Salt Eating: भारतीय जेवणात मिठाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. डाळ, भाजी, आमटी, लोणचे, पापड, चटण्या आणि विविध स्नॅक्सपासून जवळपास प्रत्येक पदार्थात मीठ वापरले जाते. मिठामुळे अन्नाची चव खुलते आणि शरीरासाठी आवश्यक असलेले सोडियम मिळते, जे स्नायू, मज्जासंस्था आणि शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाचे असते. मात्र, आधुनिक जीवनशैलीत प्रक्रिया केलेले पदार्थ, फास्ट फूड आणि पॅकेज्ड स्नॅक्समुळे मिठाचे प्रमाण नकळत वाढते. त्यामुळे गरजेपेक्षा जास्त मीठ खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. मिठामधील सोडियमचे प्रमाण जास्त झाल्यास उच्च रक्तदाबाचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढण्याची शक्यता असते. तसेच जास्त मीठ खाल्ल्याने मूत्रपिंडांवर अतिरिक्त ताण येतो, शरीरात पाणी साठणे, सूज येणे आणि काही व्यक्तींमध्ये हाडांमधून कॅल्शियमचे नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते.
त्यामुळे तज्ज्ञ संतुलित आहारासोबत मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा आणि पॅकेज्ड, प्रक्रिया केलेले तसेच अतिखारट पदार्थांचे सेवन मर्यादित करण्याचा सल्ला देतात.
परंतु, तुम्हाला ठाऊक आहे का? मिठाचे सेवन खूप कमी प्रमाणात करणेदेखील काहींसाठी नुकसानदायी ठरू शकतं. शरीराला सोडियमची आवश्यकता असते. कारण- ते मज्जासंस्था, स्नायूंचे कार्य आणि शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.
कमी मीठ खाणेदेखील आरोग्यासाठी घातक
१. शरीरातील द्रवांचे संतुलन राखण्यासाठी आवश्यक
मिठामधील सोडियम हे खनिज शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवण्याचे महत्त्वाचे काम करते. त्यामुळे पेशी योग्य प्रकारे कार्य करतात आणि शरीरातील रक्ताचे प्रमाणही संतुलित राहण्यास मदत होते. सोडियम खूप कमी झाल्यास शरीरातील द्रवांचे संतुलन बिघडू शकते.
२. मज्जासंस्था आणि स्नायूंच्या कार्यासाठी महत्त्वाचे
सोडियम मज्जातंतूंद्वारे संदेश पोहोचवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच स्नायू आकुंचन-पसरण्यासाठीही त्याची गरज असते. मिठाचे प्रमाण खूप कमी झाल्यास स्नायूंमध्ये गोळे येणे, अशक्तपणा, हात-पाय थरथरणे किंवा स्नायू कमकुवत वाटणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
३. कमी रक्तदाब आणि चक्कर येण्याची शक्यता
काही व्यक्तींमध्ये मिठाचे प्रमाण खूप कमी झाल्यास रक्तदाब कमी होऊ शकतो. त्यामुळे अचानक उभे राहिल्यावर चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, थकवा जाणवणे किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. विशेषतः वृद्ध व्यक्ती आणि कमी रक्तदाब असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मिठाचे सेवन खूप कमी करू नये.
४. जास्त घाम, उलट्या किंवा अतिसार झाल्यास धोका वाढतो
उन्हाळ्यात जास्त घाम येणे, अतिसार, उलट्या किंवा दीर्घकाळ व्यायाम केल्यामुळे शरीरातून पाण्यासोबत सोडियमही बाहेर पडतो. अशा वेळी मिठाचे प्रमाण अतिशय कमी असल्यास शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे अशा परिस्थितीत योग्य प्रमाणात द्रव आणि इलेक्ट्रोलाइट्सची भरपाई करणे आवश्यक असते.
५. संतुलित प्रमाणात मीठच सर्वोत्तम
मीठ पूर्णपणे टाळणे किंवा खूप जास्त खाणे या दोन्ही गोष्टी आरोग्यासाठी योग्य नाहीत. निरोगी प्रौढांनी संतुलित आहारासोबत मर्यादित प्रमाणात मीठ घ्यावे. उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचा आजार किंवा हृदयविकार असल्यास मिठाचे योग्य प्रमाण डॉक्टर किंवा आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार ठरवावे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
