Hantavirus Alert : हल्ली कितीही लहान आणि मोठं घर असो, तिथे उंदरांचा वावर दिसून येतो; पण हे उंदीर फक्त घरातच घाण करत नाहीत, तर अनेक वस्तूंची नासाडी करून टाकतात. या उंदरांच्या विष्ठा, मूत्र, लाळ आणि शरीरावर विविध प्रकारचे विषाणू आणि जीवाणू असतात. त्यांच्या संपर्कात आल्याने उंदरांचे विषाणू आणि जीवाणू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात, ज्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात.
डच क्रूझ जहाज एमव्ही होंडियसवर सध्या नवा हंता व्हायरसचा धोका वाढतोय. हंता व्हायरस हा उंदरांमुळे पसरणारा एक आजार आहे, जो संक्रमित उंदरांच्या विष्ठा, मूत्र किंवा लाळेच्या संपर्कातून पसरू शकतो. सध्या हंता व्हायरसवर कोणतीही उपचार पद्धती किंवा औषध उपलब्ध नाही. त्याची सुरुवातीची लक्षणे सामान्य सर्दीच्या लक्षणांसारखीच असतात. त्यामुळे तुमच्याही घरात उंदीर असतील तर त्यांची विष्ठा झाडूने साफ करण्याची चूक करू नका; अन्यथा यामुळे तुम्हालाही या आजाराचा धोका वाढू शकतो.
उंदरांचा प्रादुर्भाव असलेली जागा झाडून साफ करणे ठरेल हानिकारक?
उंदरांच्या विष्ठेमध्ये विविध प्रकारचे विषाणू आणि जीवाणू असतात, जे झाडूने साफ केल्याने किंवा व्हॅक्यूम केल्याने त्यातील विषाणू हवेत पसरू शकतात आणि श्वासावाटे तुमच्या शरीरात जाऊ शकतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. जर उंदरांना हंता व्हायरससारख्या विषाणूंचा संसर्ग झाला असेल, तर ते तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे उंदरांची विष्ठा कधीही थेट जमिनीवर झाडू मारून साफ करू नये.
उंदराची विष्ठा साफ करण्याची योग्य पद्धत कोणती?
अमेरिकेच्या रोग नियंत्रण केंद्राने (CDC) उंदराची विष्ठा साफ करण्याची योग्य पद्धत सांगितली आहे. सर्वप्रथम उंदराने जिथे विष्ठा टाकली आहे, ती जागा जोपर्यंत पूर्णपणे ओली होत नाही तोपर्यंत त्या जागेवर फिनेल फवारा. पाच मिनिटांनंतर संपूर्ण घाण उचलण्यासाठी पेपर टॉवेल किंवा फॉईलचा वापर करा. त्यानंतर ती जागा फिनेलने पूर्णपणे पुसून घ्या. मेलेला उंदीर काढण्यासाठीही याच पद्धतीचा वापर करा.
उंदरांचा प्रादुर्भाव असलेली जागा स्वच्छ करताना टाळा ‘या’ चुका
उंदराची विष्ठा थेट हाताने कधीही उचलू नका. हातमोजे वापरा, ते नसल्यास हाताभोवती प्लास्टिक पिशवी गुंडाळा. थेट हाताने कचरा उचलल्याने तुमच्या नखांमध्ये घाण अडकू शकते, जे हानिकारक ठरू शकते. साफसफाई झाल्यावर कचरापेटीतील कचरा बांधून बाहेर फेकून द्या. आपले हात साबणाने स्वच्छ धुवा.
घर उंदरांपासून मुक्त कसे ठेवावे?
उंदरांचा घरात वाढणारा सुळसुळाट पूर्णपणे रोखण्यासाठी तुम्हाला तीन महत्त्वाच्या गोष्टी करणे आवश्यक आहे. एक म्हणजे ज्या जागेतून उंदीर घरात शिरतात, ती जागा उंदरांसाठी बंद करा. उदाहरणार्थ- गटारांवर जाळी लावा आणि खिडक्या व दारे बंद करा. त्यानंतर घरात कुठेही अन्न उघडे ठेवणे टाळा. भाज्या बंद जाळीत ठेवा, खाद्यपदार्थ डब्यांमध्ये ठेवा आणि स्वयंपाकघरातील कचऱ्याचा डब्बा उघडा ठेवू नका. अनेक लोक उंदरांना दूर ठेवण्यासाठी पेपरमिंट तेलाचा वापर करतात. पेपरमिंट तेलात भिजवलेले कापसाचे गोळे उंदीर घर करीत असलेल्या कोणत्याही ठिकाणी ठेवता येतात.
