Hantavirus Early Warning Signs: अटलांटिक महासागरात फिरण्यासाठी निघालेल्या एका आलिशान क्रूझ शिपवर अचानक भीतीचं सावट पसरलं आहे. १४७ प्रवासी आणि क्रू मेंबर्सना घेऊन प्रवास करणाऱ्या MV Hondius या लक्झरी जहाजावर हंता व्हायरसचे संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. या धोकादायक संसर्गामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच WHO ने या घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.
सुरुवातीला काही प्रवाशांना साधा ताप, अंगदुखी आणि उलट्यांचा त्रास होत असल्याचं समजलं. मात्र काही तासांतच अनेकांची प्रकृती अचानक खालावू लागली. काहींना श्वास घेण्यास प्रचंड त्रास होऊ लागला; तर काहींमध्ये न्यूमोनियासारखी गंभीर लक्षणं दिसून आली. जहाजावर एकच गोंधळ उडाला आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं. परिस्थिती गंभीर होताच बाधित प्रवाशांना जहाजावरच विलगीकरणात ठेवून, उपचार सुरू करण्यात आले आहेत.
नेमका काय आहे हंता व्हायरस?
हंता व्हायरस हा अत्यंत धोकादायक विषाणू मानला जातो. हा विषाणू प्रामुख्याने उंदीर, खार यांसारख्या कुरतडणाऱ्या प्राण्यांमधून मानवांमध्ये पसरतो. संक्रमित प्राण्यांच्या लघवी, विष्ठा किंवा लाळेच्या संपर्कात आल्यास मनुष्याला त्याचा संसर्ग होऊ शकतो. विशेष म्हणजे हा विषाणू हवेत मिसळलेल्या सूक्ष्म कणांमधूनही शरीरात प्रवेश करू शकतो.
या विषाणूचा मनुष्याकडून मनुष्यामध्ये संसर्ग पसरण्याचे प्रकार फारच कमी प्रमाणात आढळले आहेत. मात्र, १९९६ मध्ये एंडीज प्रकारच्या हंता व्हायरसमुळे काही व्यक्तींमध्ये मानवातून मानवात संक्रमण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळेच आता या क्रूझवर संसर्ग नेमका कसा पसरला, याचा शोध WHO घेत आहे.
सुरुवातीला साधी लक्षणं… नंतर अचानक जीवघेणी स्थिती
हंता व्हायरसची सुरुवातीची लक्षणं अगदी सामान्य तापासारखी वाटतात. त्यामुळे अनेकदा रुग्ण सुरुवातीला याकडे दुर्लक्ष करतात. पण काही दिवसांतच हा विषाणू फुप्फुसांवर किंवा मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करू शकतो. संक्रमित व्यक्तींमध्ये सुरुवातीला तीव्र थकवा, ताप, स्नायूंमध्ये वेदना, डोकेदुखी, चक्कर येणे व थंडी वाजणे अशी लक्षणं दिसतात. त्यासोबत उलट्या, जुलाब आणि पोटदुखीचाही त्रास होऊ शकतो.
डॉक्टरांच्या माहितीनुसार, साधारण १० दिवसांनंतर परिस्थिती अधिक गंभीर बनते. रुग्णाला सतत खोकला येऊ लागतो आणि श्वास घेणं कठीण होतं. काही रुग्णांच्या फुप्फुसांमध्ये पाणी साचू लागतं. छातीत दडपण जाणवतं आणि ऑक्सिजनची पातळी झपाट्यानं कमी होऊ शकते. ही अवस्था अत्यंत धोकादायक मानली जाते.
हंता व्हायरसचे दोन घातक प्रकार
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, हंता व्हायरसमुळे मुख्यतः दोन गंभीर सिंड्रोम निर्माण होतात.
१) हंता व्हायरस पल्मोनरी सिंड्रोम (HPS)
हा प्रकार थेट फुप्फुसांवर हल्ला करतो. त्यात रुग्णाला श्वास घेणं कठीण होतं. काही वेळा रुग्णाला कृत्रिम श्वसनयंत्रावर ठेवण्याची वेळ येते. वैद्यकीय अहवालांनुसार, या प्रकारात मृत्युदर तब्बल ३८ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो.
२) हेमोरेजिक फिवर विथ रेनल सिंड्रोम (HFRS)
हा प्रकार मूत्रपिंडांवर गंभीर परिणाम करतो. त्यात रुग्णाला तीव्र डोकेदुखी, पाठीचा त्रास, पोटदुखी, धूसर दिसणे, त्वचेवर लाल पुरळ आणि रक्तदाब अचानक कमी होणे अशी लक्षणं दिसतात. काही प्रकरणांत अंतर्गत रक्तस्राव होऊन किडनी निकामी होण्याचाही धोका असतो.
तज्ज्ञांच्या मते, हंतान व डोब्रावा या प्रकारच्या विषाणूंमुळे सर्वाधिक गंभीर परिणाम दिसून येतात.
उपचार अजूनही अनिश्चित
सर्वांत चिंतेची बाब म्हणजे हंता व्हायरसवर अद्याप ठोस औषध किंवा निश्चित उपचार उपलब्ध नाहीत. डॉक्टर सध्या रुग्णांच्या लक्षणांनुसार उपचार करीत आहेत. रुग्णांना विश्रांती, पुरेसं पाणी आणि वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येतं. फुप्फुसांवर परिणाम झाल्यास रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची मदत घ्यावी लागू शकते. तर, किडनीवर परिणाम झाल्यास डायलिसिसची गरज भासू शकते.
WHO सतर्क; जगभरातील चिंतेत वाढ
क्रूझ जहाजावर अचानक उघड झालेल्या या प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बंदिस्त जागेत मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र असल्याने संसर्ग झपाट्यानं पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. WHO नं या घटनेवर बारकाईनं लक्ष ठेवलं असून, संसर्गाचा नेमका स्रोत शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे. “समुद्रात फिरायला गेलेल्या प्रवाशांवर मृत्यूचं सावट”, “श्वास घेता घेता थांबले जीव” अशा चर्चांमुळे अनेकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
