#HappyFriendshipDay: चला पुन्हा कट्टी-बट्टीकडे, कारण…

नामशेष होणाऱ्या शब्दांची यादी वगैरे टाइप असं काही असतं तर कट्टी-बट्टी या दोन शब्दांनेच त्या यादीची सुरुवात झाली असती, नाही का?

कट्टी-बट्टी

Somewhere between कट्टी-बट्टी & Block-Unblock we have grown up…
म्हणजेच
कट्टी-बट्टी आणि ब्लॉक-अनब्लॉक करण्याच्या दरम्यान कुठेतरी आपण मोठे झालो

या एका वाक्यातच सर्व काही आलं नाही. लहानपणी अंगठ्याच्या बाजूची दोन बोटं एकत्र येऊन घेतलेल्या बट्टीने मित्र एकत्र यायचे तर एकट्या करंगळीच्या मदतीने त्याला वाळीत टाकल्याप्रमाणे त्याच्याशी कट्टी घेतली जायची. खूप रेअर झालेत हे शब्द. म्हणजे नामशेष होणाऱ्या शब्दांची यादी वगैरे टाइप असं काही असतं तर या दोन शब्दांनेच त्या यादीची सुरुवात झाली असती नाही?

याच कट्टी-बट्टीची जागा आता ब्लॉक आणि अनब्लॉकने घेतलीय. म्हणजे एकीकडे एकत्र राहण्याच्या आणाभाका खायच्या (मैत्रीत आणि प्रेमातही) आणि ब्रेकअप किंवा जरा कुठे थोडं खळ्ळखट्याक झालं की त्याला किंवा तिला ब्लॉक करायचं. काहीजण यापुढे जाऊन चक्क लोकांना अनफ्रेण्ड करतात. हा असा वेडेपणा करणारी लोकं म्हणजे ‘देवाने एवढं मोठं शरीर बनवलं पण त्यात मेंदूसाठी थोडीशी जागा द्यायला विसरला वाटतं’ या कॅटेगरीतली वाटतात. मध्यंतरी मला एका मैत्रिणीने ग्रुपमधून रिमूव्ह केलं. मला ते माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने सांगितल्यावर कळलं. काय चूक होती ती पण माहित नाही. आधी करायचो मी बावळटपणा पर्सनलवर जाऊन विचारायचा का केलं बाई असं वगैरे मग त्यावर एक तास चर्चा करून वेळ तर जायचाच पण फोनची बॅटरी आणि कितीही फुकट म्हटलं तरी पैसे मोजावे लागतात त्या वायफायचा डेटा पण जायचा. मग हे असं एखाद्याला कोणत्याही टुकार कारणासाठी पटवत राहणं किती योग्य आहे अशी शंकेची पाल मनात चुकचुकायची. थोडं शहाणपण आलं आणि या पालीची मगर झाली आणि सगळ्यांना इग्नोर करत ब्लॉक किंवा रिमुव्ह केल्यानंतर असलं प्रश्न उत्तरांचा कौन बनेगा करोडपती खेळणं बंद केलं. नाय ठेवायचंय ग्रुपमध्ये नको ठेऊ बाई, तू नव्हती, व्हॉट्सअप नव्हतं, तेव्हा ग्रुप नव्हते, मित्र नव्हते असं नाहीय, त्या ग्रुमध्ये पण जास्त फॉर्वडेडच असायचे, बोलले लोकं तरी मी त्यात नसायचो त्यामुळे लय डोक्याला शॉट लावून घेण्यात अर्थ नाही म्हणत नाद सोडून दिला.

लोकं ब्लॉक पण करतात भांडण किंवा अगदी टोकाचं म्हटलं तर प्रेमात ब्रेकअप झाल्यावर. तिला त्याला अशा काही पद्धतीने ब्लॉक करते की जसा हा मोठा बाजीगरमधल्या शाहरुखसारखा दुसरी पोरगी सोडून हिच्याच मागे लागणार आहे. (किंवा उलटीही केस असू शकते पोरंही पोरींना ब्लॉक करतात). माझ्या एक मित्राने तर माझ्या मैत्रिणीला त्याच्या एक्सचा फोटो फेसबुकवर लाईक केला म्हणून ब्लॉक केलंय हे म्हणजे घेणं ना देणं आणि दुसऱ्याच्या दारात कंदील लावून येणं. एकीकडे एक्स म्हणायचं आणि कोणी तिचा फोटो लाइक केल्यावर वेड्यासारखं वागायचं काहा का न्याय है ये जज साहाब? (सॉरी जरा वाहत गेलो आणि फिल्मी झालो बिंग टीपिकल इंडियन काय करणार ना?) तर आता आम्ही कसं वागायचं कोणाच्या एक्सचा, व्हायचा फोटो लाईक करायचा हे सगळं सोशल मिडिया ठरवणार. अमूकचा फोटो लाइक केला तमूकवर कमेन्ट केली म्हणून आलाना फलानाने ब्लॉक केलं, फ्रेण्डलिस्टमधून काढून टाकलं याला बालिशपणा पण म्हणता येणार नाही कारण बालिशपणामध्ये पण थोडी अक्कल वापरली जाते. हे म्हणजे डोकं आहे की खुळखुळा असा प्रश्न पडण्यासारखे वागणे आहे.

