आईचे प्रेम, ममता, वात्सल्य, पाठिंबा, बळ यासाठी एक दिवस पुरेसा नाही. पण आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिवस साजरा केला जातो. तो म्हणजे मदर्स डे. आज, १० मे रोजी भारतासह जगभरात ‘मदर्स डे’ उत्सहात साजरा केला जात आहे. आईवरचं प्रेम साजरं करण्याचा हा दिवस. खरंतर आईवरील प्रेम दाखवण्यासाठी किंवा व्यक्त करण्यासाठी एक दिवस पुरेसा आहे का? किंवा एकच दिवस का? यांसारखे प्रश्न, शंका दूर सारून आजकाल तरुणाई मदर्स डे अगदी उत्साहाने साजरा करताना दिसतेय. आजच्या दिवशी प्रत्येकजण आपल्या आईला हटके गिफ्ट देण्याचा प्रयत्न करत असेल. आईच्या आयुष्यभर लक्षात राहिल असं गिफ्ट देण्याचा प्रयत्न लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वचजण करत असतील. आज आम्ही असेच हटके गिफ्टबद्दल तुम्हाला सांगणार आहोत… आजच्या दिवशी आईला खास वचन देऊन मदर्स डे साजरा करा.. आईचं मन भारावून गेल्याशिवाय राहणार नाही.. आईला तुम्ही काय आणि कोणतं वचन देऊ शकता याबद्दलची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत..

किमान एक वेळचं जेवण एकत्र
सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे सर्व कुटुंबातील सदस्या घरीच असतील. त्यामुळे चांगला वेळ जात असेल. पण लॉकडाउन संपल्यानंतर परिस्थिती पुर्वपदावर आली की दररोजचं रूटीन सुरू होईल. त्यावेळी कामाच्या प्रेशर आणि व्यापामुळे अनेकदा कोणालाही वेळ देता येत नाही. पण शक्य असेल तर नियमित किमान एक वेळचं जेवण घरातील सार्‍या व्यक्तींसोबत एकत्र करण्याचा प्रयत्न करा… हे वचन तुम्ही आईला द्या… आई खूश होईल..

संवाद
आजच्या युगातील टेक्नोसेव्ही मुलं आणि पालकं बोलणं कमी आणि सोशल मीडियावर जास्त वेळ घालताना दिसतात. तसेच आजकाल शाळा, कॉलेजमध्ये जाणारी मुलं असोत किंवा अगदी नोकरीच्या मागे धावणारी नोकरदार मंडळी सार्‍यांचं जीवन इतकं घडाळ्याच्या काट्यावर धावतंय की एकाच घरात राहूनदेखील आपल्याच कुटूंबातील व्यक्तींशी बोलायला वेळ नसतो. त्यामुळे कुटुंबात सोबत राहूनही दुरावा निर्माण होतो. त्यामुळे आजकाल भांडणाचं प्रमाण वाढल्याचं दिसतेय. आज मदर्स डे आहे. त्यानिमित्ताने आईला एक असं वचन द्या की कितीही कामात असाल तरीही दिवसातील काही वेळ तिच्याशी बोलण्यासाठी, एकमेकांच्या मनातलं शेअर करण्यासाठी वेळ राखून ठेवलेला असेल.

सोशल मीडियाचा वापर मर्यादित –
सोशल मीडिया दुधारी शास्तर आहे. त्याचं जितके फायदे तितकेच तोटेही आहेत. आजची पिढी टेक्नोसेव्ही झाली आहे. कामधंदा सोडून सतत मोबाइलवर व्यस्त असल्याचे दिसते. व्हर्च्युअल जगताना आपण कधी त्याच्या आहारी जातो याचं भान राहत नाही. समोरासमोर बसूनही स्मार्टफोनमध्ये डोकं खूपसुन बसणं टाळा.

नैराश्य

आपण अनेकदा ज्या गोष्टी आपल्याकडे जे नाही त्याचं दुःख घेऊन किंवा त्याबद्दल इवळत असतो. त्यामुळे नैराश्यात जाण्याची शक्यता आधिक असतो. पॉझिटिव्ह विचार करा. त्यामुळे नैराश्य तुमच्याकडे फिरकणारही नाही. तुम्ही आनंदात असाल तर घरातील सर्वजणच आनंदात राहतील. अनेकदा नकळत नैराश्यात टोकचं पाऊल उचलतात. एका चूकीच्या निर्णयामुळे सार्‍या कुटूंबाची फरफट होते त्यामुळे नैराश्य आलं तरीही त्याचा सामना करायला शिका… हे वचन आईला द्यायला विसरू नका.

गृहीत धरणं टाळा
हक्काच्या माणसांना आपण कळत नकळत गृहीत धरतो. आणि प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती म्हणजे आई असतेच. पण यंदाच्या मदर्स डे पासून तिला गृहीत धरणं बंद करा.