Constipation Relief Tips: खराब आहार, धावपळीची जीवनशैली, तणाव, शरीराच्या हालचालींचा अभाव, फायबरचे कमी सेवन आणि कमी पाणी पिण्याची सवय ही बद्धकोष्ठता आणि पोटाच्या आजारांची मुख्य कारणे आहेत. ही समस्या काही आठवडे, काही महिने किंवा कधीतरी नसते, मात्र ती सातत्याने असेल तर ती तुमचे आरोग्य खराब करू शकते. बराच काळ असणाऱ्या बद्धकोष्ठतेमुळे पोटातून आतड्यांपर्यंत अन्न कुजू शकते. बद्धकोष्ठतेमध्ये मल कडक किंवा कोरडे होते आणि शौचास जास्त प्रेशर द्यावे लागते परिणामी मूळव्याध होण्याचा धोका वाढू शकतो.
आयुर्वेदाचार्य दीपक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजकाल लोकांची दिनचर्या आणि खाण्याच्या सवयी खूप बिघडल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत जागणे, पुरेशी झोप न घेणे, पोषक पदार्थ आणि फायबरची कमतरता असलेले अन्न खाणे, तळलेले अन्न, पॅकेज्ड अन्न खाणे यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. वेळेवर न उठणे आणि दिनचर्येतील अनियमितता यासारख्या सवयींमुळे बद्धकोष्ठता आणि पोटाचे आजारदेखील होऊ शकतात. यासाठी आयुर्वेदात ७ नैसर्गिक उपाय सांगितले आहे.
झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या
आयुर्वेदाचार्य दीपक कुमार यांनी सांगितले की, झोपण्याच्या ३० मिनिटं ते एक तास आधी एक ग्लास कोमट पाणी प्यावे. आयुर्वेदानुसार, कोमट पाणी आतड्यांना उबदार करते आणि रात्री पाचक प्रणालीला आधार देते. हे बद्धकोष्ठतेवर उपयुक्त असल्याचे दर्शविले गेले आहे. रात्री जास्त पाणी पिण्यामुळे काही लोकांमध्ये वारंवार लघवी किंवा झोपेचा व्यत्यय येऊ शकतो.
रात्री तूप दूध किंवा पाण्यासोबत प्यावे
रात्री झोपायच्या सुमारे एक तास आधी अर्धा ते एक चमचा तूप प्यावे. कोमट दूध किंवा कोमट पाण्यासोबत घेतल्याने सकाळी उठताच पोट साफ होईल. आयुर्वेदानुसार, तूप आतड्यांचा कोरडेपणा कमी करून मल सहज बाहेर टाकण्यास मदत करते. आयुर्वेदात त्याचा संबंध स्नेहापनशी जोडला गेला होता.
त्रिफळाचे सेवन
त्रिफळा हे हरड, बहेडा आणि आवळा यापासून तयार केलेले पारंपरिक आयुर्वेदिक मिश्रण आहे. याचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होईल. रात्री अर्धा चमचा त्रिफळा कोमट पाण्यासोबत किंवा दुधासोबत घेतल्याने सकाळी उठताच तुमचे पोट साफ होईल आणि तासनतास टॉयलेटमध्ये बसावे लागणार नाही. रात्री घेतल्यास आतड्यांसंबंधी हालचालींमध्ये हे मदत करू शकते. मध्यम प्रमाणात त्याचे सेवन करावे. जास्त प्रमाणात सेवन केल्याने अतिसार, पोटात पेटके किंवा इतर पाचक समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञ म्हणतात की, ज्या लोकांना त्रिफळा घेतल्यानंतर पोटात जास्त आंबटपणा किंवा सैलपणा जाणवतो त्यांनी याचे सेवन करणे टाळावे.
काळे मनुके
तज्ज्ञांच्या मते, बद्धकोष्ठतेपासून मुक्त होण्यासाठी काळ्या मनुक्याचे सेवन करू शकता. रात्री ४ ते ५ मनुके पाण्यात भिजवून सकाळी चावून खआणे. मनुक्यांमध्ये असलेले फायबर आतड्यांसंबंधी हालचाली सुलभ करण्यास मदत करू शकते. मनुके खाल्ल्याने भिजवलेले पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होईल. शिवाय हा लोहाचा चांगला स्त्रोत आहे. तो शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करतो आणि शरीर निरोगी ठेवतो.
हरडचे सेवन
आयुर्वेदानुसार, बद्धकोष्ठतेवर हरड हा जालीम उपाय आहे. हरड भिजवून सकाळी खाल्ल्याने किंवा त्याची पूड कोमट पाणी किंवा दुधासोबत घेतलयाने पोट आणि आतडे स्वच्छ होतात. आयुर्वेदात हरड मोठ्या आतड्याची हालचाल संतुलित करते असे सांगितले जाते. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, त्याचे सेवन केल्याने पोटातील अतिरिक्त वायू बाहेर टाकण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो.
झोपण्यापूर्वी पोटला मालिश करा
रात्री सुमारे १० मिनिटे तुमच्या पोटाला मालिश करा. पोटाला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने मालिश केल्याने शांत झोप लागते आणि मोठे आतडे स्वच्छ होण्यास मदत होते. पोटाच्या मालिशसाठी गाईचे तूप किंवा मोहरीचे तेल वापरू शकता. आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या मते, पोटाच्या मालिशमुळे आतड्यांची क्रिया सक्रिय होण्यास आणि मल पुढे सरकण्यास मदत होते.
नाभीत तेल किंवा तूप सोडा
नाभीला मोहरीच्या तेलाचे किंवा गाईच्या तुपाचे दोन थेंब लावल्याने पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. तसंच यामुळे शरीराचा आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होण्यासही मदत होते.
रात्री उशिरा जेवण करू नका
बद्धकोष्ठता टाळण्यासाठी रात्री उशिरा जेवण करणे टाळावे. आयुर्वेदात रात्री ८ ते ९च्या आधी जेवण्याचा सल्ला दिला जातो. त्यानंतर झोपण्याआधी शतपावली करणेदेखील महत्त्वाचे आहे. रात्री १०-११नंतर रात्रीचे जेवण टाळावे. खूप जास्त किंवा रात्री उशिरा जेवल्याने पचनाच्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे जेवणाची वेळ नियमित ठेवणे उपयुक्त ठरू शकते.