सर्वात मोठी अडचण म्हणजे कट्टी-बट्टी समोरासमोर घेतली जायची. व्हॉट्सअपवरून बोटं पाठवून, व्हाइस मेसेज पाठवून, वॉलवर पोस्ट करून कोणी कट्टी घेतल्याचं उभ्या-आडव्या मानव इतिहासात सापडत नाही. (आडव्या म्हटलंय कारण लोळत पण आपण सोशल नेटवर्किंग वापरतो) कट्टी-बट्टीमधली भावना रियल असायची ती व्हर्च्युअल नसायची. त्यामुळे मनवणे वगैरे खऱ्या आयुष्यात व्हायचं समोरासमोर. एकमेकांच्या भावनांना तेव्हा मैत्रीत स्थान होतं. आजसारख्या स्मायलीजची गरज नव्हती पडत तेव्हा. आज या ब्लॉक, अनफ्रेण्ड अशा बावळटपणात मुळात भावनाच नाहीयत तर रुसवेफुगवे दूर करणं लांबच झालं. आला मोठा ब्लॉक करणारा मीच करणार होतो त्याला ब्लॉक, बरं झालं त्यानेच अनफ्रेण्ड केलं ही आपली नॉर्मल रिअॅक्शन असते. या पाच इंची, अठरा इंची (लॅपटॉपची स्क्रीन) स्क्रीनमुळे लोकांमधल्या भावना अधिक गोंधळाच्या झाल्यात. लोकं काही जवळ वगैरे आली नाहीयत असं मला वाटतं फक्त जवळ आल्यासारखं वाटतंय सतत कॉन्टॅक्टमध्ये असल्याने. पण भावनांच काय? त्या तर मेल्या ना? म्हणजे मी जिला रोज भेटतो तिच्या आवाजातला फरक मला फोनवरून कळतो. पण नुसतं फोनवरूनच बोलत असेल तर काय कळणारा हा छोटा फरक. या व्हर्च्युअल जगाचा खऱ्या लाइफमध्ये पण महाभयंकर परिणाम झालाय म्हणजे माझी एक मैत्रीण आता एखाद्या टुकार जोकवर नॉर्मल हसण्याऐवजी किंवा जोक खूपच घाण असल्यावर लूक देण्याऐवजी ‘लोल’ किंवा ‘रोल्फ’ हा शब्द चक्क तोंडाने म्हणते. काही जण अगदी ग्रामर नाझीनंतर हेच असल्यासारखे स्पेलिंग सहीत हसतात रियल लाइफमध्ये म्हणजे ‘एलओएल लोल’ म्हणतात खऱ्याखुऱ्या आयुष्यातील जोकवर तेही चारचौघात. मला या टर्म अशा खऱ्याखुऱ्या आयुष्यात वापरणाऱ्यांसाठी खराखुरा बुक्का अगदी नाकावर मारावासा वाटतो. पण असो चालायचं. किती आहारी जायचं हा ज्याचा त्याचा निर्णय आहे मी कोण बाजीराव लागून गेलो त्याच्या आयुष्यातील पानिपतात उडी मारायला. आपलं सोसलं तेवढं नेटवर्कींग करायचं अन् त्यालाच सोशलनेटवर्कींग म्हणायचं

तर सांगायचा मुद्दा काय होता की, कट्टी-बट्टी आजपासून वापरून पाहायला काय झालं ना? म्हणजे फक ऑफ म्हटल्यावर राग येतो पण तेच उद्या भांडण झाल्यावर तुम्ही कट्टी फू म्हणालात तर समोरचा एकदा रिचेकिंगला टाकेल त्याचा निर्णय त्याच क्षणी खऱच मी या बावळटशी भांडू की नको? किंवा पोरगी असेल तर चक्क तुमचे गाल ओढून Awwwww How Cute…. असं म्हणून कुठून सुचलं हे वगैरे विचारून कट्टी-बट्टीचा अख्खा इतिहास भूगोल विचारून घेईल. (हे होप्स वाढवणे झालंच पण कट्टी-बट्टीबद्दल अभ्यास करून तो वापराबद्दचा वैधानिक इशाराही समजा). दुसरी गोष्ट म्हणजे बट्टीमध्ये तर सारखेपेक्षा जास्त गोडवा आहे. म्हणूनच लहान मुले वगळता कोणी ते वापरत नसावे उगच मधुमेह झाला तर कुठे पंचाईत करत बसा त्यापेक्षा ओके, हम्मम्मम्म (या वर गाई-म्हशी म्हणे कॉपीराईटची केस करणार, खरं देवलाच माहिती), के हे शब्द बरे. हे पाठवल्यावर कसं आपण पटलोय की नाही समोरच्याला काही कळतं नाही आणि पुढे काय पाठवायचं विचार करेपर्यंत आपण ऑफलाइन. अनेकदा फोनवरून तर कधीकधी कायमचे ऑफलाइन गेलेलो असतो (एक्सप्लनेशन येण्याआधीच) मैत्रीच्या ट्रॅकवरून….

या डिजीटल जगात हे दोन गोंडस शब्द परत वापरायला सुरवात करायला काय हरतकय ना…

Happy Friendship Day… आणि आज तुमच्या जवळच्या मित्राला मी तुझ्याबरोबर बट्टी केलीय आय़ुष्यभराची हे नक्की सांगा…

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Happy friendship day lets go back to katti batti days again

ताज्या बातम्या