Hair Conditioning Mistakes : केसांच्या आरोग्यासाठी कंडिशनर हा हेअर केअर रुटीनचा (Hair Care Routine) एक महत्त्वाचा भाग आहे. खासकरून मुली लांब, मुलायम आणि चमकदार केसांसाठी नियमितपणे कंडिशनरचा वापर करतात. योग्य पद्धतीने कंडिशनर लावल्यास केस मोकळे राहतात आणि त्यांना चांगले पोषण मिळते. मात्र, केवळ कंडिशनर वापरणे पुरेसे नाही, तर ते लावण्याची योग्य पद्धत (How to Apply Hair Conditioner) ठाऊक असणे तितकेच गरजेचे आहे.

कंडिशनर लावताना केलेल्या काही चुकांमुळे केस टवटवीत दिसण्याऐवजी तेलकट, चिकट आणि निर्जीव वाटू शकतात. त्याशिवाय यामुळे स्कॅल्पवर उत्पादनाचा थर, धूळ, कचरा जमा होऊन केसगळती आणि केस तुटण्याची समस्या निर्माण होऊ शकते .चला जाणून घेऊया कंडिशनर लावताना कोणत्या चुका टाळायला हव्यात…

१. थेट स्क्ल्पॅवर कंडिशनर लावणे

कंडिशनर लावताना केली जाणारी सर्वांत मोठी चूक म्हणजे ते थेट स्कॅल्पवर (Scalp) किंवा केसांच्या मुळांशी लावणे. कंडिशनर हे फक्त केसांची लांबी आणि टोकांसाठी बनवलेले असते. मुळांशी कंडिशनर लावल्यास ते सहजासहजी निघत नाही आणि स्कॅल्पवर उत्पादनाचा थर जमा होतो. त्यामुळे केस अत्यंत तेलकट व चिकट होतात. त्यामुळे कंडिशनर नेहमी केसांच्या मध्यभागापासून टोकांपर्यंतच (Lengths & Ends) लावावे.

२. गरजेपेक्षा जास्त प्रमाणात कंडिशनर वापरणे

अनेकांचा असा समज असतो की, जास्त कंडिशनर वापरल्याने केस अधिक मुलायम आणि चमकदार होतील; परंतु जास्त प्रमाणात कंडिशनर वापरल्याने केस जड आणि तेलकट होऊ लागतात. कंडिशनरचे प्रमाण तुमच्या केसांची लांबी आणि दाटपणा यांवर अवलंबून असावे. सुरुवातीला थोडेसे कंडिशनर घेऊन, ते केसांवर पसरवा.

३. कंडिशनर लावल्यानंतर केस जोरात चोळणे/रगडणे

शॅम्पू केल्यानंतर केस अत्यंत नाजूक आणि संवेदनशील होतात. कंडिशनर सर्वत्र पसरवण्यासाठी अनेक जण केस जोरजोरात चोळतात, ज्यामुळे केस मोठ्या प्रमाणावर तुटू शकतात. कंडिशनर नेहमी हलक्या हाताने केसांवर पसरवावे. केसांमध्ये जास्त गुंता झाला असल्यास कंडिशनर लावल्यावर मोठ्या दातांच्या कंगव्याने (Wide-tooth Comb) हलक्या हाताने केस विंचरून घ्यावेत.

४. पाणी लावून केस व्यवस्थित न धुणे

कंडिशनर लावल्यानंतर ते पाण्याने नीट स्वच्छ करणे अत्यंत आवश्यक आहे. कंडिशनर केसांमध्ये शिल्लक राहिल्यास ते सुकल्यानंतर केस चिकट होतात आणि स्कॅल्पवर खाज सुटू शकते. तसेच, कंडिशनर केसांवर किती वेळ ठेवावे यासाठी बाटलीवरील सूचना (Instructions) नक्की वाचाव्यात आणि ठरवीक वेळेनंतर केस स्वच्छ धुवावेत.

५. केसांच्या प्रकारानुसार योग्य कंडिशनर न निवडणे

प्रत्येक व्यक्तीच्या केसांचा पोत वेगवेगळा असतो. त्यामुळे सर्वांसाठी एकच कंडिशनर उपयुक्त ठरू शकत नाही. बारीक/पातळ केस असलेल्यांनी लाईटवेट किंवा व्हॉल्युमायजिंग कंडिशनर वापरावे; तर कोरड्या, जाड किंवा कुरळ्या केसांसाठी जास्त मॉइश्चरायझिंग/हायड्रेटिंग कंडिशनरची गरज असते. तुमच्या केसांच्या गरजेनुसार योग्य प्रॉडक्ट निवडल्यासच उत्तम निकाल मिळतो.