सुप्रसिद्ध भारतीय स्टँड-अप-कॉमेडियन झाकीर खान याचा आज वाढदिवस. खरंतर तुम्हाला त्याची वेगळी औपचारिक ओळख करून द्यायची काहीच गरजच नाही, कारण त्याचं नावच पुरेसं आहे. विशेषतः तरुण-तरुणींना त्याने पुरती भुरळ घातली आहे. आपल्या भन्नाट कॉमिक टाइमिंगमुळे त्याने असंख्य मनं जिंकली. पण विनोदी कलाकार ही एवढीच त्याची ओळख नाही. कारण, लोकांना खळखळून हसवत ठेवण्यासोबतच झाकीरकडे त्यांना अंतर्मुख करण्याची कला देखील आहे. एक प्रसिद्ध विनोदी कलाकार असण्यासोबतच लोकप्रिय कवी अशी देखील पदवी झाकीरला याचमुळे मिळाली. उत्तम टायमिंग, जबरदस्त देसी कॉमेडी, प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श करणारा अनोखा दृष्टिकोन आणि व्यक्तिमत्व ही झाकीरची खरी ताकद आहे.
झाकीरने २०१२ मध्ये विनीजिन कॉमेडी सेंट्रलच्या भारतातील तिसऱ्या बेस्ट स्टँड अप कॉमेडियन स्पर्धेतून लोकप्रियता मिळवली. याव्यतिरिक्त, तो ऑन एअर विथ एअर या न्यूज कॉमेडी शोचा भाग बनला आहे. अॅमेझॉन प्राइमवर ‘कक्षा ग्यारवी’ आणि ‘हक से सिंगल’ ही त्यांची लोकप्रिय काम आहेत. झाकीरने अॅमेझॉन प्राइमची वेब सीरिज ‘चाचा विधायक हैं हमारे’मध्ये देखील नायकाचं पात्र साकारलं आणि लिहिलं आहे.
जन्म आणि शिक्षण
झाकीर खान याचा जन्म २० ऑगस्ट १९८७ रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. त्याच्या वडिलांचं नाव इस्माईल खान आणि आईचं नाव कुलसूम खान आहे. झिशान खान, अरबाज खान हे दोन भाऊ आहेत.
झाकीर खानने बी.कॉमचे शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर कॉमेडियन बनण्याचं आपलं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने त्याचा प्रवास सुरु झाला. संगीताचा वारसा झाकीर खानला त्याच्या वडिलांकडून मिळाला. खुद्द झाकीरनेही सतारमध्ये डिप्लोमा केला आहे.
प्रचंड संघर्ष आणि जिद्द
झाकीरला लहानपणापासूनच विनोदाची प्रचंड आवड होती. पण आवड असणं आणि त्यात यशस्वी होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मात्र, झाकीरने आपली हीच आवड जोपासत यश मिळवण्याची कामगिरी करून दाखवलीच. निश्चितच त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. असं सांगितलं जातं कि, जेव्हा झाकीरने पहिल्यांदा स्टँड-अप कॉमेडी शोमध्ये भाग घेतला. तेव्हा त्याला २ मिनिटांच्या आत स्टेज सोडण्यास सांगितलं गेलं होतं. पण पॅशन ही अशी गोष्ट आहे ज्यात माणूस जिद्द कधीही सोडत नाही. झाकीरने हार मानली नाही. तो सातत्याने स्वतःवर मेहनत घेत राहिला. आपलं काम सुधारत राहिला.
झाकीरला लेखनाची प्रचंड आवड आहे. झाकीरने अनेक उत्तम कविता लिहिल्या आहेत. कॉमेडियन बनण्याआधी, झाकीर खानने पैसे कमवण्यासाठी ४ वर्षे Fever 104 FM साठी कॉपी रायटर आणि रिसर्चर म्हणूनही काम केले. याआधी, झाकीरने दिल्लीतील आपल्या प्रचंड संघर्षाच्या दिवसांमध्ये अनेक दिवस सतारवादक म्हणून काम केलं आहे.
स्वप्नपूर्ती
२०१२ साली झाकीर खानच्या जीवनात एक मोठा बदल झाला. जेव्हा त्याने कॉमेडी सेंट्रल चॅनेलच्या इंडियाज बेस्ट स्टँड-अप कॉमेडियन शोमध्ये भाग घेतला. नुसता भाग घेतला नाही तर तो विजेता ठरला. आता झाकीर खान प्रसिद्ध होऊ लागला होता. दिल्ली एनसीआरमध्ये अनेक शो करत होता.
२०१५ मध्ये एआयबी यूट्यूब चॅनेलने एआयबीसह आपला नवीन शो ऑन एअर सुरू केला. ज्यासाठी ते हिंदी कॉमेडियन शोधत होते. झाकीरचा मित्र कॉमेडियन राघव मांडवा याने त्याची AIB ला शिफारस केली. AIB ला झाकीरचं काम प्रचंड आवडले. त्यांनी झाकीरला AIB मध्ये नोकरी देऊ केली. दुसरीकडे, झाकीरलाही देखील स्वप्नगरी असलेल्या मुंबईमध्ये यायचंच होतं. त्यामुळे, त्याने ही ऑफर स्वीकारली आणि तो मुंबईत आला.
AIB सह ऑन एअरच्या हिंदी व्हर्जनला चांगला प्रतिसाद मिळाला आणि झाकीरला मुंबईतही यश मिळू लागले. झाकीर कॅनव्हास लाफ क्लबमध्ये सामील झाला आणि त्याने अनेक यशस्वी शो केले. भारताशिवाय झाकीरने दुबई, सिंगापूर, फिलिपिन्ससारख्या अनेक देशांमध्ये शो केले आहेत.
झाकीर खानच्या यशाने प्रभावित होऊन अॅमेझॉनने झाकीरला अॅमेझॉन प्राइम स्पेशलसाठी साइन केले. झाकीर खानचे ‘हक से सिंगल’ आणि ‘कक्षा ग्यारवी’ हे शोज अॅमेझॉन प्राइमवर प्रचंड हिट झाले.
झाकीर आपल्या स्वप्नांच्या दिशेने वेगाने यशाची एक एक नवी शिखरं उंची गाठत चालला आहे. आपल्या चाहत्यांचं प्रचंड प्रेम आणि शुभेच्छा निश्चितच झाकीरला त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी आणखी गती आणि बळ देतील.
झाकीर खानच्या शायरी
- अपने आप के भी पीछे खड़ा हूँ में,
ज़िन्दगी , कितने धीरे चला हूँ मैं…
और मुझे जगाने जो और भी हसीं होकर आते थे,
उन् ख़्वाबों को सच समझकर सोया रहा हूँ मैं….
- मेरी जमीन तुमसे गहरी रही है,
वक़्त आने दो, आसमान भी तुमसे ऊंचा रहेगा।
- अब वो आग नहीं रही, न शोलो जैसा दहकता हूँ,
रंग भी सब के जैसा है, सबसे ही तो महेकता हूँ…
एक आरसे से हूँ थामे कश्ती को भवर में,
तूफ़ान से भी ज्यादा साहिल से डरता हूँ…
- बस का इंतज़ार करते हुए,
मेट्रो में खड़े खड़े
रिक्शा में बैठे हुए
गहरे शुन्य में क्या देखते रहते हो?
गुम्म सा चेहरा लिए क्या सोचते हो?
क्या खोया और क्या पाया का हिसाब नहीं लगा पाए न इस बार भी?
घर नहीं जा पाए न इस बार भी?