्कॅल्पवर पिंपल्स किंवा खाज येण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच, आठवड्यातून १-२ वेळा हलक्या हाताने मालिश करणे आणि त्यानंतर योग्य पद्धतीने शॅम्पू करणे अधिक फायदेशीर मानले जाते.