Shweta Tiwari Hair Care Tips : वाढत्या वयानुसार अनेक महिलांचे केस कोरडे आणि निस्तेज होऊ लागतात. केस गळणे, केसांची चमक कमी होणे आणि केस कमकुवत होणे अशा समस्या जाणवू लागतात. टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीलाही असाच अनुभव आला. वयाच्या ४० वर्षांनंतर तिचे केस गळू लागले आणि त्यांची नैसर्गिक चमक कमी झाली. त्यामुळे तिने केसांची अधिक काळजी घेण्यास सुरुवात केली.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीचा असा विश्वास आहे की, केसांना कलर करणे, विविध उत्पादने वापरणे आणि वारंवार स्टायलिंग करणे टाळले पाहिजे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने तिच्या केसांच्या कशाप्रकारे काळजी घेते याबद्दलची दिनचर्या सांगितली. तिच्या म्हणण्यानुसार तुम्हाला तुमचे केस दीर्घकाळ सुरक्षित ठेवायचे असतील, तर तुम्ही तुमच्या विशीतच तुम्ही काही करणे चुका टाळल्या पाहिजेत. तर अभिनेत्रीने दिलेल्या केसांच्या संबंधित टिप्स तुमच्यासाठी खरोखरच उपयुक्त ठरू शकतात की नाही, हे आपण एका त्वचारोगतज्ज्ञाकडून जाणून घेऊया.

अभिनेत्रीने दिलेल्या टिप्स

केस धुण्यापूर्वी तेल लावा

अभिनेत्री तिचा अनुभव सांगताना म्हणाली काहीही झाले तरी, मी केसांना तेल लावल्याशिवाय धूत नाही. जरी ती पहाटे ३ किंवा ४ वाजता घरी परतली आणि दुसऱ्या दिवशी केस धुण्याची गरज असली तरीही ती केसांना तेल लावते आणि रात्रभर तसेच ठेवते.

विशीत टाळा ‘या’ चुका

केसांना जास्त प्रमाणात कलर लावण्याची गरज नाही. शिवाय, केसांची उत्पादने जास्त प्रमाणात वापरणे आणि वारंवार स्टायलिंग करणे टाळावे. केसांची काळजी घेणे म्हणजे केसांवर प्रयोग करणे नव्हे, तर त्यांना नुकसानीपासून वाचवणे आणि त्यांची योग्य काळजी घेणे होय.

वयाच्या ४० नंतर अभिनेत्रींच्या केसांमध्ये कोणते बदल होऊ लागले?

बऱ्याच काळापर्यंत अभिनेत्रीला केसांची कोणतीही मोठी समस्या नव्हती. केस कोरडे नव्हते, किंवा त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांना जास्त मेहनत घ्यावी लागत नव्हती. मात्र, वयाच्या ४० नंतर त्यांना त्यांच्या केसांमध्ये जास्त बदल जाणवू लागले. तिचे केस गळू लागले आणि कोरडे व निर्जीव झाले, ज्यामुळे खूप समस्यांचा सामना करावा लागला. याबद्दल सांगताना अभिनेत्री म्हणाली की, पेरिमेनोपॉज (रजोनिवृत्तीपूर्वी शरीरात होणारे हार्मोनल बदल) हे यामागचे कारण असू शकते. यानंतर, त्यांनी आपल्या केसांच्या काळजीकडे अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली.

चाळीशीनंतर केस का गळायला लागतात?

‘द इंडियन एक्सप्रेस’ला दिलेल्या एका मुलाखतीत, ‘द एस्थेटिक क्लिनिक्स’मधील सल्लागार त्वचारोगतज्ञ, कॉस्मेटिक त्वचारोगतज्ञ आणि त्वचारोग शल्यचिकित्सक डॉक्टर रिंकी कपूर यांनी स्पष्ट केले की, वय वाढू लागल्यावर केस गळणे आणि केसांची घनता कमी होणे अशा समस्या अनेकांना जाणवतात. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. चला, केस गळण्यामागची ही कारणे समजून घेऊया.

हार्मोन्समधील बदल

महिलांचे वय वाढू लागल्यावर शरीरातील इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सची पातळी कमी होऊ शकते. याचा परिणाम केसांच्या आरोग्यावर होतो आणि केस गळण्याची समस्या जाणवू शकते. पुरुषांमध्ये डीएचटी (DHT) हार्मोनचा प्रभाव वाढल्यामुळेही केस गळू शकतात.

आनुवंशिक कारणे

केस गळणे किंवा केस विरळ होणे यामागे आनुवंशिक कारणेही असू शकतात. म्हणजेच, कुटुंबातील आई-वडील किंवा इतर सदस्यांना केस गळण्याची समस्या असल्यास पुढील पिढीतील व्यक्तींनाही हा त्रास होण्याची शक्यता असते.

पोषक तत्वांची कमतरता

शरीरात आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांच्या कमतरतेमुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात.

टाळूतील रक्ताभिसरण कमी होणे

वाढत्या वयानुसार, टाळूतील रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम केसांच्या मुळांपर्यंत पोषक तत्वे पोहोचवण्यावर होतो.

आजार

थायरॉईडच्या समस्या, स्वयंप्रतिरोधक रोग (ऑटोइम्यून डिसीजेस) आणि काही दीर्घकालीन आरोग्य समस्यांमुळे देखील केस गळू शकतात.

केस निरोगी ठेवण्यासाठी काय करावे?

डॉक्टरांच्या मते काही सवयी बदलल्यास केसांचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते. जसे की,

प्रथिने आणि पोषक तत्वे

केस निरोगी ठेवण्यासाठी, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा. केसांच्या आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक आहे.

टाळूची मालिश

वेळोवेळी टाळूची हलक्या हाताने मालिश केल्याने टाळूतील रक्तसंचार सुधारण्यास मदत होते.

केसांनुसार उत्पादने निवडा

प्रत्येकाच्या केसांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे, तुमच्या केसांच्या प्रकारानुसार सौम्य आणि योग्य हेअरकेअर उत्पादने निवडा.

स्टायलिंग उपकरणे टाळा

हेअर ड्रायर, स्ट्रेटनर आणि कर्लरचा वारंवार वापर केल्याने तुमच्या केसांचे नुकसान होऊ शकते. त्यांचा वापर शक्य तितका कमी करा. अतिरिक्त रासायनिक उपचार टाळा.

तणाव घेऊ नका

तणावाचा देखील केसांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे, दररोज व्यायाम करा, पुरेशी विश्रांती घ्या आणि तुमच्या दैनंदिन जीवनात तणाव कमी करणाऱ्या गोष्टींचा समावेश करा.

डॉक्टरांच्या मते वाढत्या वयानुसार केसांमध्ये होणारे सर्व बदल रोखणे अशक्य आहे. पण, योग्य आहार, निरोगी जीवनशैली आणि आवश्यक असल्यास वैद्यकीय उपचारांमुळे केसांचे आरोग्य आणि पोत टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.